गणेश चतुर्थी , नवरात्र, विजया दशमी झाली. आता दिवाळीचा सण अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला. पुढील शुक्रवारी वसुबारस, शनिवारी धनत्रयोदशी, रविवारी काहीही नाही, सोमवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन, मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण पहायचे, बुधवारी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज !
दिवाळी हा सणांचा राजा ! या दिवसात शेतातील नवीन तयार झालेले धान्य घरात आलेले असते. घर संपन्न झालेले असते. त्यामुळे सर्व सणांमध्ये या सणाचे महत्त्व अधिक ! दिवाळीच्या सणाच्या स्वागताची तयारी करण्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च कसे होतात ते कळतच नाही. पण प्रत्येक खर्चाचा प्रसंग आपली सोय करूनच येत असतो.
घराची स्वच्छता
दिवाळीचा सण हा जसा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा आहे, तसाच हा सण अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे नेणारा आहे. दिवाळी जवळ आली की घरातील सर्वांचे पहिले महत्त्वाचे काम असते ते म्हणजे घराची स्वच्छता करणे. वर्षभरात अनेक गोष्टी ‘ पुढे कधीतरी लागतील ‘ हा विचार करून घरात ठेवल्या जातात. गंमत म्हणजे या गोष्टी पुढे कधीच लागलेल्या नसतात. त्या वस्तू वापरण्याची वेळही आलेली नसते. अशा वस्तू घरातील कोपर्यात किंवा बाथरूम वरील पोटमाळ्यावर ठेवलेल्या असतात. दिवाळी जवळ आली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ‘ अडगळीची खोली ‘ किंवा ‘ पोटमाळा ‘ सर्व वस्तू बाहेर काढून स्वच्छ करणे. काही वस्तू टाकतांना वाईट वाटत असले तरी ते आवश्यक असते. निसर्गाचेच पहा ना, नवीन पानाला जागा करून द्यायची असेल तर जुन्या पिकलेल्या पानाला वृक्षाची संगत सोडून जमिनीकडे झेप घ्यावीच लागते. पूर्वी कपडे जुने झाले की फाटायचे. सध्याचे कपडे फाटतच नाहीत. पण कपाटात नवीन कपड्यांना जागा करून द्यायची असेल तर जुन्या कपड्याना कपाटातून बाहेर काढावेच लागते. अर्थात एक गोष्ट मला सांगितलीच पाहिजे ती म्हणजे, घराची साफसफाई करणे हे काम केवळ घरातील महिलेचे नाही. घरातील सर्वांनी त्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे. घराला घरपण येते ते घरातील वस्तूंमुळे नाही. तसेच घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे यावरही ते अवलंबून नाही. . तर घराला घरपण येते ते घरातील माणसांमुळे ! आपण सर्वांनी या स्वच्छता मोहिमेत सामील होऊया. घराच्या स्वच्छतेबरोबरच दिवाळीचे स्वागत करण्यासाठी मनाचीही स्वच्छता करूया. मतभेद, भांडणे सारे सारे विसरून जाऊया. मनही स्वच्छ करूया. आनंदाने दिवाळीचे स्वागत करूया.
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी पायाखाली चिरडायला कडू कारटे फळ अगोदरच आणून ठेवायला हवे. अभ्यंगस्नानासाठी उटणे, नंतर लावायला सुगंधी अत्तर अगोदरच आणून ठेवायला हवे. बलिप्रतिपदेसाठी ओवाळणीत पत्नीला देण्यासाठीचा नवीन दागिना, भाऊबीजेला बहिणीसाठी खास भाऊबीज, पत्नीच्या भावासाठी रिटर्न गिफ्ट ! सर्व तयारी अगोदरच करून ठेवायला हवी.
लक्ष्मीपूजनाची तयारी, अलक्ष्मी निस्सारण पूजेसाठी नवीन झाडू, रोषणाईसाठी पणत्या, विद्युतमाळा सर्वच तयारी अगोदर करायची असते. संगीतमय दीपावली साजरी करण्यासाठी दिवाळी पहाटची तिकिटे अगोदर खरेदी करून ठेवायची असतात.
खाद्यपदार्थ
.
