काश्मीर ही कश्यप ऋषींची कर्मभूमी.महाभारत, बृहत्संहिता, नीलमत या ग्रंथात काश्मीरसंबंधी माहिती आढळते. बाराव्या शतकातील कल्हण पंडिताच्या राजतरंगिणी या ग्रंथात व जोनराज,श्रिवर,प्राज्यभट, व शुक या कवींच्या ग्रंथांवरून १५८८ पर्यंतची काश्मीरसंबंधी ऐतिहासिक माहिती मिळते. पुरातन काळापासून काश्मीरमध्ये असणाऱ्या हिंदु राजांचा इतिहास आपल्याला विविध ग्रंथात व काव्यात आढळून येतो.राजतरंगिणी या ग्रंथावरून काश्मीरमध्ये अनेक शतके गोनर्दीय वंशाचे राज्य होते असे समजते.गोनर्द व त्यांचे तीन वारसदार मगध देशाच्या जरासंधाचे नातलग होते. गोनर्दाने श्रीकृष्णाविरुद्ध जरासंधाला मदत केली होती. त्याच्या कारकीर्दीत कौरव-पांडव युद्ध झाले होते.गोनर्द घराण्यात ३५ राजे होऊन गेले. राजतरंगिणीत त्यांच्यासंबधी माहिती आढळत नसली, तरी रत्नाकर या कवीने त्यासंबंधी माहिती दिलेली आहे. गोनर्दाच्या नंतर तेथे पांडव घराण्यातील राजांनी राज्य केले.सम्राट अशोकापूर्वी तेथे लव, कुश, खाजेंद्र, गोधर, सुवर्ण, जनक हे राजे होऊन गेले.सम्राट अशोक तक्षशिला येथे राज्यपाल असल्यापासून त्याचा काश्मीरशी संबंध आला होता. तो वरचेवर काश्मीरला भेट देत असे. कल्हणाच्या मताप्रमाणे श्रीनगर शहर अशोकाने वसविले. त्याने अनेक स्तूप व विहार बांधले. त्यानेच तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. अशोकाच्या मुलांनी काश्मीरमध्ये राज्य केले. त्याच वंशातील दामोदर याला काश्मीरच्या सरहद्दीवर राज्य स्थापन करणाऱ्या म्लेंच्छांविरुद्ध युद्ध करावे लागले. तेथे ग्रीक-बौद्ध कलेचा विकास झाला.ख्रि. पू. ५१२ च्या सुमारास इराणच्या पहिल्या डरायसने काश्मीरचा प्रदेश जिंकला होता. अलेक्झांडर हिंदुस्थानच्या स्वारीतून परत जात असताना पूंछ व नौशहर येथील राजा अभिसार त्यास शरण गेला.
पहिल्या शतकात कुशाण वंशातील राजा कनिष्क याने काश्मीर जिंकून कनिष्कपूर शहर वसविले. कनिष्क, हुविष्क, जुष्क यांनी तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. कनिष्काने तिसरी बौद्धसभा काश्मीरमध्ये भरविली होती. जुष्कानंतर गादीवर आलेल्या अभिमन्यूने बौद्ध धर्माला विरोध करुन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्यानेच अभिमन्यूपूर गाव वसविले. ५१५ मध्ये हूण वंशातील मिहिरकुल याने काश्मीरवर ताबा प्रस्थापित केला. त्याने तेथे मिहिरेश्वराचे मंदिर बांधले. माळव्याचा यशोवर्मन व मगधाचा बालादित्य यांनी काश्मीरवर हल्ले केल्यामुळे मिहिरकुलाचे राज्य फार काळ टिकू शकले नाही. त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या राजांपैकी युधिष्ठिर नावाच्या राजाला काश्मीरच्या रहिवाशांनी पदच्युत केले. त्यांनी विक्रमादित्याच्या एका नातलगास बोलावून आणून पहिला प्रतापादित्य या नावाने गादीवर बसविले. त्याने प्रजेची चांगली काळजी घेतली.