मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) –
स्वत: दिव्यांग असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश कसे मिळवायचे याचा वस्तुपाठ श्री वसंत संखे यांनी स्वानुभवातून घालून दिला आहे. त्यामुळे हे पुस्तक जरी दिव्यांगांसाठी असलं तरी ते सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे ,असं प्रतिपादन करून या पुस्तकाचा अनुवाद अन्य भाषांत होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन न्युुज स्टोरी टुडे चे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.ते बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्य गृहात नुकत्याच झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महामहिम माजी राष्ट्रपती व्यंकटरामन,
श्रीमती प्रतिभा पाटील,
डाॅ ए.पी.जे.अब्दुल कलाम आझाद , अमेरिकन डाॅ
लिंगो यांच्यासह जागतिक स्तरावर वसंत संखे यांना मिळालेल्या पुरस्कारांचा, त्यांनी दिव्यांग कल्याणासाठी जीवनभर केलेल्या आणि करीत असलेल्या कार्याचा, सतत कार्यरत, हसतमुख राहण्याचा, कुणालाही कधीही दोष न देण्याचा अशा अनेक गुणांचा उल्लेख करून
संखेसाहेब आपला जीवन संघर्ष या पुस्तकातून चित्रमय शैलीत उलगडून दाखविण्यात यशस्वी झाले असून
या पुस्तकाच्या आधारे एखाद्या उत्तम चित्रपटाचीही निश्चितच निर्मिती होऊ शकेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्रा डॉअरूण सावंत यांनी ते श्री संखे यांच्या बरोबर भिवंडी कॉलेज मध्ये शिकत असतानाच्या
अनेक आठवणींना उजाळा देऊन ग्रामीण भागात शिक्षण धुरिणांनी उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या ,त्यामुळेच आम्ही घडलो,अशी कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई काँग्रेसचे खजिनदार तथा संखे यांचे स्नेही भूषण पाटील यांनी नमूद केले की दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करतानाच अन्य सामाजिक कार्यात देखील वसंत संखे नेहमीच पुढाकार घेत असतात.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना
वसई विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द वसंत संखे यांच्याकडून घेण्यासारखी आहे.
पुस्तकाचे लेखक व अपंग विकास व वित्त महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक वसंत संखे यांनी आपल्या बालपणात पोलिओमुळे अपंगत्व आल्यानंतर अनेक अडचणीवर मात करून जिद्दीने केलेल्या आयुष्यातील प्रवासाबद्दल व दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचे सविस्तर वर्णन केले.
या पुस्तकाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व नुकताच राष्ट्रपती व अन्य पुरस्कार मिळालेल्या काही दिव्यांगांचा शानदार सत्कार वसंत संखे यांच्याकडून करण्यात आला .
या कार्यक्रमास दिव्यांग कल्याण क्षेत्रांतील अनेक दिव्यांग कार्यकर्ते, आप्त, मान्यवर, बंधू भगिनी, मित्रमंडळी उपस्थित होती .
या कार्यक्रमाचे खुशखुशीत,नीटनेटके सूत्रसंचालन प्रख्यात निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले.
तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव (कायदा) व माजी विद्युत लोकपाल आणि वसंत संखे यांचे बंधू रामचंद्र संखे यांनी केले.
उत्तरोत्तर रंगतदार झालेला या सोहळ्याच्या स्मृती मनात साठवून समस्त श्रोतवर्ग तृप्त झाला आणि या कार्यक्रमाची
सांगता झाली.
स्वतः दिव्यांग माता असलेल्या स्मिता कुळकर्णी यांच्या मनाली प्रकाशनने प्रकाशित केलेले हे सुबक, आकर्षक पुस्तक खरेदी करण्यासाठी कार्यक्रम झाल्यावर उपस्थितांनी एकच झुंबड केली.
- नंदकुमार रोपळेकर
☎️9869484800