*देवेंद्र भुजबळ: एक प्रेरणास्थान*

0
602


 
फुलाचा सुगंध हा एकाच दिशेने पसरतो पण व्यक्तीच्या कार्याचा सुगंध हा चारही दिशेने पसरतो  “

 न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांना ६ जानेवारी, या पत्रकार दिनी विकास पत्रकारितेतील कार्याबद्दल अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा
“चौथा स्तंभ पुरस्कार” पुरस्कार मुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर ८ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नी,
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना माळी समाज मंडळ,ठाणे या संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.परत १४ जानेवारी रोजी
श्री देवेंद्र भुजबळ यांना सांस्कृतिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या एकता कल्चरल अकादमीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते गिरगाव येथील साहित्य संघाच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात देण्यात आला.

एकाच आठवड्यात ३ पुरस्कार मिळवून भुजबळ दापत्याने पुरस्काराची हॅटट्रिक केली आणि साहजिकच त्यांच्या विषयी मला कुतूहल वाटू लागले आणि मी जाणून घेतल्या त्यांच्या जीवन प्रेरणा, संघर्ष आणि समाजासाठी कर्तव्य भावनेने देत असलेले योगदान.त्यांच्याशी झालेली बातचीत आपल्याला नक्कीच प्रेरणादायी वाटेल,असा विश्वास आहे .


    
बालकाच्या जन्मापासून ते मानवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तीची जडणघडण वेगवेगळे वातावरण, जीवन प्रवासात मिळत जाणाऱ्या व्यक्ती, आयुष्यात घडणारे प्रसंग यानुसार परिवर्तित होत जाते आणि वर्तनातून प्रतिबिंबित  होते. असाच सुंदर जीवन प्रवास
श्री. देवेंद्र भुजबळ यांचा आहे. व्यक्तीच्या जीवनात जे बदल घडत जातात त्याच्या पाठीमागे प्रेरणा आणि मार्गदर्शन यांचा पाठिंबा असतो. तू काहीही कर, पण इतरांपेक्षा वेगळं कर हा विचार मनात रुजवणारी त्यांची आई त्यांच्या प्रेरणेचे मुख्य स्थान आहे.

देवेंद्रजी हे मूळचे विदर्भातील अकोल्याचे आहेत. 4 जुलै 1960 त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
    
जोपर्यंत वडिलांची सावली ईश्वरासमान पाठीशी होती तोपर्यंत शिक्षण चांगले झाले . पण वडिलांचा सहवास फार कमी काळ त्यांना लाभला .ते चौथीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तिथूनच संघर्षमय जीवनाची वाटचाल सुरू झाली. कसेतरी ते शिक्षण घेऊ लागले.पण दहावीत ते नापास झाले.आणि सुरू झाला,एक वेगळाच जीवन संघर्ष.

दहावीत नापास झाल्यामुळे इतरांना तोंड दाखवायची लाज वाटू लागली आणि त्यांनी अकोला सोडले.
 त्यांचे वडील बंधू राजेंद्र हे पुण्याला होते. म्हणून त्यांनी पुण्याला 1976 तिथे जाण्याचा निर्णय घेतला. तिथून त्यांच्या जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. स्वतःच्या अस्तित्वाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपड सुरु झाली.प्रामाणिकपणे कष्ट करण्याची त्यांची तयारी तर होती. त्याची सुरुवात त्यांनी दर्शन फ्रूट ज्यूस सेंटरच्या कामापासून केली. अशीच काहीबाही कामे करीत वर्ष गेले. दहावीच्या पुरवणी परीक्षेची 35 रुपये फीही जमा न झाल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिले.

ज्यूस सेंटरवर काम करत असताना कूपर इंजीनियरिंग कंपनीचे निर्यात व्यवस्थापक श्री.व्ही रमण यांच्यामुळे त्यांना त्या कंपनीत फायलिंग क्लार्कची नोकरी तात्पुरती नोकरी मिळाली .
    
पुढील काळात व्हिक्स कंपनीत सेल्समन ची नोकरी करत संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केले. त्याद्वारे उत्तम वागणे, बोलणे, भाषण कौशल्य विकसित होत गेले आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वेगळ्या मार्गाने होण्यास सुरुवात झाली. पुढे 1977 च्या ऑक्टोबर महिन्यात ते दहावी पास झाले.

दहावी पास झाल्यानंतर त्यांनी पौड फाट्यावर असलेल्या भारती विद्यापीठात अकरावीला प्रवेश घेतला. तिथून अकरावी झाल्यावर ते कॉलेज खूप दूर पडत होते म्हणून हडपसर येथील कॉलेज मधून ते बारावी व एफ वाय बी कॉम झाले.

