महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेवुन जाणार हाच माझा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
” महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सरलेल्या 05 डिसेंबर 2024 रोजी मुंबईस्थित आझाद मैदानावर राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली आणि एका नविन युगाचा प्रारंभ झाला. तिसर्यांदा मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेताना ज्या मैदानावर सुमारे 41 वर्षांपुर्वी पक्षाचे अधिवेशन झाले होते. तिथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘अँधेरा छटेगा, कमल खिलेगा’ हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये संबोधनाद्वारे भरला होता. त्यांचेच वारसदार असलेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्रजींचा शपथविधी हा सुवर्णयोग म्हणावा लागेल. ऐतिहासिक आणि अभूतपुर्व शपथविधी नयनी पहाताना आयुष्य झिजवणार्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या खडतर परिश्रमाचे यश किती छान..? हा प्रत्यय येवुन गेला. बहुमताचं फुललेले कमळ ज्या पाकळ्यांनी राजकिय अंध:कार दुर करून टाकला. मंत्रालयाच्या दरवाजात पहिला पाऊल टाकताना मुख्यमंत्री म्हणुन त्यांनी पुण्याच्या एका गरिब कुटुंबियांना वैद्यकिय सहाय्यता निधीद्वारे पाच लाखाच्या चेकवर केलेली सही त्यातुन नेतृत्वाची संवेदनशीलता प्रकट झाली. केवळ विकासाचं राजकारण करणारा चेहरा म्हणुन ज्यांची ओळख त्यांच्या दुरदृष्टीला नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त महाराष्ट्र एवढेच नव्हे तर सिंचन त्यासाठी ग्रीन एनर्जीचं स्वप्न यापेक्षाही अधिक राज्य चालवताना समाजामधील सर्व घटक समावेशक अर्थात वंचित, उपेक्षित, दीनदलित, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेकार, मजुर, सामान्य माणुस एवढेच काय..? पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे अंत्योदय त्यातच शेवटच्या माणसाचं कल्याण साध्य करण्याचा संकल्प घेवूनच त्यांनी मुख्यमंंत्री पदाच्या खुर्चीवर आसनस्थ झाले. माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अनुवाद प्रिंट मिडियासाठी करण्याचा आम्ही केलेला खटाटोप. “
प्रश्न -मुंबईस्थीत आझाद मैदानावर सुर्यास्त समयी राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेताना ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार उसळलेल्या समुद्राच्या लाटांप्रमाणे जमलेली अभूतपुर्व गर्दी त्यातला जनसागर पाहिल्यानंतर आपल्या मनात काय भाव उमटले..?
उत्तर – त्या क्षणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीतच. पण सर्वांना आनंद वाटावा असा सोहळा होता. वास्तविक पहाता राजकिय क्षेत्रात प्रवेश करताना सत्तापदाचे एवढे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. संघ परिवार आणि पक्षाच्या विचाराने प्रेरित होवुन राष्ट्र धर्म आणि भारतमातेची सेवा करावी त्याच प्रवाहात असताना नियत अर्थात परमेश्वराची साथ आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी एवढेच नाही तर माझे सहकारी पक्षाचे, विचाराचे तमाम कार्यकर्ते या सर्वांच्या आशिर्वादाने मला तिसर्यांदा संधी मिळाली माझं भाग्य. अर्थात पदाचा आनंद त्यापेक्षा जबाबदारी वाढली या कर्तव्याची जाणिव. राज्य प्रगतीच्या दिशेने जाताना आनंद साजरा करत बसण्यापेक्षा जनादेशाचा सन्मान करीत जनसेवेसाठी समर्पण करण्याची वेळ माझ्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यावर येवुन ठेपली. मोठ्या आनंदाने लोकसेवेला प्रारंभ आम्ही सारे कार्यकर्ते करणार.
प्रश्न – महाराष्ट्र आता थांबणार नाही..?
