सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित ऑनलाईन मुलाखत
लातूर –
२०२१-२२ ह्या शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली लातूरची उर्वी भाऊराव यादव ह्या विद्यार्थिनीने आपल्या यशाचे श्रेय पालक आणि शिक्षक ह्यांच्या प्रेरणेला दिले असून, त्यांनी अपेक्षांचे दडपण टाळून अभ्यासातील सातत्य राखण्यास अवश्य असलेला आत्मविश्वास दिला असे मुलाखतीत सांगितले.
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दि. १२ ऑगस्ट रोजी आयोजित ऑनलाईन मुलाखतीत उर्वी आत्मविश्वासाने बोलत होती. ह्या परीक्षेत जवळपास २१ लाख विद्यार्थी बसले होते. एकूण ५०० पैकी ४९९ गुण व ९९.८८ टक्के गुण प्राप्त करत उर्वी यादव हिने लातूरच्या शालेय शिक्षण प्रणालीचाही गौरव वाढवला. राज्यात पहिल्या तर देशात चक्क दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारी ती एकमेव विद्यार्थिनी आहे. लातूरच्या पोदार आंतरराष्ट्रीय विद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ दांपत्य डॉ. भाऊराव यादव व डॉ. सौ. यादव यांची ती कन्या आहे.
या मुलाखतीत उर्वीने उपस्थित विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या अभ्यासासाठी अवलंबलेल्या पद्धतींचा आणि पुस्तकादी साधनांचा वापर, वेळेचे नियोजन, अभ्यासाव्यतिरिक्त परिक्षेची तयारी, अभ्यासक्रमावितिरिक्त स्पर्धात्मक व शिष्यवृत्ती परीक्षा यांचे महत्व सांगून, इतर उपशैक्षणिक वाचन व छंद जोपासत राहिलो, तर उत्तम व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे सोपे जाते, असे सांगितले. तिच्या स्पष्ट व स्वच्छ संकल्पना आणि निर्भीड व अस्खलित निवेदनशैलीने उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अक्षरश: चकित केले. विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची तिने अतिशय मुद्देसूद उत्तरे दिली व आपली योग्यता सिद्ध केली. यावेळी तिचे पालक डॉ. यादव दांपत्यही उपस्थित होते. त्यांनीही पालकांच्या मार्गदर्शनार्थ विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांना घडवण्यासाठी आणि त्यांच्यात अभ्यासवृत्ती निर्माण होण्यासाठी केलेल्या तडजोडीची आणि तयारीची माहिती दिली. विशेषत: टीव्ही, मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वापरावरील स्वेच्छानिर्बंधांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याचप्रमाणे मुलांचे आरोग्य व निरोगी मानसिकता जपण्यासाठी पालकांनी स्वत: शिस्त आणि आखीवपणा अंगी बनवून घेतला तर मुलांवर संस्कार करणे सहज होते हा अनुभव सांगितला. विशेषत: कोरोनाकाळामुळे ज्ञात झालेल्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीचे फायदे-तोटे यादव दांपत्याने विस्ताराने विशद केले; मात्र कुठल्याही प्राप्त व अपरिहार्य परिस्थितीने डगमगून न जाता ती स्वीकारून आपले ध्येय साध्य करण्यासाठी संयम कसा राखला हे सोदाहरण स्पष्ट केले.
या मुलाखतीत प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांच्यासह प्रा. मनोहर कबाडे, पानगावच्या बालासाहेब यादव, वैजनाथ चामले, मुरलीधर डोणे या शिक्षकांनी सहभाग घेतला व विविध प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेरक अशी माहिती दिली. याप्रसंगी, देशभरातील अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांनीही प्रश्न आणि प्रतिक्रिया देत मुलाखत अधिकाधिक माहितीपूर्ण व यशस्वी केली. एरवी केवळ उत्तर व दक्षिण भारतातील विशिष्ट विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे प्राबल्य असलेल्या या परिक्षेतील उर्वीच्या नेत्रदीपक यशामुळे मराठवाड्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण केल्याचे मत सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.