२१ ऑक्टोबर १९९१
“दूरदर्शन ला निरोप“
आज २१ ऑक्टोबर २०२४. दर वर्षाप्रमाणे आज ही माझ्या डोळ्यापुढे २१ ऑक्टोबर १९९१ हा दिवस,त्या दिवसात घडलेल्या घटना मनात फेर धरुन नाचू लागल्या.तो दिवसच होता,माझ्या जीवनाला कलाटणी देणारा!
खरं म्हणजे,२१ ऑक्टोबर च्या चार महिने आधीच मी युपएससी मार्फत प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून ३ पदांसाठी निवडल्या गेलो होतो.त्यापैकी १ पोस्टिंग आकाशवाणी साठी झाली तर दोन पोस्टिंग दूरदर्शन साठी झाली होती. मी दूरदर्शन केंद्रात तत्पूर्वी १ मार्च १९८६ पासून प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून काम करीत होतोच. त्यामुळे साहजिकच दूरदर्शन मधील पद स्वीकारले त्यात परत सुदैवाने मुंबई दूरदर्शन केंद्रातच पोस्टिंग झाले होते.
प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून
मी रुजू होताच माझ्याकडे आबा देशपांडे उर्फ आकाशानंद करीत असलेला ज्ञानदीप हा पूर्णपणे स्टुडिओ बेस असलेला कार्यक्रम तर दुसरा पूर्णपणे बाहेर जाऊन चित्रित करावा लागणारा क्रीडांगण ,असे पूर्णपणे परस्पर भिन्न स्वरूपाचे कार्यक्रम सोपविण्यात आले.त्यात दोन्ही कार्यक्रमांसाठी दोन स्वतंत्र
प्रॉडक्शन असिस्टंट देण्या ऐवजी एकच प्रॉडक्शन असिस्टंट दिल्यामुळे वरचे पद मिळूनही त्याचा आनंद उपभोगण्याऐवजीं उलट वैतागच वाढला. त्यात दूरदर्शन ची “कार्य संस्कृती “!
त्यात डोंबिवली ते वरळी व्हाया दादर हा रोजचा जीवघेणा प्रवास या सर्व परिस्थितीतून कधी एकदा सुटका होईल ,या प्रतिक्षेत असतानाच माझी इंडीयन इन्फॉर्मेशन सर्व्हिस मध्ये निवड झाल्याची ऑर्डर ऑगस्ट महिन्यात आली. चॉईस ऑफ पोस्टिंग प्रमाणे माझे पोस्टिंग फील्ड पब्लिसिटी ऑफिसर म्हणून नगर येथे झाले. नगर मानण्यामागे काही कौटुंबिक कारणे होती.अर्थात त्याकाळी दूरदर्शन ला असलेले ग्लॅमर विचारात घेता, सर्वांनाच माझ्या निर्णयाचे आश्चर्य वाटत होते.बोलता बोलता तीन महिने झाले ,तरी माझी दिल्लीहून रीलिव्हींग ऑर्डर येत नव्हती. काही “जाणकार ” मंडळी सतत सांगत असायची, “दिल्ली ” ला गेल्याशिवाय काम होणार नाही.पण मी ही निश्चय केला होता,गल्लीतील काम गल्लीतच झाले पाहिजे, त्यासाठी दिल्ली गाठायची नाही. दरम्यान २० ऑक्टोबर रोजी दूरदर्शन चे अतिरिक्त महासंचालक ( प्रशासन) श्री मल्होत्रा हे मुंबई दूरदर्शन च्या भेटीसाठी आले. त्याच दिवशी मी त्यांची आमचे त्यावेळची संचालक श्री सी गुरुनाथ यांच्या दालनात भेट घेऊन,माझी दिल्लीहून रीलिव्हींग ऑर्डर आली नाही, तरी आपण यात कृपया लक्ष घालावे,अशी विनंती केली. माझे बोलणे ऐकून ते म्हणाले, माझ्या आठवणी प्रमाणे मी तुमची फाईल क्लिअर केली आहे,तरीही दिल्लीला दोन दिवसांनी पोहोचल्यावर नेमके काय झाले आहे,ते पहातो.त्या दिवशी रात्री घरी पोहोचल्यावर थोड्याच वेळात माझे सासरे आले. त्यांनी एक खाकी सीलबंद लखोटा हातात देऊन सांगितले की,मंत्रालयातून एक खाकी कपड्यातील माणूस हा लखोटा देऊन सांगून गेला आहे की,उद्याच मंत्रालयात येऊन मुख्य साहेबांना भेटण्यासाठी मला पाठवा. आम्ही जरी डोंबिवलीत रहात होतो,तरी पत्र व्यवहारासाठी मी माझ्या सासऱ्यंचा चेंबूर येथील पत्ता दिला होता. खाकी लखोटा उघडुन बघितला तर त्यात माझी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून निवड झाल्याचे आदेश होते. सासऱ्यंच्या घरी आलेला तो कर्मचारी म्हणजे मोटार सायकल रायडर उर्फ जावकस्वार होता.( पुढे त्याचे नाव सिराज असल्याचे कळाले.)
