लातूर. : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसापैकी किमान १५० टीएमसी हुन अधिक पाणी सह्याद्रीच्या पर्वत रांगातून समुद्राला जाऊन मिळते. हे वाहून जाणारे पाणी जर कायम दुष्काळ – अवर्षणाच्या गर्तेत असणाऱ्या मराठवाड्याकडे वळवले गेले तर मराठवाडाही जलसमृद्ध होईल आणि या परिसराचे मागासलेपण कायमचे दूर होईल , असे मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष , सहकारमहर्षी आ. डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले. लातूर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर यांची कन्या चि . सौ. कां. ऋतुजा व कुमार उटगे यांचे चिरंजीव प्रतिक यांच्या विवाह सोहळ्याच्या अनुषंगाने आ. डॉ. विनय कोरे लातूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने नरेश चंद्रशेखर पेद्दे यांच्या जुना औसा रोड वरील निवासस्थानी आ. विनय कोरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते आपले विचार व्यक्त करीत होते.
राज्यातील विद्यमान सरकारकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यासाठी आ. कोरे यांचे योगदान अत्यंत महत्वाचे राहिले आहे. त्यानिमित्ताने बाबासाहेब कोरे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विश्वनाथ निगुडगे, मनोहरमामा पाटील, जि. प. सदस्य महेश पाटील, प्रा. राजेश विभुते, इरण्णा पावले, रितेश पाटील, दयानंद पेद्दे, डॉ. ओमप्रकाश भोसले , अॅड. अविनाश भोसीकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना आ. डॉ. विनय कोरे म्हणाले की, लिंगायत समाजाचे राष्ट्राच्या उन्नती मध्ये मोठे योगदान राहीलेले आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना व महाराष्ट्राच्या जडणघडणीत लिंगायत समाजाने महत्वाची भूमिका साकारली आहे ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यातून छोट्या – छोट्या उद्योगातुन आपल्या कार्य कर्तृत्वाने ,शांत संयमी उद्यमशील, प्रखर राष्ट्रभक्त म्हणून लिंगायत समाजाने इतर समाजाला सोबत घेऊन जाणीव व आपली ओळख निर्माण केली होती. आज आम्ही सर्वच क्षेत्रात मागे पडलो आहोत. कधीकाळी व्यापारात वर्चस्व असलेला हा समाज आजमितीस कुठे आहे ? यावर चिंतन झाले पाहीजे. समाज बांधवांनी संघटीत होऊन महात्मा बसवेश्वरांच्या आचार-विचार, वचन साहित्याचा पुनर्विचार केला पाहीजे. लिंगायत समाजाचे पुनर्वैभव मिळवण्यासाठी पुन्हा एकदा एकदा समाजातील सर्वच घटकांनी आपापसातील मतभेद , हेवेदावे विसरून एकत्रित येणे काळाची गरज आहे. क्षेत्र कोणतेही असो, सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे आहे. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या लिंगायत समाजाची आज राजकीय क्षेत्रात लक्षणीय अशी उदासीनता आहे. आपल्या समाजातही समाजाला दिशा देऊ शकणारे चांगले नेते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र त्यांना दुर्दैवाने आपले नेतृत्व गुण , नेतृत्व क्षमता दाखवून देण्याची संधी मिळू दिली जात नाही. यामागच्या कारणांचा शोध घेणे खूप गरजेचे आहे. तरच आगामी काळात आपला समाज आपले अस्तित्व राखून ठेवू शकेल, यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे,असेही आ. डॉ. कोरे म्हणाले.
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून लिंगायत युवक – व्यापार्यांना उद्योग- धंद्यासाठी बिन व्याजी भांडवल प्राप्त होऊन यातून आर्थिक उन्नती साधता येईल. तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता महामंडळाकडून करण्यात येईल. मंगळवेढा येथे लवकर बसकल्याणच्या धर्तीवर महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभा करून या स्मारकातून वचन साहित्य मानवीय जीवनावर सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल यात शंका नाही. मराठवाड्यातील शेती मध्ये शेतकरी सोन पिकवू शकतो. परंतु मराठवाड्याला शाश्वत पाण्याचा स्रोत नसल्याकारणाने शेतकरी हतबल झालेला आहे. कृष्णा उपखोर्यातील व तापी खोऱ्यातील ५० टक्के समुद्राला वाहुन जाणारे पाणी वंचित मराठवाड्यासाठी वळविण्याचे वेगाने प्रयत्न होत आहेत. असे झाल्यास येथील शेतकरी सोने पिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. राजेश विभूते यांनी तर आभार प्रदर्शन नरेश पेद्दे यांनी केले. या कार्यक्रमास लिंगायत समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, व्यापारी, वकील, शिक्षक, शेतकरी, शैक्षणिक कार्य करणारे संस्थाचालक उपस्थित होते.