इचलकरंजी : ” येथील दत्ताजीराव कदम महाविद्यालयाने इचलकरंजीच्या जडणघडणीत शैक्षणिक सुविधा पुरविण्याबरोबरच सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यातून अनेक प्रथितयश लेखक, कवी, पत्रकार, संपादक, नाट्यकलावंत घडले आहेत. काॅलेजचे भित्तिपत्रिका, ‘विवेक’ वार्षिक, काव्यसंमेलन, सांस्कृतिक स्पर्धा, कार्यशाळा असे वाड्मयीन उपक्रम अभिरूची संपन्न असतात.” असे गौरवोद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस, सुप्रसिद्ध कवी- गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वाड्मय मंडळ उद्घाटन , विवेक वार्षिकाचे प्रकाशन आणि अद्यावत संकेतस्थळाचे उदघाटन या संयुक्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
संस्थाप्रार्थना, प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. “साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आमच्या वाड्मयीन उपक्रमांमधून घडणारे नवोदित साहित्यिक समाजपरिवर्तनात व विकासात रचनात्मक योगदान देतील.” असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे लेखन आणि शैक्षणिक वर्षातील कामकाजांचे संस्मरणीय छायाचित्रांसह अहवाल असलेल्या ‘विवेक’ वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या अद्ययावत संकेतस्थळाचेही अनावरण करण्यात आले. सदर उपक्रमात सुप्रसिद्ध कवी युवराज मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. अवंतिका खराडे, प्रियांका भाटले आणि प्रकाश डोंगरे यांच्या कवितांना रसिकांची दाद मिळाली. कविसंमेलनात प्रा. अंजली उबाळे यांनी कविता सादर केली. प्रमुख पाहुणे श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या गझला आणि श्री. युवराज मोहिते यांच्या मुक्तछंदातील विविध आशयाच्या कविता, चारोळ्या आणि उभयतांच्या मार्गदर्शनाने बहारदार बनलेला हा कार्यक्रम प्रा. नम्रता ताटे यांच्या आभार प्रदर्शनाने संपन्न झाला. समारंभास सकाळ सत्राचे प्रमुख डॉ. डी. सी. कांबळे आणि दुपारच्या सत्राचे प्रमुख प्रा. डी. ए. यादव यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘विवेक’च्या प्रमुख संपादक प्रा. डॉ. सौ. सुनिता वेल्हाळ यांनी केले, परिचय प्रा. संजय सुतार यांनी करुन दिला तर कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी केले.