24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसाहित्यदेवेंद्र भुजबळ यांची मुलाखत

देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत

माणुसकी हाच परमार्थ

  • देवेंद्र भुजबळ

जीवनात प्रत्येकाने स्वार्थ साधला पाहिजे. कारण आपल्या गरजा भागवण्यासाठी कुणी पुढे येत नाही.आपल्या गरजा आपल्यालाच पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी स्वार्थ साधणे आवश्यक आहे. परंतु यापलीकडेही जीवन आहे. ते म्हणजे गोरगरिबाला, गरजू व्यक्तीला आपल्याकडून जी मदत करता येईल, ती आपण केली पाहिजे, यालाच मी परमार्थ समजतो. सामाजिक सेवेचा वसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

श्री भुजबळ यांना मिळालेल्या “माणुसकी सेवा पुरस्कारा”च्या अनुषंगाने ‘कोकण नाऊ’ या चॅनलच्या “प्रभाते मनी ” या कार्यक्रमात
मेघना साने यांनी नुकतीच त्यांची थेट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी आता अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे आपली आवड कशात आहे ? हे ओळखून अभ्यासक्रम निवडल्यास निश्चितच जीवन आनंदाने जगता येईल असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे या पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले.

या मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, आज लोकांमधील माणुसकी हरवत चालली आहे. मनाच्या संवेदना हरपत आहेत. आपल्यासमोर एखादा अपघात झाला तरी, आपण त्याकडे न पाहता,मदत न करता तेथून निघून जातो. एकमेकांची दुखः आपण जाणून घेत नाही, समजून घेत नाही. मदतीची भावना तर दूरच राहते, असे सांगून आपल्याला जमेल ती मदत आपण इतरांना केली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.

श्री भुजबळ यांनी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आवडीनुसार क्षेत्र निवडू द्या, असा मोलाचा सल्ला दिला.

अनेक पालकांचा आग्रह असतो की, आपल्या मुला-मुलीने डॉक्टर, इंजिनीअर किंवा अधिकारी बनले पाहिजे. परंतु त्यात त्या मुलाची किंवा मुलीची आवड नसेल तर ते आनंदी किंवा समाधानाने राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या, जेणेकरून ते आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतील आणि त्यांना आत्मिक समाधानही मिळेल. मीही माझ्या आवडीचे पत्रकारिता हे क्षेत्र निवडले आणि त्यात यशस्वी झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पालकांनी आपल्या महत्वाकांक्षा, अपेक्षा मुलांवर लादू नये अथवा अमुकच कर, तमूकच कर, असा दुराग्रह धरता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारावीनंतरचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. जसे गुजरातला निव्वळ ‘एन्टरप्रिन्युअरशिप’ म्हणजे उद्योजक बनण्याचा अभ्यासक्रम आहे, कितीजण तिकडे जातात ? असे सांगून मुंबईत मेरी टाईम म्हणजे समुद्राशी संबंधित अभ्यासक्रम आहे. जगातील बहुतांशी निर्यात विमान, रेल्वेने होत नाही तर ती समुद्रमार्गे होते. म्हणून त्याच्याशी निगडीत हा अभ्यासक्रम आहे. नवी मुंबईत भारत सरकारची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ‘फॅशन टेक्नॉलॉजी ‘ ही संस्था आहे. यात कपड्यांशी संबंधित, इंटेरियर डिझाइन या व अशासारख्या शाखा आहेत. किती जणांना हे माहित आहे ? असा सवाल करुन पुणे जिल्ह्यात नॅशनल डिफेन्स अकॅडमी ,आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज,कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, लोणावळा येथे नॅशनल नेव्हल अकेडमी, औरंगाबाद येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भोपाळ येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अशा अनेक संस्था आहेत. याकडे महाराष्ट्रातील किती मुलं- मुली जातात ? या उलट परराज्यातील मुलं- मुली तिथे जातात, शिकतात आणि यशस्वी होतात. म्हणून आपल्याकडील मुला- मुलींनी तसेच त्यांच्या पालकांनीही सतर्क राहिले पाहिजे, असे देवेंद्र भुजबळ यावेळी म्हणाले.

दहावी, बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही शासनाचे अनेक अभ्यासक्रम असून शिक्षण अर्धवट राहिले म्हणून नाउमेद न होता,पडेल ते काम आयुष्य भर करीत न बसता,व्यवसायाभिमुख असे अभ्यासक्रम त्यांनी
करून नव्या उमेदीने जीवनात पुढे जावे ,असे सांगितले. यावेळी भुजबळ यांनी त्यांच्या
‘करिअरच्या नव्या दिशा’ पुस्तकातील अनेक अभ्यासक्रमांचा उल्लेख केला.

युवकांना, बेरोजगारांना सल्ला देताना ते म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या वाट्याला जे काम येईल, त्याची लाज, शरम न वाटू देता इमानेइतबारे ते काम केल्यास यश तुमचेच आहे. ते तुमच्यापासून दूर जावू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काम करणाऱ्यासाठी भरपूर संधी आहेत, त्याचा लाभ उठवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या मुलाखती दरम्यान मुलाखतकार मेघना साने यांनी बर्‍याच विषयावर भुजबळ यांना बोलते केले. त्या सर्व विषयांची त्यांनी मोकळेपणाने माहिती दिली.
ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंकवर पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
-टीम एनएसटी
☎️9869484800.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]