लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे नवचेतना अधिवेशन उत्साहात
लातूर/प्रतिनिधी ः- नव भारत आता तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. देशातील तरूणांनी नौकरीच्या मागे न लागता स्वताचा व्यवसाय उभा करून दुसर्यांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. आपला व्यवसाय नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून समृद्ध करण्याच्या मोठी संधी असून या संधीचा फायदा माहेश्वरी समाजातील युवकांनी घ्यावा असे आवाहन अशिष डालिया यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश व लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनच्या वतीने नवचेतना 2022 अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर येथील पडिले लॉन्समध्ये झालेल्या या अधिवेशनात पुणे येथील अशिष डालिया बोलत होते. यावेळी अधिवेशनचे उद्घाटक राजस्थान मल्टिस्टेट बँकचे चेअरमन व बन्सल क्लासेसचे चंदुलाल बियाणी, प्रदेश माहेश्वरी महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साली, युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक सारडा यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. दिपक बजाज, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कालिया, प्रोजेक्ट चेअरमन अभिषेक मुंदडा, उपाध्यक्ष गौरव चांडक, सचिव सीए आनंद सारडा आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
माहेश्वरी समाजाने देशाची संस्कृती आणि सामाजिक एकता अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले असून त्यांच्या या प्रयत्नाला आता समाजातील युवकांनीही साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून अशिष डालिया म्हणाले की, भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून उद्योगाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला व्यवसाय व उद्योगाला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास तो अधिक समृद्ध होऊन भरभराटीस येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे या माध्यमातून इतरांना रोजगार उपलब्ध होणार असून यामुळे देशातील बेरोजगाराची प्रश्नही कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळेच माहेश्वरी समाजातील युवकांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय व उद्योगाला पसंती द्यावे असे आवाहन केले.
यावेळी सातारा येथील धिरज लड्डा, औरंगाबाद येथील सीए अनुज चांडक यांनीही वेगवेगळ्या विषयावर अधिवेशनात सहभागी झालेल्या युवकांना मार्गदर्शन केले. या अधिवेशनाच्या प्रसंगी सोलापूर येथील किर्ती भराडीया हीने जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम केल्याबद्दल व ब्लड कॅन्सरवर औषध बनविणारे डॉ. शुभम धुत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.