बालाजी शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
लातूर ः लातूर शहरातील संजय नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते, साप्ताहिक कलयुग टाइम्सचे संपादक बालाजी विठ्ठलराव शिंदे यांच्या आकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून त्यांच्यावर येथील मारवाडी स्मशानभुमित शोकाकुल वातावरणात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्वात मिसळणारा स्वभाव, सामाजिक कार्याची आवड आणि अन्यायाची चिड असल्याने सर्वसामान्यांना आपल्या लेखनीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी त्यांनी पत्रकारीतेचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. लातूर शहराच्या पुर्व भागातील नागरी समस्या सोडवण्याबरोबरच त्यांनी पिडीत, दलित, अल्पसंख्यांक आणि समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करून आपली लेखनी झिजवली. इतकेच नव्हे तर 2 वर्षापुर्वी आलेल्या जागतीक कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी पदरमोडप् करून अनेकांना वेळेत औषधोपचार मिळावेत म्हणून जीवाचे रान केले. गरीबांना शासनाच्या मोफत अन्नपूर्णा योजनेचा लाभ असो की, एखाद्या मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून ते नेहमी संघर्षरथ राहिले. कोणाच्याही हाकेला नेहमी ओ देण्याचा त्यांचा स्थायीभाव असल्याने त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनात आदरभाव होता. परिणामी राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि व्यापार क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा जवळून संबंध आला. सर्वच क्षेत्रात त्यांच्या ओळखी असल्या तरी त्यांनी त्याचा कधी गैरवापर केला नाही. आपल्या आर्थिक समस्यांचे कधी भांडवल केले नाही. खिसा रिकामा असला तरी अगदी हसतमुखाने समोर येणार्यांचा पाहुणचार ते करत असत.
बालाजी शिंदे खंबीर मानाचे होते. त्यामुळे ते कोणात्याही प्रसंगाला मोठ्या धैर्याने सामोरे जात. गत दोन वर्षात त्यांच्या आई, भाऊ यांचेही निधन झाले. जन्मरात्री आई आणि पाठीराखा भावाचे दुःख सारून त्यांनी शिंदे कुटूंबियांची जबाबदारी खांद्यावर घेतली होती परंतू आता त्यांचेच कुटूंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या मागे पत्न आणि तीन लहान मुली असल्याने त्यांच्या भरण-पोषणाची जबाबदारी मोठी आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आधार उरला नाही. त्यांच्या पत्नवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करून खर्या आर्थाने बालाजी शिंदे यांना श्रध्दांजली वाहवी, असे आवाहन अनेकांनी केले आहे.
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी पत्रकार संघ शिंदे कुटूंबियांच्या पाठीशी खंबीर उभा असून शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. माजी पंचायत समिती सदस्य(औसा) प्रकाश मिरगे यांनीही स्वतः व समाजाच्यावतीने शिंदे कुटूंबाला आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला आहे.
श्रध्दांजली सभेत माजी उपमहापौर कैलास कांबळे, अॅड.आप्पासाहेब पाटील, विवेकानंद चिंचोले, गणपतराव तेलंगे, नगरसेवक आनंद गायकवाड, नरसिंगराव जाधव आदिंनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार अफसर कारभारी, हरिश्चंद्र जाधव, सचिन साळूंके, दत्तात्रय परळकर, नितीन चांडक आदि उपस्थित होते.