लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल काढण्यासाठी प्रयत्नशील
छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर विकसित करणार
टाटा रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. कैलाश शर्मा यांचा मनोदय
लातूर 🙁 माध्यम वृत्तसेवा):–लातूर -धाराशिव परिसरातील कर्करुग्णांना अद्ययावत उपचार उपलब्ध व्हावेत आणि बायोप्सीचे रिपोर्ट जलद गतीने मिळावेत यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या धर्तीवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू ,असे आश्वासन टाटा रिसर्च सेंटर चे संचालक डॉ. कैलाश शर्मा यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिले. लातूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ऑनको पॅथॉलॉजी हेमेटॉलॉजी कॉन्फरन्स च्या निमित्ताने डॉ. शर्मा लातूर येथे आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कर्करोगाचे प्रभावी निदान करण्यासाठी बायोप्सीचे रिपोर्ट लवकर व्हावेत आणि सर्वसामान्य रुग्णांना कॅन्सर वरील उपचार परवडावेत यासाठी जिल्हास्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कर्क रुग्णालये उभारण्याच्या भूमिकेतून तसेच कर्क रुग्णांना मुंबईला येणे खूप लांब पडते. यासाठी टाटा रिसर्च सेंटरने वाराणसी येथे दोन, पंजाब मध्ये दोन, विशाखापट्टण आणि गुवाहाटी येथेही अद्ययावत कर्करुग्णालये उभारली आहेत असे डॉक्टर शर्मा म्हणाले. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार कॅन्सरचे प्रमाण जगभरात सध्या वाढत चालले आहे. विविध प्रकारच्या कॅन्सरने लोक पीडित आहेत, असे सांगून ते पुढे म्हणाले, भारतात सध्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या 13 ते 14 लाख असून त्यापैकी दरवर्षी सहा ते सात लाख रुग्ण मृत्यू पावतात. येत्या 2030 पर्यंत भारतातील ही संख्या 20 ते 22 लाखापर्यंत पोहोचेल आणि त्यापैकी दरवर्षी बारा लाख च्या जवळपास रुग्ण मृत्यू पावण्याची शक्यता आहे.
कॅन्सरचे प्रकार विविध असून त्यापैकी काही कॅन्सर कमी प्रमाणात आढळून आले आहेत, तर काही कॅन्सर मात्र झपाट्याने वाढताना दिसतात. याच्या कारणांचा शोध घेतला असता जनसंख्या वाढ हे एक कारण असून ,सध्या सरासरी वयोमानही वाढले आहे .स्त्रियांमध्ये सरासरी वयोमान 60 ते 70 असून पुरुषांमध्ये सरासरी वयोमान 75 ते 80 वर्षे असे आहे. महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सर चे प्रमाण तसे कमी आहे. शहरी भागात ते एक लाखांपैकी 35 ते 40 असे आहे . तर ग्रामीण भागात ते कमी असून, प्रति लाख हे प्रमाण 20 पर्यंत आहे. उशिरा लग्न होणे ,उशिरा मूल होणे, स्तनपान करण्याचे प्रमाण कमी असणे, या सर्व गोष्टींमध्ये गोष्टींमुळे हार्मोनल चेंजेस होतात. जंक फूड, बैठे काम, स्थूलपणा आदि कारणेही आहेत. पुरुष वर्गात मुख कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक होत चालले आहे . तंबाखू गुटखा सेवनामुळे एक लाख पुरुषापैकी 30 जणांना या रोगाने ग्रासल्याचे दिसते. स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण मात्र आता कमी होत चालले आहे . मात्र स्त्री असो वा पुरुष, आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढते आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हे होते. या प्रकारचा कॅन्सर आसाम , नॉर्थ ईस्ट भागात अधिक आढळतो . उत्तर प्रदेश मध्य प्रदेश वगैरे भागातील लोकांना मुंबईला येणे खूप लांब पडते. त्यामुळेच टाटा रिसर्च सेंटरने भारतात वाराणसी ,पंजाब विशाखापट्टणम ,गुवाहाटी वगैरे ठिकाणी अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल्स उभी केली आहेत, असे डॉ. शर्मा म्हणाले.
कर्करोगग्रस्त असलेली लहान मुले व त्यांच्या पालकांना टाटा कॅन्सर हॉस्पिटल ने दिलासा दिला आहे अमेरिकेतील सेंट ज्यूडच्या धर्तीवर मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल ने लहान मुलांच्या कर्करोगावर संपूर्णपणे मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि तो अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. अशा कर्करोगग्रस्त लहान मुलांचे शिक्षण ,खाणे -पिणे, औषधोपचार वगैरे टाटा मध्ये संपूर्णपणे मोफत होते. त्यांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणीही ठेवण्यासाठी स्पेशल रूम्स तेथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एकूणच टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील वैद्यकीय सेवेला सामाजिक चेहरा देण्याचा हा प्रयत्न कल्पनेपेक्षाही यशस्वी झाला आहे ,असे डॉ. कैलास शर्मा यांनी सांगितले.