दिवाळी पहाटच्या स्वर वर्षावात लातूरकर चिंब
अष्टविनायक व आवर्तन प्रतिष्ठानचा उपक्रम
लातूर दि 6 अष्टविनायक प्रतिष्ठान व आवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले.अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या सहकार्यातून गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे ही मैफिल उत्तमरित्या पार पडली. भव्य अशा दीपोत्सवाच्या वातावरणात कलकत्ता येथील आयटीसी या संगीत रिसर्च अकॅडमी चे गुरू व शास्त्रीय संगीतातील एक विद्वान कलाकार पं. ओंकार दादरकर यांच्या सुश्राव्य गायनाने आजची मैफिल सुरू झाली. त्यांनी अहिरभैरव या रागाने मैफलीची सुरुवात केली.अल्पावधीतच कोमल ऋषभ व कोमल निषाद स्वरांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. पं.ओंकार दादरकर यांच्या आवाजात एक प्रकारचा मृदुपणा व सहजता होती. गायन अत्यंत अभ्यासपूर्ण होते. गुरूकुल पद्धतीमध्ये किती ताकद असते हे त्यांच्या आजच्या गायनातून दिसून आले. पहिला बडा ख्याल संपल्यानंतर त्यांनी एक नेहमीपेक्षा वेगळा असा राग, ‘सालगवराळी’ गायला.
या रागाच्या समाप्तीनंतर मध्यंतर झाले. मध्यंतरात प्रमुख अतिथी मनपा आयुक्त अमन मित्तल,उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,दिलीप माने व सर्व कलावंतांचे यथोचित स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण भवठाणकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय कु कमला सी कुलकर्णी हिने करून दिला सूत्रसंचालन डॉ.संदीप जगदाळे यांनी तर आभार प्रदर्शन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा यांनी केले.
द्वितीय सत्रात ख्याल सत्र संपून मैफिल भक्तीगीत व सुगम गीताकडे प्रस्थापित झाली. प्रथम पं. भीमसेन जोशी व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘राम का गुणगान करिये ‘ या अहिर भैरवातील रामभजनाने सुरूवात झाली. नंतर संत नामदेवांचा अभंग ‘काळ देहासी आला काऊ, आम्ही आनंदे नाचू गावू’. सादर केला.साथीला तबला ‘ढाल्या ‘ पद्धतीचा होता त्यामुळे पखवाजाची छबी त्यात दिसत होती. त्याचा घुमारा वातावरणात प्रसन्नता आणीत होता. त्यामुळे अभंगाची रंगत आणखीनच वाढत होती. त्यानंतर ‘कलाबसंत’ रागातील विद्याधर गोखले यांनी लिहिलेले व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘पंडित जगन्नाथ ‘ या नाटकातील नाट्यगीत सादर केले. गायकाच्या पाठीमागे गंगा धारण केलेली शंकराची भव्य मूर्ती होती. त्याच्या पार्श्वभूमीवर या नाट्यगीतास चार चांद लागल्यासारखे दिसत होते. शेवटी भैरवी रागातील ‘अगा वैकुंठीच्या राया’ या कान्होपात्राच्या अभंगाने मैफिलीची सांगता झाली.
त्यांना गणेश तानवडे यांनी तबल्याची उत्तम व समर्पक अशी साथ दिली. गणेशजी यांनी त्यांच्या रियाजाची व अभ्यासाची तयारी त्यांच्या आजच्या साथीतून श्रोत्यांना दाखवून दिली. तर हार्मोनियमची साथ संगत अजय सुगावकर यांनी तेवढीच तोलामोलाची केली.तानपुरा साथ निसर्ग कुलकर्णी व आर्या कासारखेडकर यांनी केली.
अशारितीने रसिक मंडळी स्वर वर्षावात चिंब भिजून दिवाळी पहाटच्या दिमाखदार सोहळ्याची स्मृतीचित्रे मनात ठेवत आपापल्या घरी गेली.
या सोहळ्याच्या
पूर्तीसाठीअष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव रामजी लाठी,रामविलास लोया,जुगल झंवर,दत्ता जाधव,आवर्तनचे अध्यक्ष अभय शहा,सचिव रविराज पोरे,प्रा शशिकांत देशमुख,प्रा हरिसर्वोत्तम जोशी,लक्ष्मीकांत तुबाजी,संजय सुवर्णकार,देवदत्त कुलकर्णी,केशव जोशी यांनी परिश्रम घेतले.