दिल्लीत होणार त्याच्या कलेच्या सादरीकरण व सन्मान*
लातूर ; (प्रतिनिधी )– दि.१६ भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय व साक्षरता विभागातर्फे भुवनेश्वर, ओडिशा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘कला उत्सव’ स्पर्धेमध्ये ‘चित्रकला’ या कलाप्रकारातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना लातूरच्या दयानंद कलाच्या आदित्य नंदकुमार कुलकर्णी याने सर्वप्रथम क्रमांक पटकावला…!
कला उत्सव हा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण मंत्रालयाचा (MoE) उपक्रम असून, तो देशातील माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेचे संगोपन करून आणि त्यांचे सादरीकरण करून शिक्षणात कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. भारताला कला आणि कलात्मक पद्धतींची प्रदीर्घ परंपरा असली तरी शालेय शिक्षणात कलात्मक प्रतिभा ओळखण्याची एकसमान प्रक्रिया अद्याप विकसित झालेली नाही. आपल्याकडे शिकण्याच्या प्रक्रियेत कला वापरण्याची परंपरा देखील आहे.
ही स्पर्धा देखील असेच एक उदाहरण आहे, ज्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी दि. ०४ सप्टेंबर २०१५ रोजी कला उत्सव या वेबपोर्टलवर या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत होणारी राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव स्पर्धा दि. ०३ जानेवारी २०२३ ते ०७ जानेवारी २०२३ यादरम्यान प्रादेशिक शैक्षणिक संस्था, भुवनेश्वर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन ना. धर्मेंद्रजी प्रधान, केंद्रीय शिक्षा मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते झाले. देशातील सर्व राज्यातील विविध कलागटातून सर्वप्रथम आलेली मुले ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरलेली होती. दि. ०३ जानेवारी २०२३ ते ०५ जानेवारी २०२३ या दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेचे सादरीकरण केले. त्यानुसार मान्यवर परीक्षकांनी केलेल्या परीक्षणानुसार दि. ०७ जानेवारी ना. श्रीमती अन्नपूर्णा देवी, शिक्षण राज्य मंत्री, भारत सरकार यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कला उत्सवामध्ये देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालय असे एकूण ३८ संघ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे एकूण ०९ मुले व ०९ मुली तसेच समन्वयक म्हणून श्री. धनंजय क्षिरसागर व श्रीमती वैशाली गाढवे सहभागी झालेले होते. राज्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे द्विमितीय चित्रकला प्रकारात चि. आदित्य नंदकुमार कुलकर्णी याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला.
आदित्यने ‘भारत माता व तिचे वैभव’ या विषयावर एक संकल्पनात्मक चित्र रेखाटत एक चिमुकला देशभक्त भारत मातेला चरणस्पर्श करत विविध महापुरुषांना मानवंदना देताना तर एक चिमुकली पुस्तकाच्या माध्यमातून शूर स्त्रियांचे धडे गिरवताना दर्शविले आहे. तसेच आदित्यने या चित्रातून देशातील वीर जवानांना आदरांजली वाहिली आहे. एन. सी. आर. टी, नवी दिल्ली या कार्यालयाने दि. १६/०१/२०२३ रोजी आयोजित केलेल्या झूम मिटिंगमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार दि. १९ ते २९ जानेवारी २०२३ याकालावधीत नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेला आदित्य कुलकर्णी याला स्वतःच्या एका पालकांसह उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. या दहा दिवसात तो आपल्या कलेचे सादरीकरण करून प्रजासत्ताक दिनानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांचे तो रंजन करणार आहे. या यशस्वी कलावंताची कला पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राष्ट्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत व यांचा सन्मानही करणार आहेत. आदित्य याला प्रा. डॉ संदिपान जगदाळे, प्रा. डॉ. गोपाल बाहेती, प्रा. दिनेश जोशी, प्रा. अंजली बनसोडे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. सुरेश क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. आदित्यच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सरचिटणीस श्री. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य कमवी अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक रूपचंद कुरे आदींनी त्याचे अभिनंदन केले.