26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*दिल्लीतील बाप्पा' …!*

*दिल्लीतील बाप्पा’ …!*

प्रासंगिक

राजधानी दिल्लीत विश्वशांतीच्या पसायदानाने अलिकडेच जी-२० परिषदेची निर्विघ्नपणे सांगता झाली… आणि चाहूल लागली ती विघ्नहर्ता वरदमूर्ती श्रीगणेशाची ! सरत्या श्रावणाला निरोप देताना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपतीचे आगमन आता अवघ्या दोन दिवसांवर आले आहे.  ‘महाराष्ट्रा बाहेर ही एक महाराष्ट्र  वसतो ‘. तेव्हा या बृहन्महाराष्ट्रात येथील महाराष्ट्रीयन मराठी माणूस आपली सण समारंभ घराघरातून आणि विविध मंडळातून एकत्रित येऊन साजरे करु चिरंतन ठेवतात. ‘मंगळागौर’ महाराष्ट्रातील महिलांचा  आवडता सण नव्हे तर आतुरतेने वाट पाहिली जाते असा नववधू पासून ते अगदी सासूबाईंच्या ओटीत  ‘वाण ‘ काय  पडणार आणि “पूजेला वासळया मुली मिळाल्या की ?… झालीत एक दोन वर्षे लग्नाला” यावर ही औत्सुक्याने  गप्पा मारणारा मराठी समाज आम्ही बृहन्महाराष्ट्रात ही अनुभवतो ते  वनिता समाजाच्या माध्यमातून… सध्या तर  ‘बाईपण  देगा देवा ‘ सिनेमामुळे ‘मंगळागौर’ आणि  त्यातील  खेळ  सध्या झोकात आहेत तेव्हा तो उत्साह सोशल मीडियाच्या  माध्यमातून  राजधानीतीलही  घराघरात पोहचला आहे  आणि  दिल्लीतील वनिता समाजाने  महाराष्ट्रापासून दूर शिक्षण करिअर करिता आलेल्या आणि सासर माहेराला मूकलेल्या महिलांच्या या  सण परंपरेला मुक्त व्यासपीठ करुन दिले.

  श्री गणेश सेवा मंडळ लक्ष्मी नगर दिल्ली येथे संबोधताना राज्यमंत्री श्री. प्रल्हाद पटेल,

लोधी रोडवरील वनिता समाजाच्या सभागृहात सकाळपासूनच लगबग जाणवू लागली . नऊवारी साडी, नाकात नथ, गळ्यात ठूशी, हातात हिरवा चूडा, पूजेचं ताट पत्री घेऊन  वासळयांपासून सासवांपर्यंतच्या  महिला एकत्रित आल्या. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका अरुणा दिवाण  यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्मा- फुगडी , गोफ,सूप लाटणं आदीचें पारंपरिक  खेळ, उखाणे झाले. त्यानंतर महाराष्ट्रीयन सुग्रास जेवण त्यात विशेषतः मसाले भात, मठ्ठा, पुरणपोळी, कोशिंबीर असे अस्सल  महाराष्ट्रीयन  व्यंजनांनी तृप्त होऊन  या माहेरवाशिणी घराकडे परतल्या. अश्या प्रकारे  श्रावण सरताना आम्हा सख्यानां  आणि  सार्वजनिक मंडळातील  सदस्यांना चाहूल लागली  ती बाप्पांच्या आगमनाची  जसे की आम्ही कार्यकर्ते बृहन्महाराष्ट्रातही बाप्पांची प्रतिष्ठापना घराघरातून आणि लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव विविध मंडळातून उत्साहाने साजरा करतो.

सार्वजनिक उत्सव समिती (दिल्ली हाट आय. एन. ए. दक्षिण दिल्ली)

