लातूर : माझं लातूर परिवार आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त मोफत पंढरपूर वारीचा उपक्रम राबविण्यात आला. ११४७ भाविक प्रवाशी, ६० स्वयंसेवक, २ रुग्णवाहिका आणि विक्रमी २५ ट्रॅव्हल्सने एकूण १२०७ भाविक भक्त पंढरपूरकडे रवाना करून राज्यात एक नवीन लातूर पॅटर्न निर्माण केला.
या ऐतिहासिक वारी उपक्रमास लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह माझं लातूर परिवाराचे डॉ. सदानंद कांबळे, आदित्य भुतडा, शाम तोष्णीवाल, उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले की पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत जात असताना संयोजकांनी आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना भाविकांनी पाळाव्यात ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. अधिक गर्दीत जाण्याचे टाळावे. डॉक्टर लक्ष्मण देशमुख व प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी मनोगत व्यक्त करून सहभागी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
माझं लातूर परिवार आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात ११४७ भाविकांना पंढरपूरला दर्शनासाठी पाठवण्यात आले.

या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी ६० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच २ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, ४ नर्सिंग स्टाफ अत्यावश्यक औषधांसह या ताफ्यात होते. सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली होती. अतिशय उत्साही वातावरणात, पांडुरंगाचा गजर करीत ही वारी पंढरपूरला सकाळी ८ च्या दरम्यान रवाना झाली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, योगेश शिंदे, अभय मिरजकर, काशिनाथ बळवंते, डॉ. सितम सोनवणे, तम्मा पावले, प्रमोद गुडे, संजय स्वामी, ऍड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दिपरत्न निलंगेकर, ऍड.राहुल मातोळकर, गोविंद हेड्डा, गणेश हेड्डा, अभिजित पिचारे, मच्छिंद्र आमले, विनोद कांबळे, सचिन अंकुलगे, सचिन सोळुंके, प्रा अजय वाघमारे, भास्कर कुंभार, विष्णू साबदे, सुनिल गवळी, रत्नाकर निलंगेकर, राम साळुंके, एस आर काळे, उमेश कांबळे, अमर करकरे यांनी परिश्रम घेतले.
