जोंधळ्याच्या लाह्या आणि तंबीटाचा लाडू
आज नागपंचमी …!! आजचा दिवस आला की आईची आठवण येतेच येते. आम्ही लहान असतानाची ही गोष्ट आहे. जयसिंगपुरात रविवारी आठवडा बाजार भरायचा. नागपंचमीच्या आधीच्या रविवारी आई बाजारातून लाह्यांचे जोंधळे आठवणीनं आणायची. भाकरीची ज्वारी आणि लाह्याचे जोंधळे यातला फरक मला कधी कळलाच नाही आणि जाणून घ्यावा असं कधी वाटलंही नाही.
हे जोंधळे आणले की आईची तयारी सुरु व्हायची. सकाळची जेवणं आवरली की कट्ट्यावरुन गँस खाली काढला जायचा. ताक करायच्या रवीला पुढे फडकी गुंडाळली जायची. गँसवर कढई ठेवून त्यात हे जोंधळे घातले जायचे आणि आई रवीने ते हलवायची. थोड्या वेळातच त्याच्या लाह्या फुलायच्या. कढईतनं त्या उडून खाली पडायच्या. त्या वेचायचे काम आम्ही करायचो. हळूच लाह्या तोंडातही टाकायचो. आई म्हणायची, “अरे… नागोबाला नैवेद्य दाखवावा आणि मग खाव्यात रे…!!”
सगळ्या लाह्या झाल्या की आई त्यातील थोड्या नागोबाच्या नैवेद्यासाठी काढून ठेवायची, थोड्या फोडणीला टाकायची आणि बाकी डब्यात भरुन ठेवायची. नंतरचे १५ दिवस तरी भुक लागली की फोडणीच्या लाह्या पोटात जायच्या. त्या संपल्या की साध्या लाह्यांना तेल तिखट मीठ लावून द्यायची. त्याची चवही अप्रतिमच असायची….!!
माझी आई उगार खुर्दची म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातली…!! काही पदार्थ तिची खासीयत होती. नागपंचमीचे औचित्य साधून लाह्यांच्या सोबत तंबीटाचे लाडू करायची. हे लाडूही पुढे किमान पंधरा दिवस भुकेला आधार व्हायचे. हे तंबीट म्हणजे कसलं पीठ हे कधी जाणून घेतलं नाही पण, आईने केलेल्या तंबीटाच्या लाडवाची चव अजूनही जिभेवरुन गेलेली नाही.
आता काळ बदलला. जोंधळ्याच्या लाह्यांची जागा पॉप कॉर्नने घेतली. आईच्या हातच्या लाह्यांपेक्षा मल्टिप्लेक्समध्ये अडिचशे रुपयांना मिळणाऱ्या पॉप कॉर्नला प्रतिष्ठा आली. घरी लाह्या करणारी आईही दुर्मिळ झाली. आता घरोघरी सतत “लाह्या फुटतात” पण त्या जोंधळ्याच्या नसतात…!! आईने बनवलेल्या जोंधळ्याच्या लाह्या पोटाची आणि मनाची भूक शांत करायच्या आता घरोघरी फुटणाऱ्या लाह्या नात्यांची वीण उसवत चालल्या आहेत.
नागोबा दूध आणि लाह्या खात नाही, ती अंधश्रध्दा आहे असं आज सांगितलं जातय…!! कशाला खाईल आता तो बिचारा ? मनात म्हणत असेल, “मला कुणी त्रास दिला तरच मी विषारी डंख देतो पण मनात स्वार्थाचे विष भिनलेली ही माणसं तर आता नातीगोती, आप्तस्वकीय कशाचाच विचार न करता एकमेकांना बिनधास्त डसू लागलीत….!!”
हा काळाचा महिमा असला तरी आईच्या हातच्या जोंधळ्याच्या लाह्या आणि तंबीटाच्या लाडवाचा महिमा ज्यानं चव चाखली तो कधीच विसरणार नाही..!!
आनंद वामन कुलकर्णी
जयसिंगपूर 7744964550