26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*ज्योत्स्ना कासार : आधुनिक सरस्वती*

*ज्योत्स्ना कासार : आधुनिक सरस्वती*

नवदुर्गा

सर्व साधारण पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतातच. आणि त्यात काही वावगे ही नाही. पण केवळ आपल्या मुलांनाच नव्हे तर त्यांच्या बरोबर इतरही मुलांना खरेखुरे दर्जेदार,जीवनोपयोगी शिक्षण मिळण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करीत असलेल्या आधुनिक सरस्वती
ज्योत्स्ना कासार यांच्या योगदान आणि ज्ञानदानाचा पंधरा मुलांच्या शिकवणी वर्गापासून सुरू झालेला प्रवास आज स्वतःची गुरुवर्या शाळा सुरू करण्यापर्यंत झाला आहे. आणि तो पुढेही सुरू आहे.

सटाणा येथील ज्योत्स्ना माणिक कासार यांचा जन्म ७, फेब्रुवारी १९८६ रोजी झाला. आई सौ निर्मला व वडील श्री माणिक रंगनाथ कासार यांचा बांगडीचा व्यवसाय होता. अतिक्रमणात दुकान गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे मेडिकलचे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ती पूर्ण नाही करता आली.

ज्योत्स्नाताईंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सटाणा येथे झाले. बारामती येथे मावशीच्या घरी राहून शारदाबाई पवार महिला कॉलेज मधून त्या बीएससी झाल्या. शिकत असतानाच त्या नोकरी देखील शोधत होत्या. डेटा बेस कंपनी मायक्रो बायोलॉजि मध्ये रिसर्च करत होत्या. छोटी मोठी कामे देखील करत. मावशी सौ मालती जयकुमार वजरीणकर यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.मावशी व काकांनी आई वडिलांची माया लावली.
ज्योत्स्नाताईंचे भाऊ गणेश व प्रसाद यांचेही बहुमूल्य सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला गती मिळाली. डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यांनी इव्हॉल्वस कंपनीत सात ते आठ महिने काम केले.

पुढे पुण्यात मॉडर्न कॉलेज मधून त्यांनी मायक्रोबायोलॉजीत एमएससी केले. त्यावेळी ज्योत्स्नाताईंचे मामा केदारजी कासार व मामी सौ कांचनताई कासार यांनी देखील खूप सहकार्य केले. बिकट परिस्थितीत सर्वांची साथ असल्याने त्यांचा जीवन प्रवास काहीसा सुखकर होऊ शकला. त्यांचा खूप मोठा आधार मिळाला असे त्या आवर्जून सांगतात.

ज्योत्स्नाताईंचा विवाह
डहाणू येथील
श्री भूषण सुभाष मावळे यांच्याशी
११,जून २००९ रोजी झाला. भूषणजीं दहा वर्षाचे असतानाच त्यांचे
आईवडील वारले.पुढे काका श्री दत्तात्रय मावळे व काकी या दोघांनी भूषणजींच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि सर्वांना चांगले शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले. काकांनी वडिलांची जबादारी पार पाडली.त्यामुळे काकांचे ते आजन्म ऋण मानतात. पुढे काका गेल्यावर त्यांचे चुलत भाऊ श्री मिलिंद व हरिष मावळे यांनी देखील वेळीवेळी मदत केली.

भूषणजींनी देखील खूप कष्टाने, जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. २००५ साली बॅचलर ऑफ
इंजिनिअरिंग पूर्ण केले. तसेच ११ वर्षे नोकरी देखील केली. त्यांनी सिम्बॉयसिस मधून बिजनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. नोकरी दरम्यान त्यांना काही काळ परदेशातही जावे लागले.

लग्नानंतर खऱ्या अर्थाने ज्योत्स्नाताईंचे जीवन बदलले. तो त्यांच्या आयुष्यातील सुंदर टर्निंग पॉईन्ट ठरला. सासरी त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वतंत्र मिळाले. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. न्याय मिळाला. काही वर्षे सासरी डहाणू येथे त्या राहिल्या.