उत्तर – हे खरं आहे की, अडीच वर्षापुर्वी मविआ सरकार उखडुन टाकताना माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून राज्य विकासाला गती दिली. दरम्यान अजितदादा पवार आमच्यासोबत आले. यापुर्वी 2014 ला मुख्यमंत्री म्हणुन काम करताना अनुभवाची शिदोरी माझ्यासोबत होती. त्या काळात आम्ही सुरू केलेल्या प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यामुळे विकासाच्या गाडीला ब्रेक बसला होता. मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही अर्धवट राहिलेले इन्फाटेकचे सर्व प्रकल्प मार्गी लावुन घेतले. जनतेसाठी काम आम्ही करतो हा विश्वास लोकांना पटला. जुने प्रकल्प पुर्ण करताना नविन योजना पुर्णत्वाकडे नेल्या. नदी जोड हा प्रकल्प माझे व्हिजन असुन नविन चार नद्या जोड प्रकल्पाला आम्हीच मान्यता दिली. येत्या पाच वर्षात चार नद्या जोडल्या तर खर्या अर्थाने महाराष्ट्र दुष्काळ मुक्तीकडे जावु शकतो.
प्रश्न – ग्रीन एनर्जी आपला महत्वाकांक्षी प्रकल्प..? इन्फ्रामॅन अशी तुमची ओळख, मुंबईचा चेहरा तुम्ही बदलुन टाकला. पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्र कुठे असेल..?
उत्तर – मुंबईसाठी 2016 मध्ये पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली घोषणा झाली होती, मुंबईच्या एमएमआर रिजनच्या कोणत्याही भागातुन कुठेही जाण्यासाठी एक तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. त्यामागे दुरदृष्टी दळणवळणाची झेप निश्चित होती. अत्याधुनिक वाहतुक रचना आम्हाला करणे गरजेचे वाटले. त्यानुसार मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार झाला. वरळी-बांदा सिलिंक, बांद्रा-वर्सोवा सिलिंक कामही पुर्ण झाले. वर्सोवा-मड या कामाचे टेंडर निघाले. मड ते विरारपर्यंतचा नवा सिलिंक तयार आम्ही करणार. एवढेच नाही तर मी, जेव्हा जपानला गेलो त्या सरकारकडून प्रकल्पासाठी 40 हजार कोटी रूपये देण्याचे मान्य करून घेतले. काम देखील लवकरच चालु होईल. मुळात महानगराचा विकास खरं तर त्या शहराच्या वाहतुक यंत्रणेवर बराच अवलंबुन असतो. कमी वेळेत अधिक काम झाले पाहिजे. सध्या मुंबईची 60 टक्के ट्रॅफिक ही वेस्टर्न एक्सप्रेस वेवरून पुर्ण कंजेस्टेड होवुन जाईल. विरार-अलीबाग कॉरीडॉरचे काम सुरू आहे. अटल सेतु तयार झाल्यामुळे नवी मुंबई ते मुंबईमधील अंतर 22 किमीने कमी झाले. 375 किमी मेट्रो नेटवर्क तयार होत आहे. ही सर्व कामे जेव्हा 100 टक्के पुर्ण होतील वाहतुक वेळ वाचेल आणि त्याचा उपयोग राज्य विकासाला होवु शकतो.
प्रश्न – मुंबईत मराठी माणसाला आपले हक्काचे घर मिळवण्यासाठी होणारा त्रास त्याचं काय..?
उत्तर – हे खरं आहे की, मराठी माणसाला शहरात घर मिळालेच पाहिजे यात शंका नाही. त्याकरिता बीबीडी चाळ, अभ्युदय नगरसारख्या योजना असतील. सेल्फ रिडेवलपमेंटसाठी आम्ही गृहनिर्माण संस्थांना सहकार्य करणार ज्यामुळे जमिनी बिल्डरांच्या घशात जाणार नाहीत. रिडेवलपमेंटच्या सतरा मागण्या आम्ही मान्य केल्या. शिवाय मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातुन प्रविण दरेकर यांनी घरासाठी योजना सुरू केली. सोळा बिल्डिंग आजवर तयार झाल्या आहेत. एकुण 1400 बिल्डिंगचा प्रस्ताव ध्यानात असुन ही लँड लॉक सिटी असल्याने गृहनिर्माण प्रकल्पाला मर्यादा येते. म्हणुनच आम्ही नविन रस्त्याचे जाळे निर्माण करत असताना मुंबईप्रमाणेच आणखी तीनपट मोठी मुंबई करण्याचा मानस असुन ते अटल सेतुमुळे शक्य होत आहे. विस्तारित भागात मराठी माणसाला घर देणे सोपे होणारच.
