चंद्रकांतदादा, बघा, पुन्हा चुकलात. बोलून बसलात. आता दिलगिरी व्यक्त करावी लागली. तुम्ही मोकळेपणाने बोलता. पण लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत. एखादाच शब्द पकडून ठेवतात. आरडाओरडा करतात. खूपच वाद वाढला की, दिलगिरी व्यक्त करावी लागते. मग विषय थांबतो. तुमच्या विरोधकांना आनंद होतो.
आताच्या प्रसंगातही पाहा. सरकारी अनुदानाशिवाय लोकांच्या पाठिंब्यावर शाळा चालवाव्यात हे तुमचे मत. त्यात काहीच चुकीचे नाही. त्यासाठी तुम्ही महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची उदाहरणे दिली. त्यातही काही चुकीचे नाही. तुम्ही म्हणालात त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन शाळा उघडल्या. यात तर काहीच चूक नाही. पण तुम्ही लोकांकडून देणग्या घेऊन म्हणण्याच्या ऐवजी भीक हा शब्द वापरला आणि विरोधकांना संधी मिळाली. अर्थ तोच. पण कार्यकर्त्यांच्या बोलीभाषेतला शब्द वापरला. झाले. सुरू झाला आरडाओरडा. चॅनेलवाल्यांचा गोंगाट. सोशल मीडियातील कलकलाट. शब्दाचं समर्थन नाही पण भावनांचा विपर्यास करण्याचं टोक गाठलं गेलं. हे सगळं इथंच थांबत नाही तर आज तुमच्यावर थेट भ्याड हल्ला करण्यात आला. तुमचं वय, डोळ्याचा गंभीर आजार सगळं दुर्लक्षून सूडबुद्धीने हल्ला करण्यात आला.
दादा, चुकतेच तुमचे. तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात. सामान्य घरातून आले आहात. मोठ्या पदावर पोहोचला तरी समाजासोबतची नाळ तोडली नाही. अजूनही तसेच सामान्य लोकांसारखे वागता बोलता. त्यामुळे तुम्ही हा शब्द वापरला. तुम्हाला बहुधा तुमचे विद्यार्थी परिषदेचे दिवस आठवले असतील. एक दशकापेक्षा अधिक काळ तुम्ही ऐन तारुण्यात विद्यार्थी परिषदेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. संन्याशासारखे आयुष्य होते ते. त्या काळात तुम्ही एक एक कार्यकर्ता परिषदेला जोडला आणि स्वतःसाठी कडक शिस्त पाळत अनेक कामे पूर्ण केली. त्या काळात हाती घेतलेल्या कार्यासाठी लोकांकडे याचना करून पैसे गोळा केले आणि उपक्रम पार पाडले.
सामाजिक कामासाठी पैसे गोळा करताना किती याचना कराव्या लागतात, किती वेळा विनंत्या कराव्या लागतात, एरवी तोंडावर गोड बोलणारी माणसे देणगी देण्याची वेळ आली की कशी बदलतात, किती खेपा माराव्या लागतात हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले. म्हणूनच म्हटले की, तुम्ही संघटनेसाठी याचना करून निधी उभा केला. याचना म्हणजे बोलीभाषेत भीकच असते. उगाच साखर लावलेला शब्द वापरला म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. मग तुमच्यासारखे कार्यकर्ते सहज बोलून जातात, भिका मागून संस्था उभी केली. कारण त्यांना यामागे किती यातना सहन कराव्या लागतात हे ठाऊक असते. त्या भावनेने तुम्ही परवा बोलून गेलात. झाले. विरोधकांना निमित्त मिळाले. तुमच्या भावनांची ऐशी की तैशी. तुम्ही एक शब्द वेगळा वापरला ना, मग झाले, आम्हाला निमित्त मिळाले. करू आरडाओरडा.
दादा, तुम्ही असे मोकळेपणाने मनातले बोलता ही तुमची खरी चूक नाही. तुमची खरी चूक वेगळीच आहे.
तुम्ही मुंबईत एका चाळीत लहानाचे मोठे झालात. वडील गिरणी कामगार. आईही कापड गिरणीत काम करत असे. घरची परिस्थिती बेताची. नाही म्हणायला कोल्हापूर जिल्ह्यात शेती आहे. पण ती थोडी. त्यातून उत्पन्न ते काय मिळणार. सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती असूनही तुम्ही खचला नाहीत. जिद्दीने शिक्षण घेतले. बी. कॉम. होईपर्यंत निर्णय झाला की, विद्यार्थी परिषदेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचे. ऐन तारुण्यात एक दशकापेक्षा जास्त काळ तुम्ही पायाला भिंगरी लागल्यागत संपूर्ण देशभर समतेचा विचार समजून घेण्यासाठी फिरलात. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी गावोगाव संवाद यात्रा घेऊन फिरलात. संघटनेसाठी हाडाची काडे केलीत. हो खरंच आहे ते. लोकांना तुमचे आताचे धिप्पाड रूप दिसते. पण त्यामागच्या संघर्षाचा डोंगर कोण बघणार?
