लातूर/प्रतिनिधी : महायुती सरकारच्या वतीने मांडण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प नवइतिहास निर्माण करणारा असून हा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांचा सन्मान करून त्यांना बळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजपा नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी बहिण योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, पात्र कुटूंबास वर्षाला ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकºयांना दिवसा वीज मोफत देण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम, महिलांना शासनामार्फत दरमहा १५०० रुपये, त्याचबरोबर पंढरपूरच्या वारीला जाणाºया मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतीदिंडी २० हजार रुपये, निर्मल वारीसाठी वारकºयांची मोफत आरोग्य तपासणी यासह दरवर्षी दहा लाख तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा निर्णय, असे एक नव्हे अनेकमहत्वाचे निर्णय घेवून अर्थसंकल्पामध्ये यासाठी ठोस तरतूद करण्यात आली आहे.

या योजनांसोबतच राज्यातील विकास कामांना अधिक गती मिळावी व पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी महायुती सरकारच्या वतीने जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तो नवइतिहास निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.