प्रचंड आत्मविश्वास व काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. सर्व बचतीचे पैसे,दाग दागिने मोडून पुणे जवळ चिखली येथे स्वतःचे घर घेतले. मुलगा लहान असल्याने सासूबाईंची खूप मदत होत असे. त्या देखील आधुनिक विचारांच्या असल्याने सुनेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे त्यांना मनापासून वाटत असे.

ज्योत्स्नाताईंनी सासूबाई व पतीच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे स्वतःचे शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १५ विद्यार्थी होते. बाहेर देखील एका क्लास वर त्या शिकवायला जात. सासूबाईंचा खूप मोठा आधार होता .त्यामुळे त्या घराबाहेर नोकरी करू शकल्या.

ज्योत्स्नाताई जेथे राहत होत्या ,त्यावेळी आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. मुलगा लहान असल्याने जवळच एक फ्लॅट भाड्याने घेण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी क्लासेस सुरू केले. पण सोसायटीच्या लोकांनी विरोध केल्यामुळे २०१३ साली कमर्शियल बेसिस वर जागा भाड्याने घेऊन पुन्हा नव्याने प्रसन्ना कोचिंग क्लास सुरू केले. हार न मानता, येईल त्या परिस्थितीचा त्यांनी धीराने सामना केला. त्यावेळी क्लासचे वीस हजार रुपये भाडे होते. त्यामुळे खूप मेहनत करावी लागली. सकाळी ६.०० ते १०.०० व दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत न दमता, न थकता मुलांना शिकवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे चालू ठेवले. मुलांची प्रगती पाहून पालकांचा विश्वास बसत गेला.

जेव्हा ज्योत्स्नाताईंना स्वतःच्या मुलाला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा त्यांना असे वाटले की मुलाला दुसऱ्यांच्या शाळेत पाठवण्याऐवजी स्वतःच शाळा सुरू करावी. ही कल्पना त्यांना सुचली त्यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या, त्या म्हणजे स्वतःच्या मुलावर वैयक्तिक लक्ष देणे व इतर मुलांनाही शिकविणे शक्य झाले. त्यांनी संस्कृती प्रिप्रायमरी स्कूल चालू करण्याचा निर्णय घेतला. त्या आधी मोंटेसरीचा कोर्से देखील पूर्ण केला.

स्वतः अभ्यासक्रम ठरवून स्वतःचे पुस्तक तयार केले. पहिल्या दिवशी केवळ एकच ऍडमिशन झाली. मात्र हताश न होता पुढील पंधरा दिवसात २२ व पुढे ३० मुलांनी प्रवेश घेतला. शिकवण्याची आधुनिक पध्दत व मुलांची प्रगती पाहून पालक अतिशय समाधानी होत.

पालकांच्या आग्रहामुळे पुढे प्रायमरी शाळा सुरू केली. कुटुंबाची पूर्ण साथ होती. वेदिक गणित, अब्याकस ,सुंदर हस्ताक्षर हे देखील शाळेत घेण्यास सुरू केले. मुलांचा सर्वांगीण विकास होत होता.

स्वतः वेळोवेळी नवीन गोष्टी आत्मसात करून जोडीला शिक्षकांना घेऊन त्यांना देखील शिकवले.माहिती दिली.मार्गदर्शन केले. पालकांना नेहमी आधी त्यांच्या मुलांमधील चांगल्या गोष्टी सांगून मग त्यांच्यातील कमतरता सांगावी व ती कशी दूर करता येईल त्यावर फोकस करून त्यांची प्रगती कशी साधता येईल अशा आवश्यक गोष्टी करीत त्या पालकांना धीर देत.

२०१७ साली दुसऱ्या मुलाच्या नावाने ज्ञानी एज्युकेशन म्हणून स्वतःच्या शालेय पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. शाळा व क्लास अशी दुहेरी कसरत ज्योत्स्नाताई अगदी हिंमतीने सांभाळत होत्या . त्यांचा भाऊ व बहीण देखील मदत करत होते. तरीही मनुष्यबळ कमी पडत होते .वाढता व्याप, पालकांचा प्रचंड प्रतिसाद,पत्नीची धावपळ पाहून पती भूषणजींनी देखील स्वतःची चांगली नोकरी सोडून पत्नीच्या व्यवसायात पूर्ण वेळ देण्याचा धाडसी निर्णय घेतला.

