ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल वापरताना दक्षता घ्यावी
विजयकुमार पन्हाळे
मुंबई ( वृत्तसेवा ) मोबाईलवर आजकाल आकर्षक स्वरूपात वेगवेगळ्या जाहिराती,लिंक्स येत असतात.कळत नकळत आपण या लिंक्सच्या आहारी जातो आणि आपली बँक खाते,अन्य गोपनीय माहिती सायबर चोरांना देऊन अडचणीत येतो.म्हणून आपली फसवणूक टाळण्यासाठी माहितीत नसलेले फोन न घेणे,ओळखीच्या नसलेल्या व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे,कुठल्याही लिंकवर क्लिक न करणे अशा प्रकारची दक्षता जेष्ठ नागरिकांनी घेणे फार गरजेचे आहे अन्यथा आयुष्यात कधीही न भरून येणारे नुकसान होऊ शकते,असा इशारा नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार पन्हाळे यांनी दिला.ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या सामूहिक वाढदिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी बोलताना श्री पन्हाळे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की,सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे यासाठी जनजागरण अभियान हाती घेण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक जेष्ठ नागरिक संघाच्या ५ प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येईल. पुढे हे प्रशिक्षण त्यांनी आपापल्या संघाच्या इतर सदस्यांना देणे अभिप्रेत आहे,जेणे करून सायबर सुरक्षा तळागाळापर्यंत झिरपत जाऊन खबरदरीचे वातावरण निर्माण होऊन सायबर चोऱ्याना आळा बसेल.
यावेळी निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या ,संघाला भेट दिलेल्या “आम्ही अधिकारी झालो” आणि “करिअरच्या नव्या दिशा ” या पुस्तकांचा गौरवपूर्ण उल्लेख करून दोन्ही पुस्तके आजच्या तरुणांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरणारी असल्याचे मत व्यक्त करून आपल्या वेळी अशी पुस्तके नसल्याने स्वतः च चाचपडत करिअर घडविण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला, याची साद्यंत माहिती दिली.
यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या संघाच्या ८७ सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यात ६० पासून ते ८९ वय असलेल्या संघाच्या सदस्यांचा समावेश होता.हा कार्यक्रम अतिशय सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आला .
प्रारंभी संघाचे सचिव श्री राजाराम खैरनार यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. तर अध्यक्ष श्री मारुती कदम यांनी संघाची वाटचाल विशद करून विविध उपक्रमांची माहिती दिली.
सदस्यांच्या सत्काराचे नियोजन उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे यांनी केले. सर्व कार्यक्रमाचेसूत्रसंचालन श्री बलवंत पाटील यांनी तर मनोरंजन पर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरिश्चंद्र शिंदे यांनी केले. देणगीदार आणि त्यांनी दिलेल्या देणग्या याचे वाचन श्री सुभाष बारवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ विजया गोसावी यांनी केले . वाढदिवसाच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे जवळपास १२०० सदस्य असून या संघात नियमितपणे विविध उपक्रम होत असतात.त्यातील महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या महिन्यात
ज्या सदस्यांचे वाढदिवस असतात,त्यांचे वाढदिवस सामूहिकरित्या साजरे करण्याचा हा एक लोकप्रिय उपक्रम आहे.