पुढे काही कारणांनी त्यांनी नगर येथे बदलून आलेले त्यांचे मधले भाऊ नरेंद्र यांच्या कडे गेले.तिथे त्यांनी नगर कॉलेज मधून एस वाय व टी वाय बी.कॉमचे शिक्षण घेतले.
अशा प्रकारे ३ वेगवेगळ्या कॉलेजमधून त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.
आपल्या मुलाने निदान पदवीधर व्हावे ही त्यांच्या आईची इच्छा होती. पदवीधर होऊन त्यांनी आईचे स्वप्न पूर्ण केलेच शिवाय स्वतःचे जीवनही घडवले.

देवेंद्रजी परीक्षेच्या पूर्वी काही दिवस नोकरी सोडत.अभ्यास करीत आणि परीक्षा संपल्यावर पुन्हा नवीन नोकरी शोधत. त्या वेळची परिस्थिती, वेगवेगळे काम, आणि जीवन प्रवासात भेटत गेलेली नवनवीन माणसे याची  फलश्रुती यशाची शिखरे गाठताना प्राप्त झाली. नात्यातील विश्वास जपणारे देवेंद्रजी यांना त्यांचे नगरचे भाऊ आणि वहिनींनी खूप साथ दिली.

नगर येथे शिक्षण घेत असताना त्यांनी स्वीटहोम आईस्क्रीम पार्लरचे मालक छगनसेठ बोगावत यांचे पी.ए. म्हणून, जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे वितरक असलेले शाह बंधू यांच्या कडे तसेच दैनिक समाचार मध्येही काम केले.

दिवंगत श्री जनुभाऊ काणे यांच्या दै. समाचार मध्ये काम करत असताना कार्यक्रमांना उपस्थित राहणे,बातमी बनवणे, लेख लिहिणे, मजकूर संपादित करणे या कामाची त्यांना कार्यात आवड निर्माण झाली .

दुर्दैवाने कुटुंबात एका पाठोपाठ एक मृत्यूंचे धक्के बसत गेल्यामुळे त्यांचे मानसिक समाधान हरवले होते. पण एक निश्चय त्यांनी केला होता,तो म्हणजे परिस्थिती किती ही बिकट झाली तरी कधी आत्महत्या करायची नाही.त्यामुळे जिथे जिथे परिस्थिती अनुकूल नाही,असे वाटले की ते त्या त्या परिस्थितीतून बाहेर पडत गेले . अनपेक्षित घडलेल्या काही घटनांमुळे त्यांचा देवावरचा विश्वास जरी उडाला असला तरीही मानसिक समाधानाकरता नियमित प्रार्थना करण्याचा मानस त्याचा असतो.

नगर कॉलेज मध्ये असताना एन एस एस च्या कॅम्पमधून ठिकठिकाणी दिलेल्या भाषणांचा,केलेल्या कामांचा त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडण्यात फार फायदा झाला.

कुटुंबातुन धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा मिळाल्यामुळे समाजाला उपयोगी पडेल असे कार्य त्यांच्या हातून घडत गेले. वडिलांकडून म्हणजेच त्र्यंबकराव भुजबळ यांच्याकडून त्यांना समाज कार्याचा वारसा मिळाला.
      
पुढे बी कॉम झाल्यानंतर त्यांची मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या कोर्सेससाठी निवड झाली. पण आपली आवड ओळखून त्यांनी भरपूर पगार देणारे कोर्स न निवडता पत्रकारितेचे शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना प्रा. ल. ना.गोखले शिष्यवृत्तीसाठी निवड होणारे पहिले विद्यार्थी ठरले.

करिअरच्या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकत केसरीचे उपसंपादक म्हणून, सह्याद्री साप्ताहिकाचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. फेब्रुवारी 1986 मध्ये आणि शिंगणापूर येथील घरांना दारे खिडक्या नाहीत यावर आधारित त्यांची कव्हर स्टोरी सह्याद्रीमध्ये प्रकाशित झाली. समाजातील वेगवेगळ्या स्तरावर तिची नोंद घेतली गेली.

 देवेंद्रजी यांची मुंबई दूरदर्शन मध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून निवड झाली.ते  १ मार्च १९८६ रोजी तिथे रुजू झाले आणि तेव्हा पासून त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले.१४ फेब्रुवारी १९८७ पासून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली. दूरदर्शन मध्ये असतानाच त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या पदवीत फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन आयुष्यात कधीच फर्स्ट क्लास न मिळाल्याची सल दूर केली.

दूरदर्शन मध्ये असताना ,त्यांचे अनेक कार्यक्रम गाजले. त्यापैकी एक म्हणजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक पैलूवर तयार केलेला माहिती पट मुंबई व दिल्ली दूरदर्शन वरून राष्ट्रीय पातळीवर दाखविल्या गेला.या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे देवेंद्रजींचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला.

