रामेश्वर येथे राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्य स्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन
लातूर- ११ मे :“पंचमहाभूताच्या संवर्धनासाठी नव पिढीने कार्य करावे. याच पंचमहाभूतातील तत्वाला अनुसरून डॉ. विश्वनाथ कराड लाल मातीतील कुस्तीला जीवंत ठेवण्याचे कार्य करीत आहेत. हे अद्वितीय कार्य असून तो वारसा पुढे चालविण्यास नव पिढीने समोर यावे,” असे आवाहन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय कुमार दास सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी आजगावकर, शिवाजीराव केकाण आणि राहुल काळभोर, संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे आणि राजेश कराड उपस्थित होते.
या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते पंढरीच्या वाटेवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
संजय बनसोडे म्हणाले,“ शरदचंद्र पवारसाहेब सतत सांगतात की राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी नवे पर्व सुरू केले. तसेच पर्व प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी सुरू केल्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जगभरात पोहचले आहे. हळू हळू लोप पावत चाललेली मातीतील कुस्तीला जीवंत ठेवण्याच्या कार्यासाठी ते सतत झटत आहेत.”
“पर्यावरणाचा र्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जल जीवन योजना अंतर्गत २०२४ पर्यंत केंद्र व राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक घराघरात नळ देऊन प्रति व्यक्तिला ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा आमचा मानस आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ या पूर्वी स्पर्धेला हिंद केसरी, ट्रीपल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी या सारखे भारतातील ११ मल्लांनी उपस्थिती दर्शविली होती. शुद्ध अंतकरण व निर्मळ मन असल्यास तंदुरूस्त राहू शकतो. सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी व्यक्तिचे मन बदलण्यास वेळ लागू देत नाहीत. माणसाला गर्व नसावा अभिमान असावा. तंदुरूस्त व निरोगी शरीरासाठी लाला मातीतील कुस्तीकडे तरूणांनी वळावे.”
सुधाकर श्रृंगारे म्हणाले,“ राज्यातील जिल्ह्यात आखाडे निर्माण करण्यासाठी केंद्राकडून परीपूर्ण मदत केली जाईल. कुस्ती व कबड्डी हे उत्तम खेळ असून यामाध्यमातून शरीराला व्यायामाची सवय लागते. यामुळे आपल्याला कोणतीही व्याधी होऊ शकत नाही. धावपळीच्या युगात लाल मातीतील हा खेळ मन आणि मतिष्क मजबूत करतो.”
अभिमन्यू पवार म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की जो खेलेंगा वहीं खेलेगा, त्यानुसार आजच्या काळात खेळाला अत्यंत महत्व आले आहे. त्यानुसारच औसा येथे हरीशचंद्र बिरासदार यांच्या नावाने स्टेडियम उभारण्याचे कार्य लवकरच सुरू करणार आहे. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ राष्ट्र उभारणीसाठी सुरू केलेली ही स्पर्धा खेळाची संस्कृती जगवितांना दिसत आहे. परंतू येणार्या काळात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नावाने खोखो, व्हॉलिबॉल, कबड्डी, क्रिकेट सारख्या खेळांच्या सप्ताहाचे आयोजन करू. स्पोर्टस मीट या नावाने लातूर जिल्हा संपूर्ण भारतात ओळखला जाईल या दृष्टीने कार्य करू.”
शुभारंभाची कुस्ती प्रसाद शिंदे आणि धैर्यशील शिंदे यांच्यात झाली. त्यामध्ये प्रसाद शिंदे विजयी झाला. तसेच, प्रशांत जाधव आणि श्रीवर्धन लोमटे यांच्यातही कुस्ती झाली. यामध्ये श्रीवर्धन लोमटे विजयी झाला.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यासहित कुस्ती खेळाडूंची श्रीप्रभू रामचंद्र मंदिरा पासून संत श्री गोपाळबूवा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी भाग घेतला आहे. उद्घाटन सोहळ्यास रामेश्वर आणि पंचक्रोशितील क्रिडाप्रेमी सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विलास कथुरे यांनी प्रास्ताविक केले.
बाबा निम्हण यांनी कुस्तीचे संचालन केले.
प्रा.गोविद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. पी.जी.धनवे यांनी आभार मानले.