आई मुलांना अशी सोडून जाऊच कशी शकते?
लातूरच्या खाडगाव रोडवरील स्मशानभूमीत आईच्या पार्थिवाला भावाने मंत्राग्नी दिला… आम्ही सगळे घरी परतलो… दिव्याला नमस्कार केला, अंघोळ झाली. खिन्न मनाने बसून राहिलो. कोरोनामुळे स्वतःला इतरांपासून अलग करत जिन्यात काढलेल्या छोट्याशा खोलीत बसलेलो… थोड्या वेळाने शेजार्यांनी पाठविलेल्या पिठलं, भात, पोळीचं ताट समोर आलं. ते ताट पाहून का कोण जाणे माहिती नाही, पण अचानक खूप भडभडून आलं… एकट्यानेच हमसाहमशी रडू लागलो. त्या आधी अनेकदा पिठलंभात खाल्लेला होता… काही आप्तांकडेही अशा दुःखद प्रसंगी गेल्यानंतर हे अन्न घेतलेलं होतं. पण आजच असं भडभडून का यावंं?
परदुःख शीतल असतं, असं म्हणतात. आज ते दुःख माझ्यावर कोसळलं, आई अचानक सगळ्यांना सोडून परलोकी निघून गेली. दुःखाची ही जातकुळी परमेश्वरकृपेने कधी अनुभवायची वेळ आली नव्हती. ती आली तेव्हा तो अनुभव घेणं असह्य ठरलं. आपल्याच आईच्या निधनानंतरचा पिठलं भात एकदम अंगावर आला…
आई अशी अचानक कायमची सोडून जाऊ शकते, हा विचारच कधी मनात का आला नसावा? आपण घरी गेल्यावर हसतमुखाने दार उघडायला येणारी आई… कुठे जाऊन ‘झेंडे गाडून’ आलो तर चौकटीबाहेर थांबवून भाकरतुकडा ओवाळून टाकत दृष्ट काढणारी आणि पायावर पाणी टाकून मगच घरात घेणारी आई… माझे लग्न होईपर्यंत अनेक वर्षे कधीही हिरव्या रंगाची साडी न नेसणारी आणि लग्न ठरल्यावर आधी जगदंबेला हिरवी साडी नेसवून मगच स्वतः परिधान करणारी आई… अशी ही आई आपल्याला सोडून जाते आणि घरात गेल्यानंतर समोर तिचे पार्थिवच दिसते, हे किती भयंकर… आलेला प्रत्येकजण जाणार असतो, पण त्या प्रत्येकात आपण आईवडिलांना कधीच गृहित धरलेलं नसतं. आपण त्यांचे अंश असतो म्हणून हे होतं? असेलही कदाचित.
पण मग हे गृहित धरणं सगळ्याच गोष्टींत होतं आणि ती गेल्यानंतर हे गृहित धरलेलं आपल्यावर धावून येतं. कुठे कुठे गृहित धरलं, ती क्षणचित्रे डोळ्यांसमोरून तरळून जातात आणि आणखीच वाईट वाटायला लागतं. सुखदुःखाचे असंख्य क्षण फेर धरू लागतात. त्या क्षणांची कर्ती मात्र आपल्यात राहिलेली नसते.
ती काल असते आणि आज नसते… किती अविश्वसनीय! ती मध्यरात्रीच्या आधी असते आणि मध्यरात्रीच्या नंतर नसते, हे तर कितीतरी अविश्वसनीय. अशा अविश्वसनीय गोष्टीच आयुष्यात शाश्वत असतात. बाकी आयुष्य मिथ्या.
रात्री थोडा वेळ शांत बसलो होतो. रविवारच्या रात्रीचा क्रमवार आठव करीत होतो. फोन कितीला आला, मी किती वाजता निघालो, केव्हा पोहोचलो या वेळा जुळवताना अचानक आठवले, रात्री एक वाजता मला अचानकच जाग आली होती. अशी जाग मला फारशी कधी येत नाही. त्या रात्री आली. पत्नीला कोविडची लक्षणे जाणवत होती म्हणून मी माझ्या अभ्यासिकेत झोपलो होतो. एक वाजता जाग आली, डबल मास्क लावून बेडरूमध्ये गेलो. पत्नीचा ताप पाहिला. फारसा उतरलेला नव्हता. परत आलो, आडवा झालो, डोळा लागला. 1.24 ला भावाचा, कमलाकरचा पुण्याहून फोन आला, आईला हॉस्पिटलमध्ये घेतले जात नाहीय आणि 1.25 ला वडिलांचा लातुरातून फोन आला… डॉक्टर म्हणतात, ती गेलीय…
रविवारी रात्री 1 वाजता तिला लातुरात घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच तिचे प्राणोत्क्रमण झाले, त्याच वेळी मला औरंगाबादेत अचानकच जाग आली होती…
त्या शेवटच्या क्षणी तिने तीव्रतेने माझी आठवण केली होती का? मला त्याच क्षणी का जाग आली असावी? मला काहीच उमजत नाहीय…
(माझ्या आईचे, साै. शकुंतला उमाकांतराव जाेशी यांचे, रविवार – सोमवारच्या मध्यरात्री 1 च्या सुमाराला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने लातूर येथे निधन झाले. निधनाच्या काही तास आधीपर्यंत तिचे रुटीन व्यवस्थित चालू होते. तिच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारी फेसबुक पोस्ट मी नुकतीच, 20 डिसेंबर रोजी लिहिली होती. एक कार्यक्षम, प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका म्हणून तिने आपल्या पेशाला पुरेपूर न्याय दिला. लातूर जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ही तिला प्रदान करण्यात आलेला होता. ईश्वर तिच्या आत्म्याला सद्गती देवो.
मी कोरोनाच्या संसर्गातून जात असून अशक्तपणामुळे बोलणे थोडे त्रासदायक आहे. कृपया फोन करू नये. मेसेंजर अथवा व्हाटसअप मेसेज करू शकता. धन्यवाद.)
दत्ता जोशी
जेष्ठ पत्रकार, औरंगाबाद