३५० मध्ये काश्मीरमधील हूणांची सत्ता नाहीशी झाली होती तेव्हा गोनर्द घराण्यातील मेघवाहन याला राजपद देण्यात आले होते,तो बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याने मेघवान गाव वसविले. त्याच्यानंतर गादीवर आलेला प्रवरसेन याने नष्ट झालेले श्रीनगर शहर पुन्हा वसविले. सहाव्या शतकानंतर प्रवरपूर ही काश्मीरची राजधानी झाली. प्रवरसेनानंतर गादीवर आलेल्या हिरण्य आणि तोरमाण यांच्यात तंटा सुरू झाला. हिरण्याच्या कारभाऱ्याने उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य हर्ष याची मदत मागितली. तेव्हा विक्रमादित्याने मातृगुप्ताला काश्मीरमध्ये राज्य करण्यास सांगितले. काही काळ काश्मीर उज्जयिनीच्या विक्रमादित्याचे मांडलिक होते. पहिल्या प्रवरसेनाचा नातू दुसरा प्रवरसेन याने मातृगुप्ताला पळवून लावून आपल्या वंशाची गादी परत मिळविली. त्याने विक्रमादित्याचा मुलगा प्रतापशील याजकडून काश्मीर हस्तगत केले. त्याच्यानंतर दुसरा युधिष्ठिर, नरेंद्रादित्य, बालादित्य यांनी राज्य केले. बालादित्याला मुलगा नसल्याने गोनर्द वंश नाहीसा झाला.
सातव्या शतकाच्या पूर्वार्धात बालादित्याचा जावई दुर्लभवर्धन हा काश्मीरच्या गादीवर बसला. यानेच कर्कोट घराण्याची स्थापना केली. दुर्लभवर्धनच्या काळातील अनेक नाणी आजही आपल्याला संग्रहालयात सापडतात. नर्मदेपासून तिबेटपर्यंत दुर्लभवर्धनचे साम्राज्य होते. दुर्लभवर्धनचा मुलगा ललितादित्य यांच्या कार्यकालातील जनतेसाठी केलेल्या जनतेच्या हिताच्या कामाच्या अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख आढळतो,जसे नद्यांचे रुंदीकरण,कालव्याची निर्मिती, देवालये,विश्रामगृहे इत्यादी. त्याने बांधलेले मार्तंडमंदिर व परिहासपूरनगर हे वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने समजले जातात. कर्कोट वंशातील शेवटचा राजा बृहस्पती हा अल्पायुषी होता.बृहस्पतीचा मामा उत्पल याचा नातू अवंतिवर्मन हा ८५५ मध्ये गादीवर आला.त्याने विस्कळीत झालेली काश्मीरची राज्य व्यवस्था सुरळीत केली परंतु त्याचा मुलगा शंकरवर्मन जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने वेठबिगारीसारखी दुष्ट प्रथा तिथे सुरू केली.शंकरवर्मनच्या मृत्यूनंतर काश्मिरात अराजकता निर्माण झाली होती. शंकरवर्मनचा मुलगा गोपालवर्मन हा अल्पायुषी असल्यामुळे त्याची पत्नी सुगंधा हिने पुढे राज्यकारभार पाहिला. इ. स. ९०२ ते ९३९ पर्यंत काश्मीरला राजे तर होते परंतु योग्य राजे न मिळाल्याने ते सतत अस्थिर राहिले. ९३९ मध्ये काश्मीरमध्ये उत्पल घराण्याच्या यशस्कर राजाने लोहर घराण्यातील दिद्दा या राजकुमारीशी विवाह केला तो ९४८ मध्ये मरण पावला.त्याच्या मृत्यूनंतर दिद्दा हिने तिचा अल्पवयीन व अल्पायुषी पुत्र अभिमन्यु याची पालनकर्ता म्हणून सुरुवातीस राज्यकारभार पाहणारी मुख्य आणि शेवटी सर्वश्रेष्ठ सत्ताधीश राणी म्हणून तिने ९८१ ते १००३ पर्यंत सत्ता गाजविली.ती मरण पावल्यानंतर उत्पल घराण्याचे कोणीही वारसदार नसल्यामुळे तिचा लोहर घराण्यातील भाचा संग्रामराज याला काश्मीरचे राज्य मिळाले.