दूरदर्शन च्या नोकरीमुळे स्थैर्य प्राप्त झाले होते तरी,जेव्हढे पद मोठे, तेव्हढी काम करण्याला जास्त संधी हे लक्षात घेऊन ते यूपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षा देत राहिले.१९९१ साली त्यांची यूपीएससी तर्फे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून आकाशवाणी, दूरदर्शन मधील ३ पदांसाठी, इंडीयन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, शिवाजी विद्यापीठात जर्नालिझम लेक्चरर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी,वर्ग १ अशा ६ पदांसाठी निवड झाली. साधक बाधक विचार करून ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रायगड – अलिबाग येथे रुजू झाले.ते कन्या देवश्रीचाच हा पायगुण समजतात.

जिल्हा माहिती अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर तिथे रुजू होण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी ते गेले असता तिच्या संस्कारांची पुंजी पुन्हा एकदा तिने त्यांना दिली. ती म्हणाली,”बाळा, तू अधिकारी झालास तरी नम्रता कधी सोडू नकोस, माणसाला माणसासारखीच वागणूक दे”.आईच्या या शब्दांचे पालन आजही त्यांच्या वर्तनातून प्रतिबिंबित होते.

शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक असतात हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून देवेंद्रजी करीत आले आहेत.

दूरदर्शन मधील पूर्व अनुभवामुळे त्यांना मुंबईतील १९९२- ९३ च्या भीषण दंगलीच्या काळात मा. मुख्यमंत्र्यांच्या दूरदर्शन प्रसिध्दी ची जबाबदारी सोपविण्यात आली.तीं त्यानी उत्तमपणे पार पाडली.

पुढे अलिबाग येथून रितसर जून 1993 मध्ये त्यांची मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून रितसर बदली करण्यात आली.
मंत्रालयात असताना त्यांनी “शिवशाही आपल्या दारी”, ही मालिका, “माय मराठी” या दूरदर्शनवर रोज प्रसारित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाच्या निर्मिती समन्वयाची भूमिका पार पाडली  .

देवेंद्रजी यांची जून,1998 मध्ये माहिती उपसंचालक म्हणून
पदोन्नती होऊन
कोकण भवन येथे नेमणूक झाली. तिथे ५ वर्षे काम करून पुढे ५ वर्षे मंत्रालयात उपसंचालक,वृत्त विभाग म्हणून त्यांनी काम केले.पुन्हा कोकण भवन येथे ४ वर्षे काम केल्यावर २०१२ मध्ये नाशिक येथे माहिती उपसंचालक म्हणून त्यांची बदली झाली. तर २०१५ मध्ये माहिती संचालक म्हणून पदोन्नती होऊन ते मंत्रालयात रुजू झाले. पुढे तिथून त्यांची बदली संचालक ,मराठवाडा विभाग म्हणून औरंगाबाद येथे झाली.
तिथून ते ३१ जुलै २०१८ रोजी निवृत्त झाले.

“शासकीय अधिकारी, कर्मचारी हे जनतेचे सेवक असतात” हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न
देवेंद्रजी सतत
वेगवेगळ्या माध्यमातून करीत आले आहेत.

सृजनशीलता, नवनवीन परिवर्तने स्वत:मध्ये सामावून घेत प्रगतीच्या वेगवेगळ्या दिशा कशा पद्धतीने गाठल्या याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. देवेंद्र भुजबळजी होय.

देवेंद्रजींच्या पत्नी ,सौ अलकाताई यांनी एमटीएनएल मधून ३ वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांनीही आपल्या सेवा काळात उल्लेखनीय कार्य करण्याबरोबरच आरोग्य शिबिरे आयोजित करणे,सांस्कृतिक कार्यक्रमात ,क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे या बरोबरच त्यांनी विविध दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

५ वर्षांपूर्वी त्यांना ओव्हारियन कॅन्सरचे निदान झाले. फार मोठे ऑपरेशन, केमोथेरपी या दिव्यातून त्या यशस्वीपणे बाहेर पडल्या. त्या अनुभवांवर आधारित त्यांचे “कॉमा” हे पुस्तक डिंपल पब्लिकेशन ने प्रकाशित केले आहे. तर त्याच नावाचा माहिती पट ही तयार करण्यात आला आहे. मा. राज्यपाल यांच्या हस्ते तो राज भवन मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
अलकाताई, कॅन्सर विषयक जन जागृती करण्यासाठी “कॉमा संवाद उपक्रम” राबवित असतात.तसेच कॅन्सर ग्रस्त व त्यांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करीत असतात.