प्रश्न – धारावी प्रकल्पावरून विरोधकांची ओरड चालु असते, त्याचे काय..?
उत्तर – हे खरं आहे की, या प्रकल्पाची संकल्पना स्व.राजीव गांधींच्या काळात मांडली. तदनंतर अनेक सरकारे त्यांच्याच विचाराची आली. मात्र कुणीच लक्ष्य दिलं नाही. 2014 नंतर मीच मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा डिपीआर तयार केला. त्यासाठी रेल्वेची अधिकची जागा खरेदी केली. विकासक नियुक्त करून प्रकल्प पुढे घेवुन जातानाच 2019 मध्ये ठाकरे सरकारनं सत्तेवर येताच प्रकल्प थांबवला. खरं तर त्या काळात अदानीकडे प्रकल्प नव्हता. मात्र ठाकरेंनी काढलेले टेंडर रद्द केले. नवे नियम आणि अटी लावुन दुसरे टेंडर काढले. त्यांचेच टेंडर आम्ही सत्तेत आल्यानंतर कायम ठेवले. नॉर्थ वर्डस वापरण्याऐवजी साऊथ वर्डस वापरण्याची मी परवानगी दिली ज्यामुळे विकासाची टिडिआरची मोनोपोली रहाणार नाही. डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला. पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर प्रकल्पाला प्राधान्य द्यायचे ठरल्यानंतर अदानी समुहाला काम मिळाले. जे पात्र आहेत त्यांना घरे मिळेल. ज्यांना नियमात बसता येत नाही, त्यांच्या करिता रेंटल हाऊसिंग पर्याय आम्ही ठेवला आहे, ज्यामुळे आज ना उद्या त्यांना घर मिळेल.
प्रश्न -राज्याचे व्हिजन..?
उत्तर – मुख्यमंत्री म्हणुन कारभार करताना सबका साथ, सबका विकास महायुतीचे सर्व घटक पक्षांना सोबत घेवुन समाजातील वंचित, उपेक्षित, गरजु लोकांना न्याय मिळवुन देणार. शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला कल्याण एवढेच नव्हे तर रस्ते विकास, दळणवळण, सिंचन, मुलभुत पायाभुत सुविधा ज्यातुन ग्रामविकास, सामान्य माणसाच्या कल्याणासाठी जास्तीचा वेळ देताना हे राज्य प्रगतीकडे घेवुन आम्ही जाणारच. दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने प्रगतीचे पाऊल पुढते रहाणार यात शंका नाही. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक प्रशासन आणि निवडणुक काळात जाहिरनामाद्वारे दिलेल्या वचनाची पुर्तता केल्याशिवाय रहाणार नाहीत. ग्रामविकास हा देखील आमचा शहरासोबतच अजिंडा आहे.
प्रश्न – तुम्ही बहुमताने सत्तेवर आलात तरी विरोधकांनी ईव्हीएमचा नावाच्या शंकाने घेत ओरडायला चालु केले, काय सांगाल..?
उत्तर – स्पष्ट सांगायचं म्हटलं तर हा 100 टक्के मुर्खपणा म्हणावा लागेल. पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा विजय सहन होईना म्हणुन नको त्या गोष्टीचे खुपसट काढून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. झारखंड आणि राज्यात एकाच वेळी निवडणुका झाल्या. तिथे विरोधक सत्तेवर आले. आम्ही इथे आलो. एवढेच काय राज्यात देखील लातुरसारख्या शहरात काँग्रेसचा विजय आणि ग्रामीण भागात भाजपचा विजय, नांदेड लोकसभेत काँग्रेसचा विजय आणि विधानसभेत महायुतीचा. एक सांगा, ईव्हीएमचा दोष असता तर मग असे निकाल आले असते का..? राहुल गांधीनींच आत्मपरीक्षण करून घेतलं तर खर्या अर्थाने बरं होईल.
प्रश्न – तुमच्याविषयी विरोधकांनी नाही त्या शब्दांत आरोप-प्रत्यारोप केले. अगदी कुटुंबापर्यंत विरोधकांनी तोंडसुख घेतलं, त्यात काही जणांनी स्वत:ची लायकी सोडून देखील अपशब्द वापरले, आता तुम्ही याकडे कसं पहाणार..?
