आजचं तेर म्हणजे एक निमशहरी गाव.. उस्मानाबाद (धाराशिव ) पासून 32 की. मी आणि लातूर पासून 55 की. मी. काय आहे या गावात…?
प्राचीन भारत समजून घ्यायचा असेल तर या गावाला भेट द्यावी… प्राचीन तगर शहराची रचना 10 चौरस किलो मीटरची.. पुरातत्व विभागाने आज पर्यंत 12 साईटचे उत्खणन केलं आहे.. त्यात पोत्यांनी वस्तू सापडल्या आहेत… इथं बुद्ध धम्माचं पीठ होतं तसं इथं जैन धर्माचं पीठ होतं… एवढंच नव्हे तर रोमनांच्या वसाहती होत्या.. ज्या काल परत्वे आपल्यातच मिसळून गेल्या… दक्षिणपथावरचं मोठं सांस्कृतिक, व्यापारी केंद्र जे भडोच बंदराशी संलग्न होतं… माती पासून बनवलेली भांडी, बाहुल्या, मानवी चेहरे.. इथले मंदिरे, स्तूप.. प्रचंड मोठा प्राचीन सांस्कृतिक वारसा पोटात घेऊन जमिनीत गाढले गेले…परकीय लोकं मागच्या दोनशे वर्षांपासून यावर शोध प्रबंध, पुस्तकं लिहीत होती.. आपण 60 च्या दशकापासून यावर अधिक गांभिर्याने बघायला लागलो.. 60 नंतर यावर भारतीय लोकं संशोधन करायला लागली, अनेकांनी तेरवर रिसर्च पेपर लिहली.. एवढं होऊनही अजून खूप काही जगाच्या नजरेच्या टप्यात आलं नाही.. आपलं संशोधन क्षितिज अधिक वाढविण्याची गरज आहे…
तेर मधला एक एक विषय घेऊन संशोधन केलं त्यावर ग्रंथ तयार होतील एवढी संपदा इथे आहे… बघता बघशील किती दो नयनांनी अशी अवस्था आहे.. त्यामुळे पुढच्या ज्या ज्या वेळी सुट्या असतील मी तेर मध्ये असेन.. तिथल्या मातीचा गंध घेत.. या जन्मात येऊन कोणाला तेर बघता येत नसेल तर तुम्ही बरंच मिस करतायत हे नक्की.. तिथलं बघितलं की तुम्ही शेकडो शतकं मागे जाऊन शोध घ्यायची अभिलाषा बाळगता.. हे नक्की.. या तेर बघा.. आणि समृद्ध इतिहासाची एवढी देखणी जमिनीवर असलेली पानं पाहणं आपल्या देशात तरी दुर्मिळ गोष्ट आहे.. साक्षीदार व्हा…!!
@युवराज पाटील
(लेखक हे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)