आईवडिलांचा वारसा पुढे नेण्याचा कार्य मुलगी देवश्री उत्तमपणे करीत आहे. तिने पत्रकार म्हणून मुंबईतील आफ्टरनुन, फ्री प्रेस, डी एन ए, एशियन एज , टिव्ही 9 या ठिकाणी उल्लेखनीय काम केले. तिला त्या बद्दल पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या ती अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मास्टर ऑफ जर्नालिझम हा कोर्स करीत आहे.

माझी परिस्थिती बरोबर नाही,म्हणून निराश न होता, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणे,ही प्रेरणा तरुण वर्गाने घेणे खूप गरजेचे आहे. सर्व सुख सोयी सुविधा असतानाही एखाद्या गोष्टीत यश मिळाले नाही म्हणून तरुणवर्ग निराशेकडे वळलेला दिसून येतो. आलेल्या परिस्थितीशी तडजोड करून जीवन कसे जगले पाहिजे याची प्रेरणा देवेंद्रजी यांच्या रूपातून मिळते.

सृजनशीलता, नवनवीन परिवर्तने स्वत:मध्ये सामावून घेत प्रगतीच्या वेगवेगळ्या दिशा कशा पद्धतीने गाठल्या याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. देवेंद्र भुजबळजी होय.
  
श्री.देवेंद्रजी यांनी निवृत्तीनंतर नव्या कामाला, नव्या जोमाने, नव्या दमाने सुरुवात केली आहे.त्यांची कन्या देवश्री हिने कोरोनाच्या भयंकर काळात , लोकांना दिलासा मिळावा म्हणून न्यूज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल सुरू केले. आज या वेब पोर्टल चे जाळे जगातील 86  देशांमध्ये पसरले असून जवळपास ४ लाख ७६ हजार हून अधिक व्ह्यूज या पोर्टल ला मिळाले आहेत. या पोर्टलचे संपादन श्री देवेंद्रजी करतात. तर निर्मितीचे कार्य अलकाताई भुजबळ करतात. या बरोबरच त्यांनी आता प्रकाशन व्यवसायातही प्रवेश केला आहे.

जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट तुमची कधी ना कधी साथ सोडेल. मग ती सत्ता असो की एखादे पद असो. पण तुमचा छंद जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देतो याची जाणीव श्री. देवेंद्रजी यांच्या कार्यातून वारंवार होते.
  
 पती-पत्नीची साथ एकमेकांना साथ असेल,त्याला सामाजिक जाणिवेची जोड असेल तर, लक्षात राहील असे कार्य त्या दांपत्याकडून होते. इतिहासात अजरामर असलेले महात्मा फुले यांच्या कार्याला जोड होती ती सावित्रीबाईंच्या पराकाष्ठेची. त्याचीच प्रचिती भुजबळ दांपत्याकडे पाहून येते. अतिशय त्रासदायक करोना काळात समाजाला जागृत करण्याचे, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासंबंधीची माहिती वेळोवेळी तत्परतेने आणि तळमळीने देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न या दांपत्याने केला आहे आणि अजूनहि करीत आहे.

अलीकडच्याच काळात या प्रसिद्ध पोर्टल ला विकास पत्रकारितेतील सन्मानाचा, महत्त्वाचा, आणि अभिमानाने मान उंचावणारा अप्रतिम मीडियाचा चौथा स्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते तर एकता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. अलकाताईंना ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एकत्र येणे ही सुरुवात,
एकमेकांसोबत राहणे  ही प्रगती,एकमेकांसोबत
काम करणे म्हणजे यश,
एकमेकांचा आदर करणे म्हणजे संस्कृती, संघर्ष, आत्मविश्वास, जिद्द, नम्रता, प्रगती, यश, संस्कृती अशा या गुणांचे एकत्रित अवलोकन 
श्री. देवेंद्रजी यांच्या व्यक्तिमत्वातून होते. समाजात एकात्मता निर्माण व्हावी, माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे, जीवनात जितका संघर्ष कठीण असेल तितका विजय दमदार असतो ही  म्हण प्रचलित आहे.

आजच्या काळात
श्री. देवेंद्रजी यांच्या संघर्षात्मक विजयाची गाथा समाजासमोर आदर्श प्रेरणास्थान म्हणून उभी आहे.
“आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या” हा साधा सरळ मौलिक विचार आपल्या मन, मस्तिष्क, मनगट याद्वारे समाजात रुजवण्याचा प्रयत्न ते अविरत आणि अखंड करीत आहेत. त्यांनी प्रेरणादायी अशी ७ पुस्तके लिहिली आहेत. आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा या देवेंद्रजींना आणि त्यांच्या परिवारास भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


-प्रा.डॉ.ज्योती रामोड
पुणे 
   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here