नांदेड : मार्लेगाव (Nanded) येथील एका २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या (Crime) करण्यात आली होती. या तरुणाचा मृतदेह गुरूवारी बोरगाव शिवारातील एका डोहात आढळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत
सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मार्लेगाव येथील सचिन हा गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तिथेही तो आढळून आला नाही.
यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. सचिनचा मृतदेह बघून पोलिसांनी त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यातही घेतलं होतं.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. चौकशीत संशयिताने आपणच आपल्या साथीदारांसह सचिनचा खून केला असल्याची कबुली दिली. मृत सचिनने नात्यातील एका महिलेचा महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी सचिनचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.