दिवाळी जवळ आली की घरातील गृहिणी दिवाळीचे खाद्यपदार्थ कधी व कसे बनवायचे याचे नियोजन करीत असते. लाडू, चिवडा, शंकरपाळे, अनरसे, चिरोटे, चकली, करंजी इत्यादी पदार्थ तयार केले जातात.घरी पदार्थ करण्यात खरी मजा असते. हल्ली दुकानातून तयार पदार्थही आणण्याची प्रथा पडत चालली आहे. परंतु बाहेरून विकत आणलेले पदार्थ आणि घरी केलेले पदार्थ यांच्यात खूप मोठा फरक आहे. अर्थात पूर्वींच्या महिलांना वेळ मिळत असे. सध्या नोकरी करणार्या महिलांना वेळ मिळतच नाही. त्यामुळे मग दुकानातून तयार पदार्थ आणले जातात.
आकाश कंदील
*
दिवाळी म्हटली की आकाश कंदील हा आलाच. बाहेरून विकत आकाशकंदील आणण्यापेक्षा स्वत: आकाशकंदील बनविण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आकाशकंदीलाची प्रथा चीन , जपान, तिबेटमध्येही आहे. आकाशकंदील घराबाहेर ऊंच जागी लावण्याची प्रथा आहे. त्यामागचा उद्देश एकच आहे की, आपल्या मृत पूर्वजांना स्वर्गात कळावं की आपण आनंदात व सुखात आहोत. नवरात्रातच घरात शेतातील नवीन धान्य आलेलं असतं. म्हणूनच घराबाहेर, उंचावर आकाशकंदील लावला जातो. विशेष म्हणजे चीन , जपान आणि तिबेटमध्येही आकाशकंदील लावण्यामागे हीच कल्पना आहे. मी माझ्या लहानपणी ‘पायलीचा कंदील ‘ तयार करीत असे. आतमध्ये कागदाचा एक गोल असे . त्यावर चित्रे कोरलेली असत. बाहेरच्या बाजूला गोलाकार कंदील असे. आत पणती लावली की आतला गोल फिरायला लागे. व चित्रे फिरू लागत. कागद आणून बांबूच्या काड्या तयार करून हा कंदील केला जाई.
किल्ले करण्याचे कामही प्रत्यक्ष दिवाळी उत्सव सुरू होण्यापूर्वी केले जाई. वाडीतील सर्व मुले एकत्र येऊन दगड-मातीचा किल्ला केला जाई. आजही अनेक मुले दिवाळीपूर्वी कंदील करीत असतात.
रांगोळी
*
भारतामध्ये सण-उत्सवाच्यावेळी रांगोळी काढण्याची प्रथा फार प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. रांगोळी रांगवळी, रंगमाळी, रंगमाळा, रंगावली, रंगोली अशा विविध नावांनी ओळखली जाते. रांगोळी ही सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे तेथे देवदेवतांचा निवास असतो असा समज आहे.
दिवाळीपूर्वीच एकादशी किंवा गोवत्स द्वादशीपासून दररोज रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळी काढून विविध रंगात ती सजविली जाते. कोकणात भाताची फोलपाटे ( करलं ) जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरली जाते. रांगोळीत वेगवेगळी चिन्हे काढण्याचीही प्रथा आहे. बिंदू, सरळ रेषा, अर्धवर्तुळ, वर्तुळ, गोपद्म, सर्परेषा, कोयरी, स्वस्तिक, तुरा, श्री, सरस्वती, कलश, शंख, चक्र, गदा, पद्म, ध्वज,धनुष्य बाण, त्रिदल, श्रीफळ, लक्ष्मीची पावले आणि दीप काढून रांगोळी सजविली जाते.
दीपावलीच्या सणाला खाद्यपदार्थांच्या फराळाबरोबर दिवाळी अंकांचा साहित्य फराळ हा हवाच ! आणि हो, आपण दिवाळी साजरी करीत असताना आपल्या घरी काम करणारे आपले मदतनीस यांचीही दिवाळी गोड करायला त्यांना आपण मदत करूया.
चला, मग आपण दिवाळीच्या स्वागताची तयारी आजपासून करूया !
======================================