प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
औसा ( वृत्तसेवा) – यावर्षी पाऊस समाधानकारक झाला नसल्याने निम्न तेरणा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा विचार करुन सिंचनास पाणी उपसा बंद केला आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य तो मार्ग निघावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मृत पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भातील अंतिम निर्णयाचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने बैठकीतून आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत सिंचनासाठी उपसा करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे निम्न तेरणातून सिंचनासाठी पाणी उपसा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
निम्न तेरणा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी लागणार्या पाण्याचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील सिंचनासाठीचा पाणी उपसा बंद केला आहे. एकीकडे अपेक्षित पाऊस न झाल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजीही घेणं गरजेचं आहे. त्यामुळे यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन धोरण ठरविण्यासाठी आढावा बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाकडे केली होती,यावरून (दि.१९) आॅक्टोबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपयुक्त पाणीसाठा पाणीपुरवठा योजनांसाठी वापरायचा आणि उर्वरित साठ्यातून नोव्हेंबर अखेरपर्यंत सिंचनासाठी पाणी उपसा करण्यास शेतकऱ्यांना परवानगी द्यायची असा सुवर्णमध्य साधण्याचा निर्णय या बैठकीत झाला. मृत पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भातील अंतिम निर्णयाचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने बैठकीतून आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत सिंचनासाठी उपसा करण्यास परवानगी देण्याची आग्रही विनंती केली. यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत प्रस्ताव आजच तयार करुन मंजुरीसाठी सादर केला जाईल व उद्या मुंबई दौऱ्यादरम्यान या विषयाचा पाठपुरावा करण्याचे नियोजन असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
या बैठकीला खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे - ठाकूर, अधीक्षक अभियंता चिस्ती, कार्यकारी अभियंता अमर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, संबंधित सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.