मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मुंबईत सन्मान.
लातूर.दि.२ येथील दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्रयोगशील प्रा.डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यातील शिक्षकांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. ०५ सप्टेंबर, २०२३ या शिक्षकदिनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्या हस्ते टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ.जगदाळे यांनी आतंरराष्ट्रीय जर्नल्स, मासिके व वृत्तपत्रातून ६० लेख प्रकाशित केले आहेत. डॉ.जगदाळे यांच्या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थीनी राष्ट्रीय कला व क्रीडा पुरस्कार प्राप्त केले आहेत. डॉ.जगदाळे यांचे सलग चार वर्ष राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन,दोन राष्ट्रीय पुरस्कार इतर ०८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी २ शिक्षक हस्तपुस्तिका व २ पाठ्यपुस्तकांचे सहलेखन, ३ पुस्तकांचे संपादन व १२ पुस्तकाचे लेखन अशा एकूण १९ पुस्तकांचे लेखन केले आहेत. यातील काही पुस्तके अमेरिका,कॅनडा या देशात पोहोचली आहेत.
डॉ जगदाळे यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांनी स्वतःच्या वेबसाईट, शैक्षणिक अँप, युट्युब चॅनेलची निर्मिती केली असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना मोफत व आनंददायी शिक्षण देत आहेत. त्यांचे दीक्षा या राष्ट्रीय अँप वर १० व्हिडीओ अपलोड झाले आहेत.
त्यांनी गोंड आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. एचआयव्ही पीडित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले. कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. कोरोना काळात दूरदर्शन, रेडिओ व वृत्तपत्रातून पोवाडा, लोकगीत, लेखन व व्हिडिओच्या माध्यमातून कोरोना जनजागृती केली.
डॉ. जगदाळे यांनी राज्यमंडळ सदस्य, स्वरातीम विद्यापीठ नांदेड येथे सिनेट सदस्य, भारतीय संगीत अभ्यासगट सदस्य, बालभारती, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे संगीत अभ्यास मंडळ सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना लातूर विभागीय समन्वयक आदी प्राधिकरणावरून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ जगदाळे यांना प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, सहाय्यक शिक्षण संचालक डॉ दत्तात्रय मठपती, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. जगदाळे यांच्या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह,रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालय अधीक्षक संजय तिवारी, मधुकर ढमाले यांच्यासह महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.