स्वतःची संस्था सुरू केली.जिथे मॉन्टीसेरी कोर्स शिकवण्याचे ट्रेनिंग घेतले तिथेच पहिल्या वेळी जवळजवळ ५५ ते ६० शिक्षकांना ट्रेण्ड करण्यात आले.

पतीचे पूर्ण सहकार्य त्यांनी वाघोली येथे भाड्याच्या जागेत संस्कृती प्री स्कूल सुरू केली. त्यातील मराठी व इंग्रजी स्वरचित कविता त्यांच्याच होत्या हे त्यांच्या शाळेचे वैशिष्ट्य होते. मुलं नेहमीच शाळेत येण्यासाठी उत्सुक असायची असे पालक आवर्जून सांगतात.

पुढे अब्याकसने मुंबई, भोसरी व भांडुप येथे
फ्रांच्यायजी दिली. स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग देखील त्या देत होत्या.
इयत्या पहिली ते बारावीचे शिकवणी वर्ग देखील चालू होते. एकूण २५० मुलं ज्ञान घेत होती. उत्तम मार्गदर्शन, उत्तम शैक्षणिक दर्जा व उत्तम सराव हे त्यांच्या क्लासचे वैशिष्टय आहे.

दिवसेंदिवस एकेक पाऊल पुढे टाकत ९ मार्च २०१९ रोजी स्वतःची संस्कृती प्रायमरी शाळा सुरू केली. येथेच न थांबता त्या दरवर्षी एकेक वर्ग वाढवत गेल्या. त्यामुळे गुरुवर्य अकॅडमी स्कूल चिखली, पुणे ही आज पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
गुरू जसे शिष्य घडवतात तसेच ही शाळा मुलांना घडवण्याचे काम करत आहे.मुलं ही देशाची खरी संपत्ती असते असे विचार करून मुलांचे भविष्य उज्वल करण्याचे काम येथे सुरू आहे.

ज्योत्स्नाताईनी
स्वतः बी.एड.पूर्ण केले. तसेच सीइटी दिली. प्रतिसाद उत्तम मिळत होता. आज शाळेत ४० स्टाफ मेंबर आहेत तर ५०० मुलांनी प्रवेश घेतला आहे. रोज जणू एक नवा संकल्प रोज एक नवीन आव्हान हे दोघेही अतिशय सुंदर रित्या पेलत आहेत. आपली जबाबदारी चोख निभावत आहे ही खरच कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे.

या शाळेत जिमन्यास्टिक, स्केटिंग, कराटे, फुटबॉल असे विविध खेळ आहेत. त्याचबरोबर फोनिक्स व आपले सण, समारंभ,वार्षिक स्नेहसंमेलने उत्साहात संपन्न होत असतात. परंपरेला आधुनिकतेची जोड असल्याने सर्व मुलं, पालक व शिक्षक खुश आहेत. आनंदी व उत्साही वातावरण असल्याने मुलांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.

असे सर्व सुरळीत चालू असताना अचानक कोरोनाची महामारी सुरू झाली. ज्योत्स्नाताई यांची प्रचंड सकारात्मक विचारसरणी व त्यांच्या हिंमतीला मानाचा मुजरा केला पाहिजे. अशा बिकट परिस्थितीत न घाबरता, हार न मानता शाळेची जागा जी भाडेतत्त्वावर घेतली होती ती सोडून काही गाळे भाड्याने घेऊन त्याचे रूपांतर शाळेत करून ऑनलाईन शिक्षण सुरू केले. आर्थिक गणित बसवणे त्यावेळी खूप कठीण होते. हार मानेल त्या ज्योत्स्ना ताई कुठल्या ?
हे खूप मोठे आव्हान होते. खूप मोठी कसरत होती, मुलांसाठी व शिक्षकांसाठी देखील. अविरत शिक्षण देण्याचे काम सुरू होते. प्रथम शिक्षकांना देखील ऑनलाईनचे ट्रेनिंग दिले. मार्गदर्शन केले. हे सर्व नवीन होते. पण म्हणतात ना बदल अटळ असतो ! जसा काळ तशी वेळ व त्यानुसार स्वतः मध्ये बदल करून जो पुढे जातो तोच जिंकतो.

