आज दर्पणदिन, आजच्याच दिवशी (6 जानेवारी) 1832 साली पहिले 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रसिद्ध केले म्हणून आजचा दिवस 'दर्पण'(पत्रकार) दिन म्हणून साजरा केला जातो. याला काहीजण आज "पत्रकारांचा पोळा" असेही म्हणताना मी ऐकले आहे. म्हणू द्या त्यांना, मात्र मी आजचा दिवस हा आपल्या आत्मचिंतनाचा दिवस समजतो. तसे ते आत्मचिंतन आज आपण पत्रकारांनी करायला हवे.
7 जानेवारी पासून 5 जानेवारी पर्यंत 364 दिवस आपणच लोकांना सांगत असतो, एवढंच नाही तर लोकांना नको असणारे, ऐकायची इच्छा नसणारेही अनेकदा सांगत असतो, त्यांच्यावर अनेकवेळा लादत असतो. अजचा एकच दिवस असा असतो की लोक आपल्याला काहीतरी सांगतात, त्यासाठी त्यांना एकच दिवस असतो त्याची ते पूर्ण वर्षभर वाट पाहत असतात आणि आजचा दिवस उगवला की, ते संधी साधतात. संधी मिळेल तिथे आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या ते व्यक्त करत असतात. आपण त्या ऐकल्याच पाहिजेत आणि त्यावर चिंतनही केले पाहिजे. वर्षभर आपण अधिक प्रमाणात लोकांच्याच चुका सांगत असतो, आजच्या दिवशी काहीतरी सांगताना त्यानी आपल्या चुका दाखवल्या तर आपल्याला वाईट वाटायचे काहीच कारण नाही. त्यामुळे लोक आपल्या विषयी काय बोलतात? त्यांच्या आपल्या कडून काय अपेक्षा आहेत? त्या आपण समजून घ्यायलाच हव्यात. लोकांनी वर्षभर जाहिरातीतून दिलेल्या शिदोरी पेक्षा त्यांच्या आजच्या शुभेच्छातुन, त्यांनी व्यक्त केलेल्या भावनातून आणि त्यांच्या अपेक्षातून मिळणारी शदोरी ही आपल्याला वर्षभर पुरेल इतकी नक्कीच असते असे मला वाटते.
आज आपण आत्मचिंतन करताना गेलं किमान वर्षभर केलेल्या पत्रकारितेचा आपणच आपला आढावा घ्यायला हवा आणि पुढील वर्षात आपण काय केले पाहिजे याचा ही विचार करायला हवा. आपण पत्रकार आहोत, आपण जे लिहतो आणि बोलतो त्या मागचा आपला हेतू प्रामाणिक असेल तर त्याची आपण चिंता करण्याची गरज नसावी. पत्रकारांना “वॉचडॉग” असेही म्हटले जाते ते आपले काम आपण प्रामाणिकपणेच केले पाहिजे म्हणून, आपल्या बोलण्याला कोणी ‘भूकंने’ म्हटले तरी आपण त्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण डॉग ही उपमा आपल्याला देतानाच त्याच्या प्रामाणिकपणाचा दाखला त्यात दिलेला आहे असे आपण समजले पाहिजे.
मला गेल्या 45 वर्षात पत्रकारीता करत असताना माझे अनेक मित्र माझ्या स्पष्ट बोलण्याबद्दल बोलतात, टोकतात आणि रोकतातही पण माझा तो स्वभाव काही बदलत नाही. गप्प बसून आणि शांत राहून दिसतंय ते न बोलण्यातुन अथवा बोलण्यातून मला कधी काही मिळवायचे नसते, त्यामुळे माझ्यावर माझ्या बोलण्यामुळे नाराज झालेले अनेक मित्र आजही कायम आहेत. या क्षेत्रात येतानाच प्रत्येकाने या पत्रकारितेतून आपण भरपूर मिळवू अशा अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या. कदाचित आपल्या दररोजच्या पत्रकारितेतून आपले नुकसानही होऊ शकते. हेही लक्षात घ्यायला हवे पण प्रामाणिक पत्रकारिता करायची असेल तर ते गमावण्याची तयारी ही ठेवावी लागेल. हे आजच्या आपल्या पोळ्याच्या दिवशी आपण लक्षात ठेवायला हवे.
समाजात ज्या ज्या प्रवृत्ती, अपप्रवृत्ती असतात त्या सर्वच क्षेत्रात येत असतात त्याप्रमाणे हे पत्रकारिता क्षेत्रही त्यास कसे अपवाद राहील? त्यामुळे या क्षेत्राचा उपयोग करून आपला 'धंदा' सुरक्षित करू पहाणारे अनेक या क्षेत्रात आले आहेत. त्यात त्यांना यश आले असेलही. आजच्या निमित्ताने त्यांना एकच विनंती आहे की, या क्षेत्राचा जर परिसस्पर्श आपणाला झाला आहे तर त्याचा फायदा जरूर घ्या पण किमान ते बदनाम होईल ऐवढे तरी करू नका.
समाजानेही आज या पत्रकारिता क्षेत्राकडून आपल्या अपेक्षा व्यक्त करताना आणि अपेक्षा ठेवताना या क्षेत्राबाबत, ते टिकवण्या बाबत आपलीही काही जबाबदारी आहे याची जाणिव ठेवली पाहिजे अशी अपेक्षा माझ्या सारख्या पत्रकाराने व्यक्त केली तर तेही चुकीचे ठरू शकणार नाही. आजच्या पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल आभार आणि आपणालाही आणि सर्व पत्रकारांना पत्रकार म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.
–नरेन्द्र कांकरिया, बीड
( लेखक हे बीड येथील जेष्ठ संपादक आहेत)