दिलं है के मानता नही!
द्वारकानाथ संझगिरी
मी गाडी चालवत होतो. बाजूला बायको होती.आणि तिने मोबाईल चाळता चाळता बातमी दिली.” अमीर खान ह्याने दुसरा घटस्फोट घेतला.”
हिंदी सिनेमातल्या शॉट प्रमाणे मी कचकन गाडी थांबवली नाही.
किंबहुना माझ्या चेहऱ्यावरचे भाव ,प्रदीपकुमार एव्हढे निर्विकार होते. फिल्मी माणसाचा घटस्फोट आणि सेट झालेल्या रोहित शर्माने विकेट देणं ही मला पेट्रोलचे भाव वाढण्या एवढी सामान्य बातमी वाटते.
का नाही वाटणारं?,
आपल्या रेखाला, ( आपला हा शब्द, आपला सचिन, आपला अमिताभ ह्या मर्यादित आपलेपणातूनच घ्यावा), एक सख्खी आई आणि तीन सावत्र आई होत्या. ( इथे फक्त अधिकृत आईचा विचार केलाय).
किशोर कुमारने चक्क चार लग्न केली.
त्याने योगिता बाली बरोबर केलेलं लग्न, केवळ व्हेकन्सी झाली आणि ती भरलीच पाहिजे ह्या नाईलाजापोटी केलं.
आशा पारेख म्हणते, ” तिला अमीर खान हा ह्या पिढी मधला देव आनंद वाटतो”
पण देवानंद ने लग्न एकच केलं. मला कुणीतरी सांगितलं की देव आनंद आणि बायकोचं नंतर नंतर पटायचं नाही. ते एकाच घरात वेगवेगळे राहिले आणि फक्त रोज जेवायला डायनिंग टेबलवर एकत्र येत. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही.
मला फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की चिकणा अमीर, सलमान प्रमाणे सुंदर मुलीच्या प्रेमात का पडला नाही?. सलमान हिऱ्याच्या ढिगातून कोहिनूर शोधून काढतो. आमिरचा कल सौंदर्य पेक्षा बुध्दी कडे आहे, असं मला सांगण्यात आलं. बहुदा मादाम क्युरी केवळ ह्या काळात जन्माला आली नाही म्हणून मिसेस अमीर खान झाली नाही.
आणि सलमानचा बुध्दी ह्या गोष्टीशी काय संबंध?
सलमान बुध्दीमान असेल तर अमीर खान सर आयझॅक न्यूटन आहे.
मला एक कलाकार म्हणून अमीर खान बुध्दीमान वाटतो. पाणी फाउंडेशन सारख्या कार्यातून तो सामाजिक जाणीव दाखवतो. पण त्याच्या ह्या घटस्फोटानंतर माझा त्याच्या बुध्दीबद्दलचा आदर द्विगुणित झालाय. त्याने माझ्या घटस्फोटा विषयीच्या सर्व कल्पना उलट्या पुलट्या केल्या आहेत.
मला अस वाटायचं की नवऱ्याने दुसरा घरोबा केला, किंवा बायकोने आणि कुणाला डोळा मारला, किंवा तीव्र मतभेद झाले, काही शारीरिक प्रॉब्लेम्स झाले वगैरे की घटस्फोट होतो. आनंदाच्या झोपाळ्यावर मुलाला मध्ये ठेऊन हातात हात असताना आणि उंच झोका घेताना घटस्फोट घ्यावासा वाटणे हा क्रांतिकारी कॉन्सेप्ट आहे.
हे मी नाही सांगत तो सांगतोय.
त्याने दिलेल्या निवेदनात तो म्हणतो, ” गेल्या पंधरा वर्षांत आमचा एकत्रितपणे घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात गेला. आमच्या नात्यात,विश्वास, प्रेम आणि आदर वाढतच गेला. आता एक नवा अध्याय सुरू करू. त्यात आम्ही नवरा बायको नसू”
निव्वळ आनंदाच्या अजीर्ण्या पोटी दिलेला हा घटस्फोट आहे का?
वर तो सांगतो,” आम्ही आमच्या मुलाचे ( आझाद) ह्याचे सहपालक असू. कुटुंब म्हणून एक असू , सिनेमा , पाणी फाऊंडेशनचे काम एकत्र करू”
म्हणजे फक्त शयन गृह बदललं का?
बरं हल्ली एका शयन गृहात असायला नवरा बायको असावच लागतं अस नाही.
म्हणजे हा मानसिक घटस्फोट आहे का?
की इंटेलेक्चुअल?
की अध्यात्मिक?
घटस्फोटावर अधिकार असणाऱ्या एलिझाबेथ टेलर हिला सुध्दा ही कल्पना सुचली नव्हती.तिने एका नवर्याशी दोनदा लग्न केलं पण असा घटस्फोट घेतला नाही.
दुखाश्रू असतात तसे आनंदाश्रू असतात हे माहीत होत.
माणूस दुःखात बेशुध्द पडतो तसा आनंदात पडतो हे पण ऐकलं होत.
पण आनंदाच्या ताटावर बसून एकमेकाला घास भरवत असताना घटस्फोट देतात हे अमीर – किरणने शिकवलं.
आता बायकोला आनंदात ठेवावं की नाही हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे उभा ठाकला आहे..
बायकोच्या वाढदिवसानिमित्त सोन्याचा दागिना घ्यायचा विचार करत होतो पण मी तूर्तास बेत पुढे ढकललाय.दिलं है के मानता नही!
साभार : फेसबुक