विद्यापीठ परिक्षेत्रात नाट्यशास्त्र विषययाचे धडे देणारे पहिले महाविद्यालय
लातूर दि. १६ दयानंद शिक्षण संस्था संचालित दयानंद कला महाविद्यालय हे शिक्षणाचे माहेरघर म्हणुन ओळखले जाते. या शिक्षण संकुलात कला, क्रीड़ा, संगीत, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, फॅशन, अॅनिमेशन अशा अनेकविध विषयातून विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यातच चालू शैक्षणिक वर्षापासून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंद सोनवणे,ललितभाई शाह,रमेशकुमार राठी,सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन,कोषाध्यक्ष संजय बोरा यांच्या संकल्पनेतून पदवीसाठी नाट्यशास्त्र विषय सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिक्षेत्रात नाट्यशास्त्र विषययाचे धडे देणारे हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
दयानंद कला महाविद्यालयाने अंतर विद्यापीठीय युवक महोत्सवात मागील १२ वर्षात ५ वेळा विजेतेपद व ६ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. सोबतच विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वाधिक पारितोषिके प्राप्त करणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. दयानंद कला महाविद्यालयाने अनेक नाट्यकलावंत, चित्रपट अभिनेते, टीव्ही कलावंत आजतागायत महाराष्ट्राला दिले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकांकिका, प्रहसन, मुक अभिनय, एकपात्री अभिनय, नक्कल, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, दिग्दर्शन आदी स्पर्धात अनेक सुवर्ण पदके पटकावली आहेत.
केवळ दयानंद कला महाविद्यालयच नव्हे तर लातूर जिल्ह्याला एक वेगळे सांस्कृतिक परिमाण लाभले आहे. नाट्य क्षेत्राला वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. परंतु या गुणवंत विद्यार्थ्यांना नाट्य शास्त्राचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेण्याची सोय नव्हती. त्या अनुषंगाने या वर्षी पासून महाविद्यालयाने पदवी अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र विषययाची सुरुवात केली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील नाट्यक्षेत्रात,टेलिव्हिजन व चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्वणी ठरणार आहे.
नाट्यशास्त्र या विषयासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर ल, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे, डॉ देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदीपान जगदाळे, नाट्यशास्त्र विषयाचे प्रा. विजय मस्के यांनी केले आहे.