मधुमेह तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेत
डॉ. भराडिया जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
लातूर : लातूर येथील कार्निव्हल रिसॉर्टमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मधुमेह तज्ज्ञांच्या ‘ डायबेटिस कंट्रोवर्सीज टू कॉन्सेंसस ‘ या राज्यस्तरीय परिषदेत लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मागच्या तब्बल ५७ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत अग्रेसर असणारे ज्येष्ठ डॉ. गो.रा. भराडिया यांना त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लातुरात ही राज्यस्तरीय मधुमेह तज्ज्ञ परिषद दि. १३ व १४ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडली. या परिषदेचे उद्घाटन मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलचे वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजय पणीकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे होते. याप्रसंगी मंचावर आयएमएचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश भराटे , आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जमादार, डॉ. चेतन सारडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेचे आयोजन डेक्कन डायबेटिस फोरम , आयएमए लातूर व एपीआय अर्थात असोसिएशन फॉर फिजिशियन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या परिषदेत राज्याच्या विविध भागातून ५०० हून अधिक मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय परिषदेत तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनीही आपले प्रबंध प्रस्तुत केले.

या कार्यक्रमात मागच्या तब्बल ५७ वर्षांपासून म्हणजे सन १९६६ पासून लातुरात वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ डॉ. गो. रा. भराडिया यांना डॉ. विजय पणीकर आणि सोमय मुंडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण सभागृहाने उभे राहून डॉ. भराडिया यांना मानवंदना दिली. डॉ. भराडिया यांच्यासह छत्रपती संभाजीनगरचे डॉ. संजीव इंदूरकर , डॉ. दीपक भोसले, नांदेडचे डॉ. संतोष मालपाणी, मुंबईच्या डॉ. लोतिका पुरोहित, सोलापूरच्या डॉ. सचिन मुळे यांचाही वैद्यकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना डॉ. विजय पणीकर यांनी योग्य जीवनशैली, आहार, व्यायाम, मनःशांती हीच मधुमेहापासून दूर राहण्याची पंचसूत्री असल्याचे सांगितले. आपल्या देशात मागच्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. त्यामुळे अशा प्रकारच्या परिषदांची नितांत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर अष्टेकर यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदा शक्यतो मुंबई – पुण्यासारख्या मोठ्या शहरात आयोजित केल्या जातात. पण लातूरसारख्या दुर्गम भागात ज्या ठिकाणी विमानसेवा, रेल्वेसेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या शहरात ही परिषद आयोजित करण्याकामी आपण सर्वांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले. या माध्यमातून अत्याधुनिक उपचार पध्दतीची माहिती , वरिष्ठांच्या मौलिक मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. मधुमेहाबद्दलचे समज -गैरसमज दूर करण्यासाठीही या परिषदेचा उपयोग झाल्याची भावना डॉ. अष्टेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ. चांद पटेल यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. चंद्रशेखर अष्टेकर, डॉ. चांद पटेल यांसह डॉ. जयदीप रेवले सातारा, डॉ. मयुरा काळे, छत्रपती संभाजीनगर, लातूर मधील डॉ. प्रदीप नागुरे , डॉ.स्नेहल शिवपूजे , डॉ. शितल सोमाणी, डॉ. निखिल दरक , डॉ. शितल पाटील , डॉ. किरण डावळे , डॉ. सदानंद कांबळे, डॉ. प्रदीप इंदलकर आदींनी परिश्रम घेतले.
———————————