- नवलाई
लंडन. चौदावं शतक. डांबरीकरण वगैरेचा शोध लागलेला नसल्याने शहरातले मुख्य रस्ते बरेचसे चिखलाने लडबडलेले असायचे. रस्त्यावरून जाणाऱ्या घोडागाड्या वगैरे हा चिखल अजून पसरवायच्या. घोडेही चालताचालता त्यांची लीद रस्त्यावरच टाकत. रस्त्यांच्या बाजूला घरं असत. घराघरात टोपल्यांचे संडास असत. तो ‘मलिदा’ रस्त्यांवर उलटा करायला मनाई नसे. ही अजून घाण रस्त्यावरच येत असे. महानगरपालिका वगैरे नसल्याने साफसफाई वगैरे होत नसे. त्यात लंडनमध्ये कधीही पडणारा पाऊस. त्याने ही घाण सतत ओली आणि ‘वहाती’ रहात असे. ह्यामुळे शहरातले रहिवासी कंटाळले होते. वास हे कारण असेलच पण त्यापेक्षा अजून वाईट गोष्ट म्हणजे – छान कपडे आणि बूट वगैरे घराबाहेर पडावे तर पाय ह्या घाणीतच पडावेत. पूर्वीच्या बुटांचे सोल्सही पातळ असत. ही घाण पायालाही लागत असे.

मग ह्यावर उपाय काय? तर आपल्या खडावांसारख्या बुटांच्या खाली घालायचे अंडर-शूज. ह्यांना म्हणत असत पॅटन (Patten). हे जवळपास उंच लाकडी ठोकळेच असत. बूट घालून मग पुन्हा तसेच ते पॅटनमध्ये सरकवत असत. ह्या पध्दतीमुळे घाणीतून बूट आणि कपडे खराब न होता चालता येत असे. चौदाव्या शतकापासून सुरु झालेल्या हा पॅटन्सच्या उपयोगाचे उल्लेख अगदी १९-२० व्या शतकापर्यंत मिळतात.
१३७९ मध्ये लंडनमध्ये ‘द वर्शिपफूल कंपनी ऑफ पॅटनमेकर्स’ नावाच्या कंपनीला हे पॅटन बनवायचे काम दिले गेले. लंडनमधली ही ‘गिल्ड’ कंपनी होती. गिल्ड म्हणजे त्या क्षेत्रातले सगळे विक्रेते आणि कारागिर एकत्र येऊन काम करत असत आणि ज्या गोष्टीची गिल्ड असे ती गोष्ट अजून उत्तम बनवायचा प्रयत्न करत असत. त्याचे स्टॅंडर्ड ठरवत असत. त्यांची युनियनही असे. ह्या गिल्ड कंपनींना इंग्लंडचा राजा राजमान्यता देत असे. ह्यांची वार्षिक निवडणूक वगैरे होत असे आणि त्यांचे डायरेक्टर्स – ज्यांना मास्टर्स म्हणत – वगैरेही निवडले जात.
‘द वर्शिपफूल कंपनी ऑफ पॅटनमेकर्स’ मधलेही पॅटनमेकर्स एकत्र येऊन चांगले आणि टिकाऊ पॅटन्स कसे बनवता येतील, त्याची किंमत वगैरे काय असावी हे ठरवत असत. ह्या पॅटनमेकर्सचे मास्टर्स दरवर्षी निवडले जात. ह्या कंपनीला राजमान्यता १६७० मध्ये मिळाली. लंडनमधल्या ह्या कंपन्या आजही अस्तित्वात आहेत पण आता त्या फक्त चॅरिटीज स्वरुपात काम करतात. प्रत्येक कंपनीचे एक चर्चही असते. ही गिल्ड चर्चेसही लंडनमध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. कधी लंडनमध्ये फेरफटका मारला तर ही छोटीशी टुमदार चर्चेस लक्ष वेधून घेतातच. आपल्या ‘द वर्शिपफूल कंपनी ऑफ पॅटनमेकर्स’ चे चर्च आहे सेंट मार्गारेट पॅटन्स. लंडनला मॉन्युमेंट स्टेशनजवळ हे छोटंसं चर्च आहे. तिथे ह्या कंपनीचे रेकॉर्डस वगैरे ठेवलेले आहेत. छोटेखानी संग्रहालयही आहे. एकूणच नक्की बघावे असं काहीतरी.

लेखन:
- संकेत कुलकर्णी (लंडन)
फोटोः लाकडी पॅटन. सेंट मार्गारेट पॅटन्स चर्च. ‘द वर्शिपफूल कंपनी ऑफ पॅटनमेकर्स’ च्या मास्टर्सची नावं असलेली पाटी.
वैधानिक इशाराः मुख्य पोस्ट इथे संपते. आता थोडा चावटपणा. तो चालत असेल तरच इथून पुढे वाचा. मनाला पोक आलं असेल तर वाचणं बंद करा.
सेंट मार्गारेट पॅटन्स चर्चमध्ये कंपनीच्या मास्टर्सची नावं लावलेली जी पाटी आहे त्यातील एक आडनाव आपल्याला (शिवी म्हणून!) फारच परिचयाचं आहे. पहा मिळतंय का ते त्या पाटीच्या फोटोत. आणि मिळालं तर इथे कमेंट करू नका बरं का!