लोकमंगलच्या कर्जामुळे द्राक्ष बागायतीला नवी दिशा
सोलापूर…..“द्राक्ष बागायती हे पैसा कमावण्याचे चांगले साधन आहे असे लोकांंना वाटत असते पण द्राक्ष बागायतदाराला किती कसरती कराव्या लागतात आणि निसर्गाच्या एका फटक्याने लाखो रुपयांचे हिशेब कसे कोलमडतात हे त्यांंना माहीत नसते. या बाबतीत एकच गोष्ट सांगावी वाटते. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ अशी कसरत करतानाच या व्यवसायातली नवी क्षितिजेही शोधावी लागतात. ती शोधताना लोकमंगल मल्टीस्टेटच्या कर्जाने मला चांगलाच हात दिला आहे.“
तुळजापूर तालुक्यातल्या काटगावचे तरुण द्राक्ष बागायतदार विक्रांत रोकडे यांच्याकडे सात एकर द्राक्ष बाग आहे. त्यांनी डिपिंग मशीन खरेदी करण्यासाठी लोकमंगल मल्टीस्टेटच्या काटगाव शाखेतून 7 लाख 50हजार रुपये कर्ज काढले आहे. हे मशीन 9 लाखाचे आहे. पण पदरचे सव्वा लाख घालून त्यांनी ही खरेदी केली. एवढेच नव्हे तर या कर्जाचे हप्तेही ते वेळेवर फेडत आहेत. व्यवस्थापनाने त्यांची गणना चांगल्या कर्जदारात केली आहे.
तसा हा व्यवहार ऐकायला सोपा जातो पण द्राक्ष बागायतीची दिशा बदलून निर्यातदार द्राक्ष बागायतदार होण्याचा प्रयत्न करण्या साठी हे कर्ज काढताना कितीतरी गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय कर्ज देणार्या संस्थेने सहकार्याच्या भावनेने आणि सकारात्मक मनाने कर्ज दिले तर या गोष्टी आणखी सोप्या होतात. ही प्रक्रिया विक्रांत रोकडे यांच्याच तोंडून ऐकावी लागेल.
“द्राक्ष बागायतदारांना अतोनात खर्च करावा लागतो पण तो करताना द्राक्षाला भाव किती मिळेल याची अनिश्चितता त्याच्या मनाला पोखरत असते. त्यावर एक उपाय म्हणजे निर्यात. द्राक्ष परदेशी पाठवले की चार पैसे जास्त मिळतात. मग भावाची तेवढी काळजी रहात नाही. मात्र ते काही तेवढे सोपे नाही. निर्यात करायची असेल तर निर्यातक्षम दर्जेदार माल तयार करावा लागतो. तिथे पुन्हा नवे खर्च पुढे येतात.”
“निर्यात योग्य माल तयार करण्यासाठी डिपिंग मशीन आवश्यक आहे. पण, तिची किंमत 9 लाख रुपये आहे. एवढी गुंतवणूक स्वत:ला शक्य होत नाही. म्हणून कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतो. सहा एकर बागेच्या मालकाला तोही परवडत नाही. म्हणून बँका आणि अन्य संस्था त्यासाठी कर्ज देत नाहीत. पण लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहनभय्या देशमुख यांनी स्वत: शेताला भेट दिली आणि या यंत्रासाठी कर्ज देण्याचा धाडसी निर्णय घेतला.”
“एकदा कर्ज घेतले की, त्याच्या हप्त्याचा तगादा सुरूच होतो. अजून मालाची विक्री सुरू झालेली नसते. मात्र आमच्या काटगावात 200 एकरावर द्राक्ष बागा आहेत. त्यांच्या मालकांनाही डिपिंग मशीनची गरज आहे. मी माझ्या शेतात माझ्या मशीनचा वापर केला आणि उरलेल्या वेळात इतरांच्या बागांत काम करून त्यांच्याकडून पैसे घेतले. या मशीनचे एकरी भाडे अडीच हजार रुपये आहे. त्यातून हप्ता फेडण्याची तर सोय झाली.
गावातल्या इतर बागायतदारांनाही स्वत:चे मशीन आणून लाखो रुपये न गुंतवता डिपिंगची सोय झाली. त्यातून माझ्या बागेतला माल तर निर्यातयोग्य झालाच पण गावातल्या जवळपास सगळ्या शेतकर्यांना कमी पैशात ही सोय मिळून सारे गाव निर्यातयोग्य द्राक्ष बागायतीचे गाव झाले. मल्टीस्टेटचे संचालक श्री. बालाजी शिंदे रिजनल मॅनेजर रामकृष्ण तांबे मॅनेजर रतन सुरवसे आणि दिलीप गाजरे यांनीही विधायक दृष्टिकोन स्वीकारून सारे मार्गदर्शन केले त्यामुळेही सारा व्यवहार सुरळीत झाला.”