भाग १
देशपातळीवर काम करून आणि पराक्रम गाजवून अंबाजोगाईला आपले कार्यक्षेत्र किंवा मुख्यालय करून इथला भोवताल समृद्ध करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे नकळतच अंबाजोगाईचे सांकृतिक आणि सामाजिक वातावरण अतिशय गतिशील आणि सुपीक बनते. अशाच दिग्गज लोकांच्यामध्ये असणारे आमचे अमर काका म्हणजेच अमर हबीब. आपल्याला काही करायचे आहे आणि थोडी बहुत कामाच्या बाबत साशंकता आहे अशा वेळी निर्धास्तपणे अगदीच मनमोकळ्या आणि खुल्या गप्पा मारण्याचे हक्काचे स्थान म्हणजे अमर काका. उत्तर नेहमीच मिळेल असे काही नसते पण वैचारिक मंथन इतके अपार होते की काही तरी मार्ग दिसायला लागतो. अमर काकांची आणि माझी काही बाबत टोकांची मतभिन्नता आहे. पण त्याला भेटल्यावर एक नवी उमंग नक्कीच मिळते.
ज्ञान प्रबोधिनीचा पुढील दहा वर्षांचा भवितव्य लेख तयार झाला. नक्की कुणाला त्याची प्रत द्यावी असा विचार मनात घोळत होता. कोण वाचेल ? त्यावर साधक बाधक वेळ काढून कोण बोलेल ? त्याही पेक्षा आपल्या भिन्न विचारधारेच्या संघटनेचे नियोजन वाचण्यात कुणाला स्वारस्य असेल ? असे एक न अनेक प्रश्न मनात होते. त्यात पहिले नाव आले अमर हबीब यांचे.फोन करताच प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देणारे म्हणजे अमर काका. त्यांना ही उर्जा कुठून मिळते हे माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय. त्यांच्या बद्दल चांगलं जसे एकले तसे काही वाईट पण. वेळ काढून अमर काकाचा जीवन संघर्ष समजून घेणे मात्र राहून गेले होते. काही दिवसांपासून माझ्यापण मनात बरीच जळमट साठली होती. थोडे फार डबके झाल्याची जाणीव होती.स्वतःला प्रवाही आणि गतिशील करण्यासाठी थोडं अमर काकाच्या जीवन गंगेत डुंबायचे ठरवले. पार चिंब होई पर्यंत अपार गप्पा मारल्या.
दूर उत्तर प्रदेशातील मुस्लीम धर्माचा नसीर हुसेन …..निजाम राजवटीत अंबाजोगाईला येतो. अंबाजोगाई बीड रस्त्यावरील घाटाचे काम कंत्राटदार म्हणून करतो. पुढे काही दिवस केज मध्ये आणि पुढे अंबाजोगाईला स्थाईक होतो. इथे कुणी नातेवाईक नव्हते न कुणी सोयरे. माझे पणजोबा डॉ व्यंकटराव देशपांडेचे ते खास मित्र.अमर काकांचे ते वडील. अमर काकांचा आणि आमच्या कुटुंबाचा स्नेह हा पार माझ्या पणजोबांच्या पासून आहे हे पण या गप्पातच कळले. अमर काकांची आई म्हणजे संगीताच्या मैफिलीत लय चुकू नये म्हणून शांतपणे घुमत राहणारा तंबोऱ्याचा स्वर. त्याचे अस्तित्व तर असते आणि महत्व असते पण फारशी दखल मात्र घेतली जात नाही. फार मोठ्या घरातील ती. घर म्हणजे एक महाल. भाऊ चांगला लेखक. फारच सच्ची आणि नेकदिल स्वच्छ मनांची स्त्री.
