16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रकट मुलाखतीतून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा*

*डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रकट मुलाखतीतून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा*

मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे जुलमी सत्तेविरुद्ध जनतेचा लढा’

डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रकट मुलाखतीतून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा

• ●मराठवाडा मुक्तिसंग्रामातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा भिन्न●
• ◆मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रत्यकाने समजून घेण्याची गरज◆
• ●महिलांनीही मुक्तिसंग्रामात दिले महत्वपूर्ण योगदान

लातूर, दि. 15 (वृत्तसेवा) -: मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा या लढ्याला होती. निजामाच्या अन्यायी जुलमी सत्तेविरुद्ध जनतेने दिलेले हा लोकलढा होता. या लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित प्रकट मुलाखत कार्यक्रमात डॉ. वाघमारे आणि डॉ. रोडे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर यांनी ही प्रकट मुलाखत घेतली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, माजी सनदी अधिकारी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हा पूर्णतः भिन्न होता. स्वातंत्र्य लढा हा केवळ राजकीय पारतंत्र्याविरुद्ध होता. मात्र, मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा पाच पातळीवरील गुलामगिरीविरुद्ध होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मराठवाडा मुक्तिसंग्राम हा क्लिष्ट आणि किचकट स्वरूपाचा लढा होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन डॉ. वाघमारे यांनी दोन्ही लढ्यातील वेगळेपण मांडताना केले. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास आजही दुर्लक्षित असून इतिहास अभ्यासकांनी यावर आणखी प्रकाश टाकून हा इतिहास सर्वदूर पोहचवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हैदराबाद संस्थानावर सुमारे 224 वर्षे निजामशाही राजवट होती. या काळात झालेल्या सात निजामांपैकी सातवा निजाम नवाब मीर उस्मान अली बहादूर हा अतिशय वेगळा होता. त्यापूर्वी झालेल्या निजामांच्या राजवटीत सर्वसामान्य जनतेचे शोषण झालेच, पण सातव्या निजामाच्या काळात जनतेच्या आर्थिक शोषणासह शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक निर्बंधही लादले गेले. अतिशय साधे राहणीमान असलेल्या या निजामाला सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड हव्यास होता. त्याचे विचार साम्राज्यवादी होते. त्यामुळे त्याने ब्रिटीश भारतातून परत गेल्यानंतर हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळविण्यासाठी सर्व तयारी अगोदरपासूनच सुरु केली होती. यासाठी त्याने संस्थानाचे स्वतंत्र चलन, उच्च न्यायालय, डाक यंत्रणा सुरु केली होती. तसेच या निजामाच्या काळात रझाकारांनी अतोनात अत्याचार केले, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात विविध जाती-धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या लढ्यात आर्य समाजाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण होते. आचार्य वेदप्रकाश हे आर्य समाजाचे या लढ्यातील पहिले हुतात्मा. वयाच्या केवळ विसाव्या वर्षी, 1937 मध्ये त्यांना हौतात्म आले. हैदरबाद संस्थानाच्या बाहेरूनही अनेक आर्य समाज बांधव या लढ्यात सहभागी झाले होते. यापैकी अनेकांनी मुक्तिसंग्रामात हौतात्म पत्करले. स्टेट कॉंग्रेस आणि महाराष्ट्र परिषदेनेही मराठवाडा मुक्तिसंग्रामात महत्वपूर्ण भूमिका बजाविली. महाराष्ट्र परिषदेच्या लातूर येथे झालेल्या दुसऱ्या अधिवेशनामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व या लढ्याला मिळाले, असे डॉ. रोडे यांनी सांगितले.

रझाकार संघटना 1945 ते 1948 या काळात अतिशय आक्रमक झाली होती. सर्वसामान्य जनता, तसेच मुक्तिसंग्रामाला मदत करणाऱ्यांविरुद्ध अतिशय क्रूरपणे हल्ले केले जात होते. या काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिल्ली येथे जावून महात्मा गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी राझाकारांकडून होणाऱ्या अपरिमित अत्याचाराच्या घटना ऐकून महात्मा गांधी यांनी जशास तसे उत्तर देण्याची परवानगी दिली होती, असे डॉ. रोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदान महत्वपूर्ण

मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदानाविषयी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. रोडे म्हणाले, या लढ्यात महिलांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. महाराष्ट्र परिषदेसोबत आयोजित होणाऱ्या महिला परिषदेमध्ये ग्रामीण भागातील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत होत्या. स्वातंत्र्य सैनिकांचा निजाम सैन्य, रझाकार यांच्यापासून बचाव करण्यापासून त्यांना जेवणाची सोय करण्याची जबाबदारी महिला स्वातंत्र्य सैनिकांनी पार पाडली. तसेच निजाम सैन्याला माहिती न होता बॉर्डर कॅम्प येथून स्वातंत्र्य सैनिकांसाठी शस्त्रे घेवून येण्याचे कामही महिलांनी पार पाडले, असे डॉ. रोडे यांनी यावेळी सांगितले.

सुमारे दोन तास चाललेल्या या प्रकट मुलाखतीमध्ये डॉ. वाघमारे, डॉ. रोडे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला उजाळा दिला. तसेच मराठवाडा, विशेषतः सध्याच्या लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या घटना, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनाविषयी माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची रूपरेषा अधोरेखित करून या लढ्यात समर्पणाने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांचा सत्कार करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]