यात नवी दिल्लीतील सार्वजनिक उत्सव समिती सुरुवातीचं पहिलं महाराष्ट्र मंडळ रा .मो. हेजिब यांच्या अध्यक्षतेखाली नेहमीच महाराष्ट्रातील त्या त्या वर्षातील प्रेक्षकांच्या प्रतिसादाने गाजलेली व्यावसायिक प्रायोगिक नाटके राजधानीतील मराठी रसिकांच्याकरिता घेऊन येत असे. आजही आठवते की  हेजिब सरांच्या दूरदृष्टीने आज प्रसिध्दीच्या  विशेष  झोतात  असलेले  दिग्दर्शक केदार शिंदेची प्रकट मुलाखत बृहन्महाराष्ट्रीयनांनी जवळपास दहा वर्षांपूर्वी  ऐकली बघितली आहे. आज  हेजिब काका हयात नाहीत परंतु सार्वजनिक उत्सव समितीची परंपरा त्यांच्या पत्नी नीना हेजिब आणि मार्गदर्शक उद्योजक वीरेंद्र उपाध्ये  यशस्वीपणे  सांभाळत आहेत.यंदा ‘हास्यजत्रा’ या कलर्स वाहिनीवरील विनोदी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गणेशोत्सवाचे हे मंडळ वर्गणी वगैरे घेत नसल्याने ‘बुक माय शो ‘च्या माध्यमातून माफक दरात सादर करणार आहे. याशिवाय ही मुंबई पुणे येथील कलाकार दिल्ली हाट आय एन ए येथे सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम सादर करतील.लक्ष्मीनगर येथील प्रतिष्ठित व्यावसायिक श्री . महेन्द्र लढ्ढा हे केवळ जन्माने मारवाडी परंतु  संस्कारांनी पूर्णतः ‘मराठी माणूस ‘ संस्थापक अध्यक्ष  श्री गणेश सेवा मंडळ येथील गणेशोत्सव मंडळाचे ते दिल्लीतील गणेशभक्तांकरिता हौशीने मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करतात. त्यात विविध धार्मिक कार्यक्रम भजन संध्या – कीर्तन , ते महाराष्ट्रीयन व्यजंनाचीं  रेलचेल येथील भव्य  मंडपातील खाद्य दालनातून बघायला मिळते. सोबतच पर्यावरणस्नेही गणेश मूर्तीचे दर्शन ते विसर्जन सगळंच ‘पर्यावरणाशी मैत्री आणि निसर्गाशी नातं’ याचं महत्व लक्षात आणून देणारा देखावा आपलं लक्ष वेधतं. एवढं सगळं करत असताना दिल्लीतील प्रत्येक गणेश भक्ताला  बाप्पाचं दर्शन शांततेत सुखरूप घेता यावं यासाठी  गणपती पत्रिका त्यावर स्कॅन कोडद्वारे नकाश्यासह पत्ता  दिला आहे. तो आजच्या डिजीटल युगात  दर्शनाला  येण्यास मार्गदर्शन करतो.मंडळातील  उत्साही भगिनी वर्गासाठी नियोजन पूर्ण कलशयात्रा ! एकाच रंगातील  भारतीय पोशाखातील  सवाद्य मिरवणूकीने गणेशाची प्रतिष्ठापना  विधीवत डी.डी.ए.च्या भव्य क्रिकेट मैदानावर केली जाते.यंदाचं या गणेश मंडळाचे  हे २२ वे वर्ष आहे. गेल्या वर्षी येथील  बाप्पांच्या मंडपात जवळपास दोन ते तीन हजार गणेशभक्तांनी दर्शन प्रसादाचा लाभ घेतला. श्री.लढ्ढा़जींच्या संपूर्ण परिवारासोबतच या गणेशमंडळाला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्री.श्याम जाजू, वैभव डांगे, राजेश पानसे, अॅडव्होकेट शिरीष देशपांडे, गणेश रामदासी, महिला प्रतिनिधीत निवेदिता मदाने-वैशंपायन या महाराष्ट्रीयनांचा ही सक्रिय सहभाग असतो.

श्री गणेश सेवा मंडळ लक्ष्मी नगर दिल्ली येथे बाप्पांची आरती करताना राज्यमंत्री श्री. प्रल्हाद पटेल,

याशिवाय राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे कर्मचारी जुन्या महाराष्ट्र सदनात दहा दिवस तर कोविडच्या कालावधीनंतर पाच दिवसांचा ‘बाप्पा’ फरिदाबाद, इंदिरापूरम, गुरुग्राम ते नोएडा, सह्याद्री, आनंदवन या वसाहतीत , याशिवाय पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ ते प्राचीन दिल्लीतील चांदनी चौक व्यापारी मंडळ,करोल बाग,मराठा मित्र मंडळ, बृहन्महाराष्ट्र भवनातील स्नेह संवर्धन मंडळ जिथे महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाश्यांची नाममात्र शुल्कात निवासाची सोय होते अश्या ठिकाणी आवर्जून ‘मराठी माणूस ‘ एकत्रित येऊन विराजमान होतात, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची गणेशोत्सवात येथे प्रतिष्ठापना होते. यानिमित्ताने बृहन्महाराष्ट्रीयनांना ओढ असते ती  ‘मराठी माणूस’ भेटण्याची आणि विविध मंडळातून सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची, फडावरच्या लावणीची, महाराष्ट्राची लोकधारा राजधानीत अनुभवण्याची ते अगदी स्थानिक कलाकारांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘आपले आपण’ हे अनोखं हक्काचं व्यासपीठ पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ उपलब्ध करुन देण्यापासून ते गुरुग्राम येथे गायक ऋषीकेश रानडे आणि सार्वजनिक उत्सव समितीत हास्यजत्रातील मराठी कलाकार समीर चौघुले, प्रसाद खांडेकर या सगळ्याचे आकर्षण असताना यावर्षी तर संसदेतील खासदरांच्या उपस्थितीचे आणि त्यांच्या हातून होणा-या मानाच्या आरतीचे ही औत्सुक्य आता आहे. कारण अलिकडेच आपले आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील खासदार गणेश चतुर्थीला ‘श्रीं ची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना दिल्लीतील आपापल्या निवासस्थानीच करून  सार्वजनिक स्वरुपात नव्या संसदेतील इमारतीतून २०२४ करिता संपूर्णतः सक्रिय  होऊन कार्यसिद्धीकरिता सामूहिक संकल्पासह शंखनादही करतील यात मात्र शंका नाही.

लेखन ;निवेदिता मदाने-वैशंपायन (नवी दिल्ली)

——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]