प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवापूर्ती समारंभ
लातूर : मुलांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात चांगले संस्कार रुजवणे, त्यांना सुजाण नागरिक बनवणे हे शिक्षकांचे आणि शिक्षण संस्थेचे कर्तव्य आहे. हे कार्य दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था अनेक वर्षे निष्ठेने आणि नेटाने करीत आहे. ही वाटचाल अत्यंत अभिमानास्पद आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष व लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे व्यक्त केली.

बाभळगाव येथे दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ व कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय स्टाफ ॲकॅडमी यांच्या वतीने आयोजित समारंभात प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या समारंभात प्रा. डॉ. जयदेवी पवार संपादित ‘आ. य. पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, परिस्थितीशी संघर्ष करीत श्री. वाघ यांनी आयुष्यात यश संपादन केले. संस्था हेच आपले कुटुंब मानत, त्यांनी आपल्या कुटुंबाचा वेळ संस्थेला दिला. जवळजवळ २३ वर्षे संस्थेची सेवा केली. असंख्य विद्यार्थी घडवले. ‘कमवा व शिका’ योजना सुरू करून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवले. त्यांचे हे कार्य महत्वपूर्ण आहे.” शिक्षणात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील असावे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना घडवत असताना कायम संस्थेची कामगिरी उंचावण्याचे व प्रतिष्ठा जपण्याचे काम केले. याचे मला समाधान आहे, अशी भावना डॉ. वाघ यांनी व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंह देशमुख, सचिव शाम देशमुख, कोषाध्यक्ष आयुब शेख, संचालक सुवर्णाताई मुळे, सूर्यकांत देशमुख, भीमराव शिंदे, डॉ. शाहूराज मुळे, विवेक कदम, बाळासाहेब देशमुख, मुख्याध्यापक शंकर राठोड, मुख्याध्यापक रत्नदीप गायकवाड, व्यंकट नाईकवाडे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शोभाताई वाघ, डॉ. ज्योती वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. रणजीत जाधव, डॉ. सुरेशकुमार कांबळे, तानाजी बिराजदार, प्रा. संतोष कल्याणकर, विठ्ठल मुळे, हनुमंत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. दुष्यंत कटारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. नरेंद्र देशमुख यांनी आभार मानले.