अमर काका योगेश्वरी शाळेत शिकत होते. त्यांच्या वर्गात मुस्लीम असणारे ते एकमेव. नकळत त्यामुळे मनात एक न्यूनगंड आलेला.यातून बाहेर पडण्यासाठी काकांनी भरपूर मित्र परिवार जमा केला. त्यातून ते सहजच राष्ट्रसेवा दलाच्या शाखेकडे आकर्षित झाले. मित्रांच्या बरोबर तुंबळ खेळ खेळत ते एक नवा संस्कार स्वतःवर करत होते. स्व. बाबुजी (द्वारकादास लोहिया) आणि शैला भाभींच्या संपर्कात ते आले. शाळेत नाटकात ते हिरीरीने भाग घेत त्याच्या सोबत सेवादलाच्या कला पथकाचे ते सक्रीय सभासद झाले. एका नाटकात तर त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे पात्र केलेले अगदीच लंगोटी घालून !! असा अफलातून कलावंत म्हणजे आमचा अमर काका !!
महाविद्यालयात असताना देशातील राजकीय वातावरण प्रचंड दुषित झाले होते. इंदिरा गांधीनी देशात आणीबाणी जाहीर केली.भिन्न विचारांच्या सर्वांना जेलमध्ये कैद केले. अमर काका तर समाजवादी विचारांचे तडफदार कार्यकर्ते. त्यांना पण अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्वात लहान व तरुण दोघे होते एक अमर हबीब आणि दुसरे पुण्याचे खासदार गिरीश बापट. तुरुंगातील पहिले सहा महिने प्रचंड त्रासाचे होते. त्यांना बावन्न पत्त्याची भाजी खावी लागायची. तुरुंगाच्या आवारात दिसणाऱ्या सर्व झाडांच्या पानांची भाजी असायची. अगदीच बाबळीची पानं पण त्यात असतं. सहा महिन्या नंतर मात्र त्यांना राजकीय कैदी म्हणून मानण्यात आले.आता त्यांच्या सोबतीला होती अनंत भालेराव,गंगाप्रसाद अग्रवाल,मोहन धारिया सारखे अनेक दिग्गज लोक. मोहन धारियांच्या आत्मकथनाचे लेखनिक म्हणून पण अमर काका काम करत होते. तुरुंगातील अनेक गंमती जमती त्यांच्याकडून ऐकून पोट धरून हसायला होते. सर्व विचारधारांचा अभ्यास त्यांचा याच काळात झाला. ते दिवस काहो औरच होते. प्रचंड भारलेपण सर्वांच्या मध्ये होते.
आणीबाणी संपली. काकांची तुरुंगातून सुटका झाली. त्यांच्या मनात भूमिगत होऊन काम करण्याचे होते. इंदिरा गांधी परत निवडणूक निवडून येतील व परत सत्ता काबीज करतील त्यांच्या विरुद्ध क्रांतिकारी संघर्ष करण्याचा विचार काकांच्या मनात होता. घरी न परतता ते एका बैठकीसाठी मुंबईला गेले. जॉर्ज फर्नांडीस यांनी ती बैठक आयोजित केलेली होती. काकांना मात्र वेळेवर पोहोचता आले नाही. त्याच काळात एका सभेचे आयोजन पण करण्यात आले होते. सभेला अजिबात माणसे येणार नाहीत हा विचार करून निदान आपण तरी गेले पाहिजे असा निश्चय करून प्रमोद महाजन आणि अमर काका सभा स्थानी गेले. त्यांचा अंदाज साफ चुकला होता. प्रचंड मोठ्या संख्येने लोक सभेला उपस्थित होते. राजकीय बदलाचे हे संकेत होते. आपले अंदाज चुकतात याचे भान काकांना आले. त्यांनी निश्चय केला की कुणातरी अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे.अंबाजोगाईत परतून ते बापूसाहेब काळदातेंच्या बरोबर कामाला लागले. काही दिवसातच ते बापूसाहेबांचे मानसपुत्र झाले. बापूसाहेब खासदार होताच ते त्यांचे स्विय सहाय्यक झाले.