अशाही परिस्थितीत मुलांनी घरी बसून कराटे, व्यायाम, योगा, लहान लहान खेळ देखील घेतले. कंटाळलेली मुलं घरात बसून खुश होती. प्रसन्न होती. म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांचा सर्वांगीण विकास होऊन भविष्यासाठी त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हे दाम्पत्य करत होते.कोरोनाच्या काळात हे काम अतिशय जिकरीचे होते. मात्र प्रचंड चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अशक्य ही शक्य करण्याचे काम ते दोघेही करत होते. जेव्हा सगळे जग थांबले होते तेव्हा हे दोघे व त्यांची टीम मात्र पळत होती व दुपटीने कष्ट घेत होती .

ऑनलाइन पद्धतीने फोनिक्स व स्पोकन इंग्लिश क्लासेस देखील सुरू होते. हा खूप मोठा संघर्षमय काळ होता. मात्र न घाबरता, न डगमगता काम सुरू होते.

श्री भूषणजी व ज्योत्स्ना ताई यांनी शाळेत सतत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिला. त्यामुळेच इतर शाळांहून त्यांची शाळा वेगळी आहे. येथे शिक्षणाचा बाजार नसून मुलांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीकोणातून त्यांची तयारी करून घेतली जाते. त्यांच्यातील कला जोपासली जाते . ज्ञानार्जन ही होत असते. स्वतःची शाळा सर्वात बेस्ट असावी असे त्यांना मनापासून वाटते.

शाळा हे मुलांचे दुसरे घर आहे असे मुलांना वाटले पाहिजे . तसाच प्रेमळ धाक व मार्गदर्शन त्यांना शाळेतून मिळाले पाहिजे जेणेकरून मुलांनी हसत शाळेत प्रवेश केला पाहिजे व शिक्षणाचे ओझे न वाटता त्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि हीच आगळी वेगळी गोष्ट या शाळेत पहायला मिळते असे पालक आवर्जून सांगतात. हिच त्यांच्या यशाची चोख पावती आहे असे या दांपत्याला वाटते.

मनुष्यातील चांगुलपणा नेहमीच त्याला यश देत राहतो कारण त्यात आशीर्वाद व सर्वांची साथ असते. या दांपत्याने गेली अनेक वर्षांपासून पाहिलेलं हे स्वप्न नुकतच साकार झाले व गुरुवर्या अकॅडमी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ ज्योत्स्नाताई या मुख्याध्यापक असून भूषणजी हे शाळेचे संचालक आहेत. दोघेही ही जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत आहेत.

शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केल्याबद्दल
ज्योत्स्नाताई यांचा २०१९ मध्ये तत्कालीन महिला व बालविकास मंत्री
माननीय पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .तसेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देखील त्यांना पुरस्कृत करण्यात आले.अशा अनेक पुरस्काराच्या त्या मानकरी आहे.

भूषणजी, पत्नीविषयी
अभिमानाने सांगतात की ,ती खूप मेहनती व प्रेमळ आहे. हे यश तिने स्वतःच्या हिंमतीने मिळवले आहे. ‘नाही ‘ हा शब्द तिच्या शब्दकोशात नाही. प्रचंड इच्छाशक्ती, प्रयत्नशील, आशावादी व जिद्दी असल्याने तिने हे शक्य करून दाखवले आहे. मी फक्त तिला सोबत केली. पण याचे सर्व श्रेय तिचेच आहे. ती नेहमी म्हणते की कधीही नव्याने सुरवात करता येते व अपयश हीच तर यशाची गुरुकिल्ली आहे अशा ठाम मताची माझी पत्नी असल्याने तिचा मला अभिमान वाटतो व
तिच्या विषयी मला आदर वाटतो.

हे विश्व जरी आम्ही दोघांनी मिळून उभे केले असले तरी त्याचा फार मोठा वाटा हा पत्नीचा आहे असे ते प्रांजलपणे म्हणतात.