उत्तर – खरं तर मी विरोधकांचे आभारच मानतो. त्यांनी माझा सतत द्वेष केल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात माझ्याबद्दल सहानुभुती वाढली. विरोधक, सोशल मिडियावरील त्यांचे ट्रोलर अत्यंत असभ्य भाषेत मला व माझ्या कुटुंबियांना यांनी बदनाम केलं. त्याचा मानसिक त्रास थोडा झाला मात्र जनतेच्या मनात माझ्याविषयी चांगली जागा मिळाली. बदनामीची निराशा न येता विरोधकांच्या सोबत लढण्याची जिद्द आणि प्रेरणा मिळाली. त्यांना हारवूनच मी अपमानाचा बदला घेतला. त्यामुळे मला कुणाच्याविषयी किंचितही आसुया राहिली नाही. सुडाभावाचं तर राजकारण आयुष्यात मी केलंच नाही.
प्रश्न – तीन पक्षाची महायुती, सरकार चालवताना तारेवरची कसरत..?
उत्तर – अडीच वर्षाचा झालेला सराव सकारात्मक आणि आमच्यातला एकसंघ भाव एकनाथराव, अजितदादा आमची अंतर्मनाची एकरूपता त्यामुळे हे राज्य एकसंघ पुढे घेवुन जाण्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही करवुन दाखवु. मंत्रीमंडळातील सहकारी सर्व आमदार आणि संघटनात्मक मान्यवर पदाधिकारी विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनाच सोबत घेवुन जाताना सबका साथ, सबका विकास हेच आमचं सुत्र.
प्रश्न – राज ठाकरे लोकसभेच्या वेळी सोबत होते, विधानसभेला सोबत राहिले नाहीत. पुन्हा जवळीक..?
उत्तर – हे खरं आहे की, राज ठाकरेंच्या मनसेने मनाचा मोठेपणा दाखवून लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला. त्याचा फायदाही आम्हाला झाला. विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन पक्ष एकत्र संभाव्य राजकिय परिस्थिती एकत्र येण्यासारखी राहिली नाही. राज ठाकरे ज्यांचा स्वत:चा एक मोठा पक्ष आहे. विधानसभेची निवडणुक लढवणे त्यांनाही अनिवार्य होते. त्यांच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मतदान चांगले पडले. त्यांच्या पक्षाचे विचार आमच्याशी जुळतात. त्यामुळे भविष्यात त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आनंदच रहाणार. महानगरपालिका, नगरपरिषदेत शक्य तिथे सोबत ठेवणारच.
प्रश्न – लाडक्या बहिणीचं काय..?
उत्तर – महायुतीचं सरकार बहुमताच्या विजयात राज्यातील माता-भगिनी अर्थात लाडक्या बहिणींचा फार मोठा सिंहाचा वाटा हे आम्ही नाकारू शकत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आम्ही चालु केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड विरोध योजनेलाच केला. काँग्रेससह अनेकजण योजना रद्द करण्यासाठी कोर्टात गेले. पण, आम्ही महिला कल्याणासाठी म्हणुन योजना सुरू केली. निवडणुकीच्या अगोदर आम्ही त्यांना वचनाप्रमाणे हाप्ते मिळवुन दिले. योजना कधीच बंद होवू देणार नाही. महिलांच्यासाठी या राज्यात यापेक्षाही अधिक वेगवेगळ्या स्तरावर चांगले निर्णय आम्ही घेणारच. ज्यांनी विरोध केला तेच विरोधक आता पराभूत झाल्यानंतर योजनेचा हाप्ता वाढविण्याची मागणी करतात हे हास्यास्पद असुन आता आमचं सरकार सक्षम आहे. विरोधकांच्या सल्ल्याची गरज भासणार नाही. लाडक्या बहिणींमुळे बहुमताने महायुती सत्तेत आली त्याबद्दल राज्यातील तमाम माता-भगिनींचे आभार मानावे तेवढे कमीच. विरोधकांनी विकासाच्या प्रश्नावर विरोध न करता सकारात्मक भुमिका घेतली तर प्रगतीच्या मार्गावर अडथळे निर्माण होणार नाहीत एवढेच सांगतो.
मुख्यमंत्र्यांची सडेतोड मुलाखत – राम कुलकर्णी
(भाजपा प्रदेश प्रवक्ता) मो.9422742577
=======================