पुणे, दि. २१ जुलैः(प्रतिनिधी )-— ज्येष्ठ कवयित्री, लेखक आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या पत्नी उर्मिला कराड गुरूवारी पंचतत्वात विलीन झाल्या. वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण वैदिक विधींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राहुल विश्वनाथ कराड यांनी मुखाग्नी दिला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लोकांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.
येथे प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या परिवारातील सर्व सदस्यांसह शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूड येथील एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहाच्या समोरील प्रांगणात ठेवण्यात आले होते.
यावेळी आमदार रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, ह.भ. प. तुळशीराम दा. कराड, काशीराम दा, कराड, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, आबा बागुल, डॉ. संजय चोरडिया, डॉ सुधाकरराव जाधवर, उल्हास पवार, डॉ. विजय भटकर, पं. वसंतराव गाडगीळ, पत्रकार मधुकर भावे, पत्रकार अरूण खोरे, आदिनाथ मंगेशकर, अभय छाजेड, संदीप खर्डेकर, नीलेश निकम, माधुरी सहस्त्रबुद्धे, लातूर भाजपाचे शहराध्यक्ष, नगरसेवक राहुल कलाटे, विजय कोलते, मिलिंद जोशी, हभप हांडे महाराज, गोदावरी ताई मुंडे, विष्णू महाराज केंद्रे, पी.बी. जोशी, दत्तात्रय बडवे, बाळासाहेब काळोखे, पांडुरंग महाराज तुपे, मिनाक्षी नवले, सुदाम महाराज पानेगावकर यांच्या सहित एमआयटी संस्थेतील सर्व कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला.
विशेष म्हणजे ७९ वर्षीय उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी निधन झाले. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखक म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लहानपणापासून त्यांना काव्य लेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान असून त्या त्यांच्या मानसकन्या होत्या. त्यांच्या विपूल लेखनाबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले होते.