*नव्या स्वातंत्र्याची सुरुवात !!*
पाण्यात गावाचे टँकर. पाण्यासाठी होणारा त्रास गावातील तरुणांच्या लक्षात आला. पाणी परिस्थितीच्या बाबतीत आपले गाव अत्यंत आजारी आहे हे लक्षात येताच गावातील तरुण पेटून उठले. निर्माणाचा वसा घेतलेल्या या तरुणांनी कशाचीच तमा न करता गाव पाणीदार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले. *गावाला पाणी प्रश्नांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.*
काम करताना येणाऱ्या प्रशासकीय आणि राजकीय अडचणी तरुणांच्या लक्षात आल्या. आज वरचा अनुभव असा होता की पाण्याची चळवळ गावात उभीकरणारे कार्यकर्ते गावाच्या राजकारणात मात्र सपशेल पराभूत होतात. निवडणूक लढवणे,जिंकणे ही सोपी गोष्ट नसते. पैठण मात्र त्याला अपवाद ठरले. तरुणांच्या गटाला विजय मिळाला. गावात विजयी उन्माद करण्यापेक्षा सर्वांनी हातात खराटे,झाडू घेऊन गाव साफ करत दोन महिन्यांच्या राजकारणाला राम राम केला व ते गावकारण करू लागले. *गाव राजकीय गुलामगिरीतून स्वतंत्र झाले.* राजकीय हेवेदावे बाजूला सोडून ऐकीचे बळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले.
एक वेळ विधायक चळवळ करणे सोपे. त्यातून मिळालेल्या चांगुलपणाच्या ताकदीवर निवडणूक जिंकणे पण सोपे पण गावातील पंचायतीत नेतृत्व करत गावगाडा चालवणे अतिशय अवघड काम. एक तर माणूस कोडगा बनतो व नवीन प्रचलित राजकारणाचा सूत्रधार बनतो. कोविडच्या संकटात तर या तरुणांनी जीवाची बाजी केली. *भयाचा गुलामगिरीवर मात करत त्यांनी स्वातंत्र्य मिळवले.*
या तरुणातील एक वयाने सर्वात लहान पण भारीच समंजस. त्याची आई निवडणुकीत केवळ दोन मतांनी पराभूत झाली. त्याने *पराभवाच्या गुलामगिरी तून स्वातंत्र्य मिळवले.* मोठ्या जोमाने तो कामाला लागला.
गावातील वृद्ध आईवडिलांना आधुनिकतेचे वारे लागलेले लेकरं विचारणासे झाले होते.त्यांना *दुःखाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र* करण्यासाठी नामी शक्कल लढवत त्यांच्या मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली गेली.
कोविडच्या संकटाच्या बरोबरच गावठाणात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले. पाणीदार गाव आणि पिण्याच्या पाण्याची समस्या.हा मोठाच विरोधाभास. गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन इतिहासजमा झालेली. हातात गावाचा कारभार घेताच हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. अथक प्रयत्न करून पण पाईपलाईन काही तंदुरुस्त होण्याची शक्यता नव्हती. दिवसभर पाणीपुरवठा करण्यासाठी तरुणांना जीवाचे रान करावे लागायचे. शेवटी गावाच्या आगामी नियोजनाच्यासाठी सर्व तरुण अंबाजोगाईला मला भेटण्यासाठी आले. खरं तर आमचे व्यायाम शाळा उभी करण्याचे प्राधान्य होते. सर्वांनी एकदिलाने निर्णय घेतला की आधी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू आणि मग व्यायामशाळा.
*‘स्व’ केंद्रित स्वार्थाच्या गुलामगिरीतून त्यांनी स्वातंत्र्य मिळवले.*
*ज्ञान प्रबोधिनी आणि गाव असे एकत्र येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विचार सुरू झाला.* गावातील चार ठिकाणी टाक्या उभ्या करायच्या. *टाकी आणि साहित्य याचा खर्च मुंबई आणि पुण्यातील प्रबोधक परिवार करेल आणि पैठण मधील प्रबोधक परिवार श्रमदान आणि आपल्या कौशल्यातून बाकीचे व्यवस्था करेल. टार्गेट ठरले.*.
*१५ ऑगस्ट २०२१* ला या पिण्याच्या पाण्याच्या गुलामगिरीतून गावाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. दिवस खूप कमी होते.
नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहीए।
स्वतन्त्र देश हो गया प्रभुत्वमय दिशा मही
निशा कराल टल चली स्वतन्त्र माँ विभामयी
मुक्त मातृभूमि को नवीन मान चाहिए।
नवीन पर्व के लिए ॥१॥
युवकों कमर कसो कि कष्ट-कण्टकोंकी राह है
प्राण-दान का समय उमंग है उछाह है
पगों में आँधियाँ भरे प्रयाण-गान चाहिए।
काहीच दिवसात चवथरा बांधून तयार झाला. आज पिण्याच्या पाण्यासाठीची पहिली टाकी उभी राहिली. *आज पैठण, तालुका केज पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या प्रश्नांतून स्वतंत्र झाले.*
प्रसाद चिक्षे