मुंबई ; दि.१ ( विशेष प्रतिनिधी ) —
मुंबईत गेली 7 वर्षे इंग्रजी पत्रकारितेत काम करत असलेल्या देवश्री देवेंद्र भुजबळ हिची अमेरिकेतील अत्यंत प्रख्यात अशा न्यूयॉर्क स्थित कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर्स इन जर्नालिझम साठी निवड झाली आहे. या युनिव्हर्सिटीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असून, मुंबईतून निवड झालेली देवश्री ही एकमेव असून लवकरच ती रवाना होत आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अल्प परिचय
देवश्रीने डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होण्याच्या मळलेल्या वाटा न निवडता आपली आवड ओळखून इंग्रजी साहित्य घेऊन रुईया महाविद्यालयातून बी ए ची पदवी घेतली. त्यानंतर आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशियेन एज (डेक्कन क्रोनिकल) वर्तमानपत्रे, टिव्ही 9 आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून, तसेच दुबई येथे काही काळ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
मुंबईतील नागरी समस्यांवर संशोधनपूर्ण लेखन केल्याबद्दल तिला मुंबई मराठी पत्रकार संघाचा 2017 चा आप्पा पेंडसे पुरस्कार मिळालेला आहे.
देवश्री कासार समाजातील पहिली इंग्रजी पत्रकार असून, 2019 साली तिचा पुणे कासार समाजातर्फे स्वयंसिद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
देवश्रीने सुरू केलेले
न्यूजस्टोरीटुडे हे वेब पोर्टल हे अल्पवधीत लोकप्रिय झाले असून या वेब पोर्टलला पत्रकारितेतील मानाचा असा, चौथा स्तंभ पुरस्कार मिळाला आहे.
देवश्रीला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.