प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर
खा.शरद पवारांच्या हस्ते रविवारी सातार्यात होणार वितरण
लातूर,दि.४ः(वृत्तसेवा ) येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता (डीन) आणि विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाराष्ट्रामध्ये वैचारिक साहित्याला वाहिलेल्या विचारशलाका या त्रैमासिकाचे संपादक प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांना सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले-आंबेडकर साहित्य पंचायत सातारा यांच्या वतीने देण्यात येणारा २०२३-२४ चा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष,प्रसिध्द साहित्यिक माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांंनी केली आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण रविवार,दि.९ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता,शारदाश्रम जकातवाडी,सातारा येथे,पुरस्कार वितरण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद वार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी खा.श्रीनिवास पाटील हे राहणार आहेत,असे सांगून या पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ.लक्ष्मण माने यांनी केले.
प्राचार्य डॉ.नागोराव कंुंभार हे गेली ३८ वर्षे सातत्य व गुणवत्ता टिकवून विचारशलाका या नियतकालिकाचे संपादन करीत आहेत.राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेचा आणि स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय,लोकशाही,समाजवाद,धर्मनिरपेक्षता आदी मूल्ये आणि तत्वांचा तसेच भारतीय संविधान यांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी मराठवाड्यातील लातूरसारख्या शहरात राहून विचारशलाका चालवून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य अत्यंत व्रतस्थवृत्तीने केलेेले आहे.
त्यांनी समाजप्रबोधनाच्या दृष्टिने म.गांधींजींचे सामाजिक तत्वज्ञान,गांधीजींची सत्याग्रहाची संकल्पना, भ्रष्टाचारः स्वरुप व संदर्भ, डॉ.आंबेडकरांचे शैक्षणिक तत्वज्ञान, महाराष्ट्रातील धेय्यवादी तत्वचिंतक, सामाजिक कार्याच्या दिशा, विचारतरंग, तरुण मनाच्या लाटा आणि वळण आदी ग्रंथांचे लेखन केले असून,त्यंानी चिंतन एका कुलगुरुचे,शिक्षण विचार, महाराष्ट्रातील समाजचिंतन, सर्वस्पर्शी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण आदी ५० ग्रंथांचे संपादन केलेले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ विद्यार्थी एम फिल तर ११ विद्यार्थी पीएच.डी.पदवी संपादित झाले आहेत.
त्यांनी शासकीय व निमशासकीय विविध समित्यांमध्ये लोकोपयोगी कार्य केलेले आहे. त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य,महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य दर्शनिक मंडळाचे सदस्य आणि पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून भरीव काम केलेले आहे.
ते महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार,आंतरराष्ट्रीय शिक्षण व व्यवस्थापन संस्था,दिल्लीचा उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार,महाराष्ट्र फाउंडेशनचा ५०००० चा पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा श.वा.किर्लोस्कर पुरस्कार या व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानीत आहेत.त्यांच्या या व्यापक कार्याची नोंद घेवून आम्ही सन २०२३-२४ च्या प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कारासाठी त्यांची निवड केली असल्याचे माजी आ.लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे.