भोंदू , स्वार्थलोलूप बाजारबुणगे काय समाजाचे परिवर्तन करणार ?
प.पू.विद्यानंदजी महाराजांचा खडा सवाल
◆बाबांच्या भागवत कथेस दिवसागणिक वाढती गर्दी ◆
माध्यम वृत्तसेवा
लातूर , दि.२९ (प्रतिनिधी ) –कुठलीही कथा असो की कीर्तन , ते समाज परिवर्तनासाठी असते . धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी कथा ही असते. परंतु महाराष्ट्रात अशा तथाकथित कथाकारांचे , भोंदू बाबांचे पेव फुटले असून त्यांनी कथेचा बाजार मांडला आहे .धार्मिकतेच्या नावावर या तथाकथित महाराजांनी आपली दुकानदारी चालवली आहे .असे बाजार बुणगे काय कथा सांगणार आणि काय समाजाला मार्ग दाखवणार … ? कुठले परिवर्तन हे घडवून आणणार … ? असा संतप्त सवाल प.पू. विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांनी विचारला .
श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात दुपारी एक ते चार या वेळेत आणि १ जानेवारी 2023 या कालावधीपर्यंत विद्यानंदजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या पाचव्या दिवशीच्या आशीर्वचनात बाबा बोलत होते .या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे बाबा 'जे बोलतात ते करतात ,आणि जे करतात तेच बोलतात ' म्हणून ते अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आहेत. बाबा गर्दी वाढवण्यासाठी किंवा श्रोत्यांना आवडावे म्हणून कथा सांगत नाहीत तर समाजात चालू असलेल्या अनिष्ट रूढी ,परंपरा , अंधश्रद्धा यावर भाष्य करीत आपल्या कथेमध्ये त्यावर प्रकाश टाकतात ; म्हणून बाबांच्या कथेस दिवसागणिक गर्दी वाढत चालली आहे. सुमारे आठ ते दहा हजार श्रोते बसतील एवढा भव्य मंडप संयोजकांनी उभा केला असून हा मंडप भाविकांच्या गर्दीने खचाखच भरून जात आहे. यात महिलांचे उपस्थिती लक्षणीय आहे .
विद्यानंदजी महाराजांनी कथेच्या पाचव्या दिवशी काही प्रसंग , काही उदाहरणे देत कथा रंजक केली. सद्यस्थितीवर भाष्य करताना बाबांनी तथाकथित कथाकार , भोंदू बाबा यांच्यावर तिखट शब्दात प्रहार चढवला. ते म्हणाले की , सध्या महाराष्ट्रात भागवत कथा, कीर्तन आदीचे पेव फुटले असून यात काही तथाकथित कथाकार स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी खोटी भक्ती दाखवत कथेचा बाजार मांडत आहेत. त्यांना या देशाचे , समाजाचे काहीही देणेघेणे नसते .समाजातील समस्या, समाजातील प्रश्न याचे त्यांना काहीही देणे घेणे नाही .त्यांना फक्त आणि फक्त स्वतःची तुंबडी भरायची असते. अशा बाजारबुणग्यां पासून सावधान रहा .
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर अवतार घेतात .साधुसंत, ऋषी , कथाकार, समाजसुधारक धर्मकार्यासाठी एकवटतात. सगळेच बाबा ,महाराज ,कथाकार वाईट आहेत असे नाही . यात बरेच जण देशभक्त, राष्ट्रनिष्ठ आहेत . मातृभूमीच्या रक्षणासाठी ते स्वतःला बांधून घेतात. त्यासाठी स्वतःला वाहून देखील ते घेतात . त्यामुळे हा देश एकसंघ आहे .असे बाजार बुणगे भोंदू बाबा , तथाकथित कथाकार हे स्वतःची दुकानदारी चालवत असले तरी ते औट घटकेचे असते .राष्ट्रसंत मोरारी बापू सारखे कथाकार या देशात आहेत .त्यांच्यावर समाजाची श्रद्धा आहे. कोणाला तरी वाईट वाटावे म्हणून आपण अशा तथाकथित कथाकारांना नाव ठेवत नाही किंवा त्यांची निंदा नालस्तीही करीत नाही ; तर समाजाला, भोळ्या भाबड्या भक्तांना सावध करण्यासाठी , त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी असे कठोर शब्द वापरावे लागतात असेही पूजनीय बाबांनी या कथेत बोलताना स्पष्ट केले.
आजच्या कथेत विद्यानंदजी महाराजांनी भागवत ग्रंथांचे , भागवत कथेचे महत्व विस्ताराने सांगितले. भागवत ग्रंथ कसा आहे ? या ग्रंथातील कथा ही भाकडकथा नसून किंवा ते पुराण देखील नाही तर भागवत ग्रंथ हा प्रत्येक माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा , त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे .माणसाला शुद्ध आणि सात्विक, सदाचारी , विवेकी बनवण्यासाठीचा हा ग्रंथ आहे . त्यामुळे प्रत्येकाने भागवत कथा ऐकावी .हा ग्रंथ आपल्या घरी ठेवावा , असे आवाहनही त्यांनी केले. बरेच जण महाभारताची प्रतिमा घरी लावत नाहीत यामुळे घरात महाभारत घडेल असा त्यांचा समज आहे.महाभारत घरी लावत नाहीत यावर बोलताना बाबा म्हणाले ,हे चुकीचे आहे .आज आपण महाभारता ऐवजी रामायणाची कथा घरी ऐकायला पसंती देत असतो .रामायणा इतकाच महाभारत हा ग्रंथ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.
हभप गहिनीनाथ महाराजांचा सन्मान
औसा येथील नाथपिठाचे हभप गहिनीनाथ महाराज यांनी कथेच्या पाचव्या दिवशी कथा मंडपात येऊन बाबांची कथा श्रवण केली. त्यांनी भागवत ग्रंथ व बाबांचे पूजनही केले आणि बाबांना पंढरपूर येथे येण्याचे निमंत्रणही दिले. संयोजन समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराजांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष संजय बोरा व विशाल जाधव यांनी महाराजांचा सत्कार केला. यावेळी औसेकर महाराजांनी आपल्या आशीर्वाचनात जो भागवत ग्रंथाचे वाचन करतो त्याला देवाजवळ जाण्याची किंवा देव समजून घेण्याची गरज नाही . भागवत ग्रंथाचे श्रवण केल्याने मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो असे ते म्हणाले.
प्रारंभी गणपतराव बाजुळगे, अँड. श्रीपाद सूर्यवंशी , डॉ. सचिन सगर, जयप्रकाश पाटील, सुखदेव पाटील आदींनी बाबाचे पूजन केले. अँड प्रदीप मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.