निरोप मिळाल्यानुसार मी दुसऱ्या दिवशी मंत्रालयात मोठे साहेब म्हणजे तत्कालीन माहिती महासंचालक श्री अरुण पाटणकर साहेब यांना भेटलो. भेटता क्षणीच त्यांनी विचारणा केली की,तुम्ही दूरदर्शन सोडून या खात्यात कसे काय जॉईन होताय ? तर मी त्यांना सांगितले की, माझे दूरदर्शन मधील पद हे वर्ग २ चे आहे. त्यात परत भारत भर कधीही कुठेही बदली व्हायची शक्यता आहे. काही कौटुंबिक कारणे असल्यामुळे मी महाराष्ट्राबाहेर अजिबात जाऊ इच्छित नाही.तर उलट जिल्हा माहिती अधिकारी हे पद वर्ग १ श्रेणीचे असून महाराष्ट्रातच नोकरी करावी लागेल आणि घरी काही इमर्जन्सी निर्माण झाल्यास मी लगेच घरी पोहोचू शकेल. माझे म्हणणे ऐकल्यावर ते म्हणाले,बेटा,अशी परिस्थिती आहे तर तू उद्याच अलिबाग येथे जॉईन हो! मी त्यांना म्हणालो,सर आधीच्या पदावरून मला अजून रीलिव्ह करण्यात आले नाही,तर या पदावर मी आधीच कसे जॉईन होवू ? तर ते म्हणाले,तू आधी जॉईन हो.रीलिव्हिंग चे नंतर बघता येईल.अशा बाबी खूप सेंसेटिव्ह असतात,कधी ही कोर्ट कचेऱ्या होऊ शकतात.त्यांचा निरोप घेऊन मी दूरदर्शन केंद्रात परतलो.तो पर्यंत दुपारचे चार वाजून गेले होते. काय करावे ? असा मोठा गहन प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाला होता. तशाच अवस्थेत मी आमच्या संचालकांचे पीए ( सुप्रसिद्ध “रामू “) यांच्याकडे गेलो आणि एडिजी साहेब आत आहेत का ? म्हणून विचारणा केली. त्यावर तो म्हणाला, “साब है ,लेकीन अभी मिल नहीं सकता ,अभी वो एअर पोर्ट के लिये निकल रहा हैं ” तसाच मी संचालकांच्या केबिन मध्ये घुसलो ते पाहून गुरुनाथ वैतागून म्हणाले,आता काय आहे,तुमचे ? साहेबांना कालच तुम्ही भेटला आहात ना ? मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून माझी परिस्थिती, मनःस्थिती मल्होत्रा साहेबांना हिंदीत विशद केली. उठता उठताच ते गुरुनाथ साहेबांना म्हणाले,मिस्टर गुरुनाथ,यू कॅन रिलिव्ह हिम,टुडे इट्सेल्फ अँज
पर माय एक्सफेकटो ऑर्डर. अल्सो मेंशन ड्यात ऑफिशियल ऑर्डर फोलोज “
त्यांचे बोलणे संपताच गुरुनाथ साहेबांनी आमचे प्रशासकीय अधिकारी,ज्यांचे आडनाव ही अधिकारी च होते,त्यांना इंटर कॉम वरून माझी रीलिव्हींग ऑर्डर इश्यू करायला सांगून ते मल्होत्रा साहेबांसोबत विमान तळावर निघून गेले.
आमच्या प्रशासकीय इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रशासन शाखेत पोहचुस्तोवर पाच वाजत आले होते. अधिकारी साहेब, साडे पाच वाजले की,निघायचे या तयारीत बसलेले असतानाच त्यांना संचालकांचा इंटरकॉम आल्याने भयंकर वैतागले होते. माझी वर्ग १ पदी निवड झाल्याचे काही सोयर सूतक न बाळगता ते वैतागूनच म्हणाले,काय हो तुम्ही निघता निघता कामाला लावले. त्यात डायरोक्टरेट ची ऑफिशियल ऑर्डर नाही,काही नाही.सर्व काही तोंडी! असे काही “ॲडमिनीस्ट्रेशन” मध्ये चालते का ? मी काय बोलणार ? गप्प बसलो. शेवटी माझी फाईल काढून नोटिंगबिटींग चे सोपस्कार आटोपून संध्याकाळी ६ वाजता माझ्या हातात रीलीव्हींग ची ऑर्डर आली आणि जवळपास पावणे सहा वर्षांच्या सेवेनंतर मी दूरदर्शनचा निरोप घेतला.
- देवेंद्र भुजबळ
- 9869484800