विद्यार्थी परिषदेचे काम थांबविल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात शेती करू लागला तरी संघाचे काम चालू ठेवले. पुढे आदेश आला आणि राजकारणात आलात. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत काम करू लागलात. २००८ साली पुणे पदवीधरच्या भाजपने आधी गमावलेल्या विधान परिषद मतदारसंघात तुम्हाला उभे केले. पुन्हा तेच. तुम्ही प्रचंड मेहनत केलीत. पक्षाला विजय मिळवून दिलात आणि आमदार झालात. २०१४ ची निवडणुकही जिंकलीत. पुन्हा आमदार झालात. मग पक्षाची सत्ता आली. तुम्ही मंत्री झालात. महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार अशा आठ आठ वजनदार खात्यांची जबाबदारी पेलली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात. तुमच्या अध्यक्षतेखाली पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकली. विश्वासघातामुळे विरोधात बसावे लागले तर भाजपने विरोधी पक्ष म्हणून जबरदस्त कामगिरी केली. शिवाय विरोधात असूनही संघटना टिकली, वाढली. सत्ता आल्यावर पुन्हा एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री झालात. तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयाचे खाते पक्षाने दिले.
दादा हीच तुमची खरी चूक आहे. एक सामान्य मराठा कुटुंबातील व्यक्ती आहात तुम्ही. तुम्हाला असे सरंजामदारांमध्ये मानाने बसायचा अधिकार नाही. हे मानमरातब सगळे राजकीय घराण्यांसाठी असतात. साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षणसंस्था, बँक असे वैभव हवे. हुजरेगिरी करणारी कार्यकर्त्यांची फौज पदरी हवी. नुसत्या इशाऱ्यावर डाव करणारे शार्प लोक हाती हवेत. तुमचे असले काहीच नाही. तुम्ही आयुष्यभर फक्त संघ आणि संघटना हेच केले. एवढे मंत्री झालात तरी तोच पांढरा शर्ट आणि काळी पँट असा वेश घालता. अजूनही सामान्य माणसाचे दुःख पाहून कळवळता. होईल तितकी मदत करता. ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांच्यासाठी संस्था चालवता. कोणाला मदत केली तर त्याचे भांडवल करण्याच्या ऐवजी विसरून जाता. असे कसे चालायचे? सामान्य मराठे हे केवळ घोषणा आणि मते देण्यासाठी हवेत असे सरंजामदारांना वाटते. तुम्ही तर त्यांना थेट आरक्षणच मिळवून दिले. कसे चालायचे हे सगळे? मग तुम्हाला टार्गेट करणारच.
तुमची खरी चूक आहे की, तुम्ही सामान्य असून सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात घुसलात. बरं घुसलात तर घुसलात, नंतर तरी त्यांच्यासारखे व्हावे तर अजूनही तुम्ही सामान्य लोकांचा कळवळाच घेऊन बसलात. त्यांच्यासारखे तुम्ही मुखवटे घालायला हवे. पुरोगामी मुखवटा सार्वजनिकपणे मिरवायचा आणि खासगीत घाणेरडी शिवीगाळ करायचे हे तुम्हाला जमत नाही. याला पॉलिटिकल करेक्टनेस म्हणतात. तो तुमच्याकडे नाही. तुमचे आतबाहेर काही नसते. जे मनात असेल तेच बोलणार. तुम्ही सामान्य लोकांना मदत करता. तुमचे उच्च सर्कल सांभाळात बसत नाही. मग तुमच्यावर त्यांची माणसे तुटून पडणारच. त्यांना फक्त निमित्त हवे असते. तुमचा भाव काहीही असो. तुम्ही बरोबर जरी बोलला असाल तरी शब्दाची केवळ एक छटा बदलली तरी त्याचे निमित्त करून तुमच्यावर हल्ला होणारच. संजय राऊत कितीही घाण बोलले तरी त्यांना असा जाब कोणी विचारत नाही. कारण ते त्या सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थेचा भाग आहेत, ते त्यांची भाषा बोलतात. मग त्यांनी काहीही केले तरी चालते. तुम्ही मात्र सत्यही मोकळेपणाने सांगायचे नाही.
दादा, एक गोष्ट सांगतो. एकदा एक कोकरू ओढ्यावर पाणी पीत होते. थोड्या वेळात लांडगा आला. ओढ्याच्या वरच्या बाजूला पाणी पिऊ लागला. त्याने कोकरू पाहिले. त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. तो म्हणाला, तू माझे पाणी खराब केलेस मी तुला खाणार. कोकरू म्हणाले की, तुम्ही तर ओढ्याच्या वरच्या बाजूला आहात, तुमच्याकडून माझ्याकडे पाणी येत आहे. मी तुमचे पाणी कसे खराब करीन? त्यावर लांडगा म्हणाला की, ते काहीही असो, पण मी तुला खाणार.
दादा, तुमचे हे असे कोकरासारखे आहे. तुम्ही प्रस्थापितांच्या पैकी नाही. तुम्ही सामान्य कुटुंबातील आहात. अजूनही जनसामान्यांसोबत राहता. प्रस्थापितांचे हितसंबंध राखत स्वतःचा फायदा करून घेत नाही. त्यांच्यासारखा मुखवटा घालून तोंडदेखला पुरोगामीपणा करत नाही. मग तुम्हाला ते छळणारच. त्यांना फक्त निमित्त हवे असते. त्यांना ते मिळाले.
एक तर तुम्ही प्रस्थापितांपैकी एक व्हा आणि तसे वागा. नाही तर हा छळ सहन करा.
अत्यंत हीन राजकारण करून कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन तुमच्यावर असा भ्याड हिंसक हल्ला करणाऱ्यांना समाज नक्कीच उघड्या डोळ्यांनी बघतोय..!
राजेश पांडे