संग्रामराज हे लोहर घराण्याचे संस्थापक होते.त्यानी १००३ ते १०२८ पर्यंत राज्य केले. तो कर्तबगार होता. त्याच्या कारकीर्दीत काश्मीरची भरभराट झाली. त्याच्यानंतर हरिहरराज, अनंतदेव हे राजे होऊन गेले. अनंतदेवाची पत्नी सूर्यमती ही कर्तबगार असून, हळूहळू तिने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. तिचा मुलगा कलशाने राज्यकारभार हातात घेतल्यावर अनेक सुधारणा केल्या. त्याने काश्मीरच्या पश्चिमेकडील उरशा (हजारा) पासून पूर्वेकडून कस्तवतपर्यंतचा प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला.कलशाचे शेवटचे दिवस त्याचा मुलगा हर्ष याच्याशी भांडण्यात गेले. हर्षाची विश्वासघातकी वागणूक पाहून कलश दु:खमग्न झाला. त्याने त्याचा धाकटा मुलगा उत्कर्ष यास गादीवर बसवून हर्षाला तुरुंगात टाकले. १०८९ मध्ये हर्ष मेल्यानंतर उत्कर्षाला राज्यपद मिळाले. तो विद्वान व कवी होता. त्याला अनेक भाषा येत होत्या. तो कलेचा भोक्ता होता. ११०१ मध्ये तो मेल्यानंतर लोहर घराण्यातील उच्चल्ल (११०१–१२) सुस्सल (१११२–२०) आणि जयसिंह (११२८–५५) यांनी काश्मीरमध्ये राज्य केले. परंतु राज्यातील अंतर्गत कलहामुळे हिंदू राजांची सत्ता दुर्बळ झाली. या दुहीचा फायदा परकीयांनी घेऊन त्यांनी काश्मीरवर स्वाऱ्या केल्या.
महंमुद गझनीने १०१५ व १०२१ साली काश्मीरवर दोनदा स्वारी केलीपण त्यांत त्याला यश आले नाही. बाराव्या शतकात सुस्सल व भिक्षाचार यांच्यात यादवी चालू असताना तुर्कांनी काश्मीरवर स्वारी केली. सुमारे १२९५ ते १३२५ पर्यंत काश्मीरच्या गादीवर राजा सिंहदेव राज्य करीत होते. त्यांच्या कारकीर्दीत तिबेटमधून रिंचिन व स्वातमधून शाह मीर हे मुस्लिम नोकरीसाठी काश्मीरमध्ये आले. राजाकडे नोकरी धरल्यामुळे या दोघांना लवकरच जहागिऱ्याही मिळाल्या. ते धोकेबाज होते ते सिंहदेवाविरुद्ध उठले.याच सुमारास चंगीझखानाच्या वंशातील एकाने काश्मीरवर स्वारी केली. सिंहदेव भुमीगत झाले,तेव्हा राजाचा प्रधान रामचंद्र याने स्वतः राजा झाल्याचे जाहीर केले. रिंचिनने या रामचंद्राचा खून करुन स्वतःच्या हातात काश्मिरची सत्ता घेतली.रिंचीन हा धोकेबाज मुस्लिम नोकर होता जो काश्मीरचा पहिला मुसलमान सत्ताधीश होय. रिंचिनने रामचंद्राची मुलगी कोटा राणी हिच्याशी लग्न केले. परंतु रिंचीनसोबतच आलेल्या दुस-या मुस्लिम शाह मीर या सरदाराने धोक्याने १३४३ मध्ये शाह मीर शम्सुद्दीन हे नाव धारण करून काश्मीर राज्य हातात घेतले. १३४३ पासून काश्मीरमध्ये मुसलमानांचे राज्य सुरू झाले. १३४३ ते १५५४ पर्यंत अनेक सुलतान होऊन गेले. १५३२ मध्ये हुमायूनचा भाऊ कामरान याने काश्मीरवर स्वारी केली परंतु त्याला यश आले नाही. १५५४ ते १५८६ पर्यंत काश्मीरमध्ये चक घराण्याची सत्ता होती. चक हे शिया पंथाचे होते. गाझीखान हा या घराण्यातील पहिला सत्ताधीश. त्याने अनेक हिंदूंना बाटविले अतोनात छळले.