दोन वर्षे सर्वसामान्य माणसाचे प्रचंड काम केल्यावर मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांच्या संघर्ष वाहिनीचे काम करण्याची इच्छा प्रबळ झाली. याच काळात प्रमोद महाजनांना जन संघाच्या राज्य सचिव पदाची जबबदारी देण्यात आली तर त्याच बरोबर अमर काकांना जनता दलाच्या राज्य सचिव पदाची. काकांनी मात्र त्याचा स्वीकार केला नाही. राजकारण माझा पिंड नाही. मी त्यात रमू शकणारा नाही. मला हे काम करण्या पेक्षा संघर्ष वाहिनीचे काम करण्यात जास्त रस आहे. राजकीय पक्षाची आलेली मोठी संधी विचाराने त्यागणारे फार कमी लोक असतात. त्यातील एक म्हणजे आमचे अमर काका !! काकांचा निणर्य झाला आणि काका बिहारला जाण्यासाठी निघाले. बापूसाहेब काळदाते यांनी उभे राहून कडकडीत सॅल्युट काकांना ठोकला. तू जे काही करतोय ते योग्य आहे आणि आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे याचेच ते प्रतिक होते.
तुरुंगात एक ध्येयधुंद आयुष्य जगणाऱ्या काकांच्या जीवनात हळुवार पावलाने मैत्रीचा प्रवेश झाला होता. काकांच्या बहिणीच्या सोबतच औरंगाबादला आशा नावाची एक युवती नर्सिंग कॉलेज मध्ये शिकत होती. बहिण काकांना नियमित पत्र लिहायची. तिच्या बोलण्यातून अमर काकाचे व्यक्तिमत्व समजायचे. यातूनच एक सुंदर भेट कार्ड आशा मावशीने अमर काकांना पाठवले. त्याला प्रतिसाद म्हणून काकांनी एक सुंदर पत्र पाठवले. त्याचे सामूहिक वाचन वस्तीगृहावर झाले. पुढे नियमित पत्र व्यवहार सुरु झाला. हळूहळू भेटीगाठी पण वाढल्या. असेच एकदा शैला भाभीना भेटण्यासाठी दोघे गेलेले. भाभी सहज म्हणून गेल्या,
“जोडा चांगलाच शोभतोय !!”
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. वादळाशी आपल्या जीवनाची गाठ बांधण्यास आशा मावशी तयार होत्या. त्यांचा धर्म ख्रिश्चन तर काका मुस्लीम. दोघांच्या घरातून कडाडून विरोध. काकांनी मात्र निणर्य घेतला. आपल्या घरातील लोकांचे मनपरिवर्तन करायचे आणि तो पर्यंत दोघांनी ठराविक अंतरावर राहायचे. काकांच्या या निर्णयाने आशा मावशीच्या मनात त्यांच्या बद्दलचा आदर अपार वाढला. वर्षभर दोघांनी वाट पहिली पण परिस्थिती काही बदलली नाही. शेवटी कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तारीख आली. मित्रांना याची कुणकुण लागली. चांगलीच पन्नास एक जण कोर्टात दाखल. साक्षीदार म्हणून बाबूजी,बापूसाहेब काळदाते आणि सुधाकर जाधव होते. लग्न झाल्यावर मित्रांना जेवायला घालण्यासाठी काकांच्या जवळ काहीच नव्हते. बापूसाहेबांनी आपल्या जवळील होती नव्हती ती रक्कम काकांना दिली. हॉटेलात जेवण करून सरकारी एसटी बसने काका व आशा मावशी उभा राहून अंबाजोगाईत आले. इतका कमालीचा साधेपणा आज शोधून सापडत नाही.
जीवन समजून घेण्याच्या प्रवासात काकांना आता प्रेमाचा सोबती मिळाला होता. त्या दोघांचा विस्मयीत करणारा जीवन प्रवास सुरु झाला….
क्रमशः
लेखन :प्रसाद चिक्षे