द काश्मीर फाईल्स…सुन्न करणारा अनुभव
माणसाएवढा नीच पशू या प्राणीसृष्टीत नाही.हिंसेचं वेड त्याच्याएवढं कुठल्या प्राण्यात असेल असं वाटत नाही.भूक आणि संरक्षण ही हिंस्त्र पशूंची हत्त्या करण्यामागची कारणं.माणसाचं मांस हे माणसाच़ं अन्न नाही.मग वासना,सूड, प्रभुत्व वगैरे तत्व फ्रॉईडने शोधलेल्या मनाच्या तळाशी,’इड’ मधून बाहेर निघून उच्छाद मांडतात.
द काश्मीर फाइल्स मध्ये असाच नृशंसतेचा नंगा नाच पाहून वरील वर्णनावर विश्वास बसतो.
कुणी एखादा म्हणेल तुम्ही एक बाजू पाहून बोलताय…दुसरी असेलही पण जी पाहिली आहे ती महाभयंकर आहे.१९९० साली काश्मीर मध्ये पंडितांवर झालेला अमानुष अत्त्याचार आणि हाकालपट्टी दोन महत्वाचे प्रश्न निर्माण करतात. एक म्हणजे खो-यातल्या हिंसेतून जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी आपली घरं दारं टाकून मातृभूमी सोडून जम्मू आणि दिल्लीत आश्रयाला आलेल्या , रस्त्यावर तंबू ठोकून ,आपल्याच देशात शरणार्थी म्हणून राहणा-या या बांधवांप्रती कर्तव्याचं पालन तत्कालीन आणि तदनंतरच्या सरकारांनी केलं का? दुसरं त्याहून महत्वाचं कि स्वधर्मीय म्हणून आम्ही भारतातील हिंदूंनी आपली जबाबदारी खरोखर उचलली का? कि केवळ हिंदूंवर झालेल्या धार्मिक अत्त्याचाराचं एक उदाहरण म्हणून कुरवाळत राहिलो ?
आज युक्रेन मधून युद्धामुळे विस्थापित झालेले लाखो नागरिक पोलंड ,रुमानियात शरण घेत आहेत.तिथले लोक जमेल तेवढ्यांना स्वतःच्या घरात ठेवून घेत आहेत.एकट्या पोलंडमध्ये आठ दिवसांपूर्वी २०लाख शरणार्थी होते.अजून ही संख्या वाढेल.युरोप त्यांची काळजी घेण्यासाठी तयार आहे.इथं मात्र स्वतःच्या मालकीच्या एकरोनीशी सफरचंदाच्या बागा आणि सुंदर घरं सोडून हे लोक विपन्नावस्थेत रस्त्यावर रहाण्यासाठी बाध्य झाले होते.
शत्रूराष्ट्राने पेरलेला धार्मिक उन्माद विकराल रूप धारण करून थैमान घालत होता.त्या वणव्यात अनेक हिंदू,शीख ,बौद्धही होरपळून निघाले पण पंडितांवर अतिरेक्यांचं विशेष लक्ष होतं. शेवटी लूट,हत्या व बलात्कार यांचे घाव सोसत हे लोक खो-यातून बाहेर पडले.
शेवटी अनुपम खेरच्या संवादात शब्द येतात कि, “वहाँ मायनॉरिटी तो हम थे,असल में मायनॉरिटी में भी मायनर …दो परसेंट” … कदाचित् राष्ट्रभक्तीची हीच किंमत देशाला अपेक्षित असावी.
आता ३७० संपलं.शेकडो अतिरेकीही मारले.राखे खालचे निखारे निवले आहेत का ? पंडित परत जायची हिंमत करतील का?
यासीन मलिक आणि आसीया अंद्राबी वगैरे लोकांना शिक्षा कधी होणार? कि नाहीच….??
चित्रपट मोठा असूनही विनाकारण लांबल्यासारखा वाटत नाही.लेखक आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आधीच कथेच्या वास्तविकतेची घोषणा करून ती जबाबदारीने व स्पष्टपणे मांडतो.
असाही आक्षेप आहे , कि जरा प्रचारकी बाज दिसतोय तर होय निर्मात्यांची हीच स्पष्ट भूमिका आहे. एक अनन्वित अन्याय मूकपणे इतिहासात दफन होऊ नये यासाठी हा उपद्व्याप आहे.
स्पिलबर्गचा ऑस्कर विनिंग ‘शिंडलर्स लिस्ट’ , चित्रपटात नाझींची बाजू चुकूनसुद्धा मांडत नाही.इथे फुटीरवाद्यांच्या भूमिकेलाही जागा दिली आहे.
अनुपम खेर 🙏 मिथून,पल्लवी,दर्शन कुमार आणि *चिन्मय मांडलेकर अभिनयाची ताकद दाखवतात.🌹
चित्रीकरणाचा दर्जा थोडा अजून चांगला असता तर बरं झालं असतं… असो !!!
धन्यवाद अभिजात फिल्म सोसायटी, लातूर 💐
– अजय पांडे