चक घराण्यात सात सत्ताधीश होऊन गेले. त्यांच्या कारकीर्दीत काश्मीरमध्ये यादवी माजली. चकांच्या काळात काश्मीरचे स्वातंत्र्य नष्ट झाले.परंतु छत्रपती शिवरायांच्या उदयानंतर भारतभर पसरलेल्या जुलमी, परकीय मुस्लीम मोगली सत्तेचा विनाश होण्यास सुरुवात झाली.याच मोगली सत्तेच्या पडत्या काळात मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणातील वरचष्मा पाहून जम्मूचे राजे रणजितदेव यांनी दुर्रानीचे वकील आपल्या राज्यातून हाकून लावले होते पण पुढे अहमदशाह दुर्रानीने काश्मीर जिंकल्यापासून तेथे अफगाणसत्ता सुरू झाली. १८१९ पर्यंत त्याची सत्ता तेथे होती. अफगाणांच्या जुलमाला कंटाळून काश्मीरच्या पंडितांनी रणजितसिंगाची मदत मागितली. ही मदत रणजितसिंगाने ताबडतोब दिली. १८१९ मध्ये पठाणांचा पराभव झाला.गुलाबसिंग हे काश्मीरमधील डोग्रा घराण्याचे संस्थापक होय. जम्मू भोवतालच्या प्रदेशात राजपूत सत्ताधीशांची सत्ता होती. मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागली, तेव्हा राजा ध्रुव व त्यांचा मुलगा राजा रणजितदेव यांच्या नेतृत्वाखाली सर्व राजपूत एकत्र झाले. गुलाबसिंग हे याच रणजितदेव वंशातील होते. जम्मूमध्ये गोंधळ आहे असे पाहून रणजितसिंगानी १८०८ मध्ये भाई हुकूमसिंगाला जम्मू शीख राज्यात समाविष्ट करण्याची आज्ञा दिली. १८१५ ते १८२० च्या काळात गुलाबसिंगानी सरहद्दीवरील लढ्यात प्रामुख्याने भाग घेतला.१८४१ साली त्यांनी किश्तवार, लडाख, बल्टिस्तान हे प्रांत काश्मीर राज्यास जोडले. १८४५ साली झालेल्या इंग्रज-शीख युद्धात गुलाबसिंग तटस्थ राहिले. इंग्रजांना जय मिळाल्यानंतर त्यांनी गुलाबसिंगाला काश्मीर प्रांत सोडुन दिला. गुलाबसिंगाने त्यानंतर गिलगिट प्रांत जिंकला. अशा तऱ्हेने काश्मीर संस्थान अस्तित्वात आले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थाने जेव्हा भारतीय संघराज्यात विलीन झाली, त्या वेळी जम्मू व काश्मीरच्या राजाने भारतात विलीन हेण्याबाबत निर्णय देण्यास विलंब लावला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानिकांना भारताशी ‘जैसे थे करार’ करण्याची परवानगी होती. भारत आणि काश्मीर संस्थान यांच्यात’जैसे थे करारा’ संबंधी चर्चा होण्यापूर्वीच पाकिस्तानने काश्मीरच्या सरहद्दीवर हल्ले सुरू केले. २० ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने काश्मीरवरील आक्रमणाचा दिवस मुक्रर केला होता त्यावेळी काश्मीरच्या महाराजांनी भारत सरकारकडे लष्करी मदत मागितली. जम्मू व काश्मीरला मदत देण्यापूर्वी भारत सरकारने तेथील महाराजांशी सामीलनाम्याचा करार करून घेतला. गव्हर्नर जनरल माउंटबॅटनने या कराराला संमती दिली. अशा तऱ्हेने कायदेशीररीत्या जम्मू आणि काश्मीर हे २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात विलीन होऊन एक घटक राज्य झाले.नेमके चुकले कुठे मग आणि काश्मीरमध्ये नासुर कसा तयार झाला हे पुढच्या भागात.
क्रमशः
ॲड.रजनी गिरवलकर