संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी
लातूर दि.. १५ (प्रतिनिधी )-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने घेण्यात येणारा अंतर महाविद्यालयीन केंद्रीय युवक महोत्सव ज्ञानतीर्थ 2023 यावर्षी दयानंद शिक्षण संस्थेत होणार आहे. नांदेड,लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील दोन हजार युवक या युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत. या युवक महोत्सवात एकुण ३० कलाप्रकारांचे सादरीकरण विविध मंचावरून होणार आहे.
हा युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. युवकमहोत्सवाकरिता प्रवेशिका व प्रवेश शुल्क मा. वित्त व लेखाधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या नावे डी.डी. काढून किंवा रोख रक्कम भरुन खास दूतामार्फत दि. 25 सप्टें. 2023 पर्यंत भरुन घ्यावे. तसेच स्पर्धकासोबत संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सहीनिशी चालू शैक्षणिक वर्षाचे ओळखपत्र, युवक महोत्सवासाठी तयार केलेले ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे.

दिनांक 12 आक्टोबर, 2023 रोजी सकाळी 8.00वाजता युवक महोत्सवात सहभागी संघासह शोभायात्रा (रॅली) काढण्यात येईल. सर्व महाविद्यालयाचे संघ दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीपर्यंत दयानंद शिक्षण संस्थेत पोहोंचतील अशी अपेक्षा आयोजक म्हणून दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी व्यक्त केली आहे.
हा युवकमहोत्सव यशस्वी करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा या बैठकीचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन दि. 15.09.2023 रोजी संस्था कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीत निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था, मंच व्यवस्था , वाहन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदींसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. हा युवक महोत्सव अत्यंत दर्जेदार कसा होईल यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी केले. या मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.
