राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांची भूमिका
लातूर : टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. तो दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या हस्तक्षेपाचा निषेध महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांनी केला आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी निर्णय नाही. मात्र ग्राहकांसाठी लगेच निर्णय घेणारे सरकार शेतकऱ्यांनाच अडचणीत आणण्याचे काम करीत आहे, असा आरोपही सोमवंशी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात टोमॅटोचे दर वाढल्याने केंद्र सरकार हस्तक्षेप करून दर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी अशीच विपरित परिस्थिती निर्माण होऊन टोमॅटोचे दर घसरले होते, त्यावेळी टोमॅटो बाजारात नेण्याएवढेही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा जागोजागी चिखल झाला होता. त्यावेळी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा वाटला नाही. परंतु, आता टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. मात्र, हा दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे, यांचा निषेध महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांनी केला.
सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने देशभरात हलकल्लोळ तयार झाला आहे. ज्यांना भावात टोमॅटो खाणे शक्य होत नाही, अशा ग्राहकांनी काही दिवस टोमॅटो नाही खाल्ले तरी कुठे बिघडणार आहे? असा सवाल करुन, टोमॅटोचे भाव वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी सरकार व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. भाव पडले तेव्हा सरकारने याच शेतकऱ्यांना मदतीचा कधी विचार केला नाही. त्यामुळे सध्या असलेल्या टोमॅटोच्या दरात काही कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध संतोष सोमवंशी यांनी पत्रकान्वये केला आहे.