या शाळेत मुलांना हसत खेळत शिक्षण
देण्यात येत असून शिक्षणाची आवड निर्माण करणे हाच आमचा प्रमुख हेतू आहे. भूषणजी म्हणतात I can lead and she can conduct. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून पुढे जायला पाहिजे या आपल्या पत्नीच्या विचारांशी ते सहमत आहे.

ज्योत्स्ना ताई सध्या एम एड.आणि मानसशास्त्रात एम ए करत आहेत. माणसाने सतत शिकले पाहिले असे त्या म्हणतात. मिळालेला अमूल्य वेळ त्या रटाळ मालिका पहात न घालवता आपल्या कुटुंबासाठी व सतत काही तरी नवीन शिकण्यात घालवतात. मोबाईलवर देखील उत्तम वक्त्यांची भाषणें ऐकतात. माणसाने सतत नवीन गोष्टी व तंत्रज्ञान शिकले पाहिजे असे त्यांना वाटते.

आता वेलनेस गुरू म्हणून एक ऑनलाईन प्रशिक्षण घेतले जाणार आहे . त्याचे काम ही सुरू आहे. हा २१ दिवसाचा कोर्स असून मुलांचे शारिरीक व मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे व त्यांचा विकास कसा साधता येईल ? त्याच बरोबर मुलं व आई वडिलांचे संबंध कसे पाहिजे ? अशा नाजूक परंतु अतिशय महत्वपूर्ण गोष्टी, ब्राह्म मुहूर्तावर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व त्यांचे फायदे अशा सर्व वेगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे . पुढे वयात येणारी मुलं, त्यांच्या समस्या व त्यावरील तोडगे याचे देखील तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन देण्याचा त्यांना मानस आहे.

ज्योत्स्नाताई सांगतात की, पतीची व कुटुंबाची साथ असल्यानेच त्यांनी उंच भरारी घेतली आहे. पतीचे विचार अतिशय आधुनिक असल्याने हे यशाचे शिखर मी गाठू शकले.

पैसे कमावणे हाच आमचा दोघांचा हेतू नसून पालकांचे समाधान व मुलांची प्रगती हाच प्रमुख उद्देश ठेवून ही शाळा सुरू केली आहे. दुसऱ्याला चांगले दिले की आपले ही चांगले होते हा निसर्गनियम असून त्यावर दोघांचा विश्वास आहे .

पतीपत्नीने एकमेकांना त्यांच्या करिअर मध्ये साथ दिली पाहिजे.जे काही कराल ते उत्तम व उत्कृष्ट केले पाहिजे. आपण जगाला फसवू शकतो मात्र स्वतःला नाही. त्यामुळे प्रामाणिक काम हेच तुमचे यश व हीच खरी ताकद असे दोघांचे मत आहे.

ज्योत्स्नाताईंचा मोठा मुलगा प्रसन्ना हा सहावीत तर लहान मुलगा ज्ञानेश हा छोट्या गटात शिकत आहे.
ज्योत्स्नाताईंची
व भूषणजींची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे. पती पत्नीने एकमेकांना साथ दिली तर असे चमत्कार घडू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

ज्योत्स्नाताईंची जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द,आत्मविश्वास , त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्भीड निर्णय व पती तसेच सासूबाईंची मिळालेली अमूल्य साथ त्यामुळे आज त्या खूप पुढे जाऊ शकल्या.

लग्नाआधी जशी आई वडिलांची अथवा भावांची साथ मिळते तशी लग्नानंतर जर स्त्रीला पतीची व सासरच्या मंडळींची साथ मिळाली तर नक्कीच ती स्वताची ओळख निर्माण करू शकते, जी आजच्या काळाची नितांत गरज आहे.

असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. मात्र असे दुर्मिळ उदाहरण देखील पहायला मिळते की एका यशस्वी स्त्री मागे तिच्या पतीचा हात आहे ही अतिशय अभिमानास्पद व कौतुकास्पद गोष्ट आहे. आज खऱ्या अर्थाने समाज बदलत चाललेला आहे जेथे स्त्रीला निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे.

ज्या घरात, समाजात स्त्रीचा आदर व सन्मान होतो तेथे सरस्वती व लक्ष्मीचा वास असतो व समाजाची प्रगती साधली जाते.

अशा या दाम्पत्याला त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.


लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.
9869484800.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]