वास्तुविशारद लोधी यांची उपस्थिती.
लातूर:17-06-2022देशातील सर्वोच्च समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत लातुर जिल्ह्यातील किल्लारी येथील शुभम भोसले यांनी १४९वा रँक मिळवला. शुभम भोसले हे नरहरे क्लासेस चे माजी विद्यार्थी असुन
त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प संचलित नरहरे लर्निंग होम या नवीन वास्तू मध्ये गुरूवारी दि.१६ जुन रोजी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी नरहरे लर्निंग होम या वास्तुचे रचनाकार प्रसिद्ध वास्तुविशारद सज्जाद लोधी यांचादेखील सत्कार करण्यात आला. या वेळी दोन्ही मान्यवरांसोबत येथील शिक्षक व विद्यार्थी यांनी मनमोकळा संवाद साधला.
आपल्या भाषणात शुभम भोसले यांनी नरहरे क्लासेस मधील जुन्या आठवणींना उजाळा देत किल्लारी च्या जिल्हा परिषद शाळेपासून ते दिल्लीच्या मुलाखती पर्यंतचा प्रवास त्यात आलेले चांगले वाईट अनुभव, सुरवातीला आलेले अपयश आणि त्यावर मात करून मिळवले यश या बाबतचे आपले अनुभव मुलांसमोर मांडले. तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना नकारात्मकता कशी दुर करता येईल ? , मुलाखती ची तयारी कोणत्या स्वरूपाची असावी व अभ्यासाचे नियोजन कसे असावे यावर मुलांना मार्गदर्शन करत भविष्यात अशा परिक्षेत मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुलांनी देखील या संवादात उत्साहात सहभागी होऊन शुभम भोसले व सज्जाद लोधी यांना अनेक प्रश्न विचारले, मुलांच्या सर्व प्रश्नांना दोन्ही मान्यवरांनी सविस्तर उत्तरे देत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतिश नरहरे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका नरहरे मॅडम यांनी मानले. यावेळी सुमेध नरहरे, प्रशांत शिंदे, वसंत पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले