आताच्या डॉ स्वाती दगडे आणि पूर्वाश्रमीच्या
सातारा येथील
डॉ स्वाती रानभरे यांना
‘डॅाक्टर ‘या उपाधीची लहानपणापासूनच आवड होती. लहानपणापासून त्या वडीलांचे ,डॉ पांडुरंग रानभरे यांचे डाॅक्टरकीचे काम पहात होत्या . त्यांची रूग्णांबद्दल असलेली आपुलकी , कर्तव्य ,कष्ट बघत होत्या. त्याचबरोबर लोकांची त्यांच्यावर असणारी निष्ठा ,आदर, विश्वास (२-२ दिवस वडील भेटले नाही तर रूग्ण कुठेही जात नसत ) यामुळे त्यांना वडिलांचा अभिमान वाटत असे.त्यात वडिलांच्या इच्छेने भर घातली आणि त्याही डॉक्टर झाल्या.
अर्थात डॉक्टर स्वाती सहजासहजी डॉक्टर होऊ शकल्या नाहीत. कारण त्या अवघ्या दहा अकरा वर्षांच्या असताना वडिलांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या आई,इंदुमती रानभरे यांनी कुणाचीही मदत न घेता,पूर्वीचा नोकरीचा काहीही अनुभव गाठीशी नसताना, शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या.नोकरी करीत, घर सांभाळीत त्यांनी आपल्या चारही मुलींना उच्च विद्याविभूषित केले. स्वाती यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर होण्यास पूर्ण प्रोस्ताहन दिले आणि त्यामुळे त्या १९९० साली डॉक्टर होऊ शकल्या.

पुढे दोन वर्षांनी, १९९२ साली त्यांचा विवाह
डॉ कृष्णात दगडे यांच्याशी झाला.
शहरी जीवनाचे आकर्षण न ठेवता या दोघांनीही पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आळंदी जवळील चऱ्होली येथे आपापली प्रॅक्टिस सुरू केली. एकाच इमारतीत त्यांचा खाली दवाखाना आणि वर घर होते. त्यामुळे रात्री बेरात्री डाकट्-रऽऽऽ,
अहो बाई ऽऽऽऽ हे शब्द २४ तास त्यांच्या कानावर येत आणि त्याही होऽऽ हो आलेच करत… हातातलं काम सोडून रुग्ण तपासू लागत .
सुरुवातीला चऱ्होलीत, मुक्कामी डॅाक्टर त्या आणि त्यांचे पती असे दोघेच होते. त्यावेळी पिण्याचे पाणी त्यांना नदीवरून कोळी लोक १रू.हंडा अश्या दराने आणून देत . त्यांच्याकडे बोअर असल्यामुळे वापरायचे पाणी होते. बाकी लोकांना मात्र सर्वच पाणी नदीवरून आणावे लागे .
त्यावेळी चऱ्होली फारसे सुधारलेले नव्हते. ते छोटेसे खेडेगाव होते . त्या काळात लोकांना जाण्यायेण्यासाठी चालणे एवढाच पर्याय होता .पावसाळ्यात तर पायवाटाही गुढगाभर चिखल तुडवत पार कराव्या लागायच्या.
एखादा आजारी असेल, दवाखान्यात येऊ शकत नसेल तर डॅाक्टरांना देखिल कसरत करत रुग्णाचे घर गाठावे लागे. बाकीच्या गैरसोयीही होत्याच. पण तशाही परिस्थितीत हार न मानता हे दोघेही गावकऱ्यांच्या हाकेला सतत तत्पर असायचे आणि अजूनही आहेत.
एक अनुभव ,आठवण सांगताना डॉ स्वाती म्हणाल्या ,” त्यावेळी माझा मोठा मुलगा, अक्षय १-२ वर्षाचा असेल . माझा दवाखाना तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर निवास.त्याला सांभाळत ,मी रूग्ण (त्यावेळी जरा खूपच गर्दी असायची) व घरातील इतर जबाबदारी निभवत असे .एक दिवस त्याला झोपवून मी सततच्या हाकांमुळे , धावतच दवाखान्यात गेले .पहाते तो काय …रक्ताने डोके, चेहरा डबडबलेला, मोठमोठ्याने रडत असलेल्या एका लहान मुलीला घेऊन ५-६ लोक तिच्या रडण्याला , घाबरून ,भांबावून ,रडून ,आरडाओरडा करत गोंधळात भर घालत होते .मी प्रथम तिला तपासले. एकीकडे सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते .जखम साफ करून ,निर्जंतूक पट्टीचा दाब देऊन रक्तस्राव थांबेपर्यंत टाके घालण्याची तयारी केली. टाके घालायला सुरवात केली.२ टाके राहिले असतील अन् आमचे चिंरजीव जिन्यातून मला हुंकार देऊ लागले .मी एखादाच हुंकार नकळत दिला असेल नसेल तोच धाऽड धाऽड जिन्यावर आवाज ऐकू येऊ लागला.काही कळायच्या आत महाराजांची स्वारी ,१०-१२ पायऱ्या कोलांट्या खात, जिन्यावरून खाली गडगडत येत होती. मला काहीच सुचेना ,आईचे ह्रदय पिळवटून गेले,पण त्याला उचलून छातीशी कवटाळता येईना ,की त्याला कुठे लागले ?काय झाले ? हे ही बघता येईना. कारण समोर कर्तंव्य चालू होते.
एकसारखीच घटना ! मुलाच्याही डोक्यातून रक्त भळभळत होते . केवळ जखमेवर पट्टीचा दाब द्यायला सांगून मी माझ्या समोरचे कर्तव्य पूर्ण केले .तोपर्यंत मुलगा रडून रडून झोपी गेला होता .आजही , २५ वर्षांनंतर मुलाच्या कपाळावरच्या जखमेची खूण बघीतली की काळजात ,एक कळ उमटते.”
अशा १-२ नाही तर अनेक प्रसंगांची मालिकाच त्यांच्या आयुष्यात घडत राहिली.पण त्यांनी कधी हार मानली नाही. विशेषत: डॅाक्टरांवरील भॅड हल्ल्याच्या बातम्या वाचल्या की त्यांचे मन बेचैन होते .
त्यांच्यासारखे लाखो डॅाक्टर आपले कर्तंव्य चोख बजावत असताना, असे हल्ले होतात,यामुळे त्यांना फार वाईट वाटते.
डॅाक्टर आणि रुग्णांनी एकमेकांचा हात हातात धरून निरोगी ,आनंदी जीवनाचा पाया रचावा,
यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
जागोजागी आरोग्य जागृतीसाठी त्या व्याख्याने देतात,आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात.लेखनही करीत असतात.
डॉक्टर दगडे दाम्पत्याचा मोठा मुलगा अक्षय याने
अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम एस केले असून तिथे तो आपले करिअर घडवित आहे. तर धाकटा मुलगा ओंकार हा दातांचा डॉक्टर झाला आहे.
विविध माध्यमातून सतत लोकसेवा करणाऱ्या
डॅा.स्वाती दगडे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

लेखन: देवेंद्र भुजबळ
9869484800.