लेखमाला -भाग :२
लेखमाला
भेटी लागे जीवा
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील सुपुत्र व सध्या माहिती संचालक गणेश रामदासीयांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन शेअर केलेल्या मागील तीन वारींमधील अनुभवावर आधारित लेखमाला ‘माध्यम ‘ समूहाच्या
वाचकासाठी प्रसिद्ध करीत आहोत ( या सारख्या या आधीच्या विविधांगी लेखांचा आस्वाद घेण्यासाठी लेखकाचे ‘राग दरबारी’फेसबुक पेज https://www.facebook.com/ramdasiganesh/ या लिंकचा उपयोग करावा तसेच त्यांनी घेतलेल्या दिल्लीतील विविध विषयांवरील मुलाखतींचा आस्वाद घेण्यासाठी त्यांचे युट्यूब चॅनल ‘ दिल्ली निवासी गणेश रामदासी’ याच्या https://youtube.com/channel/UCzXEBaxXKN-05jO-5TaWQOA या लिंकचा उपयोग करावा) -संपादक

काल देहूतून संत तुकारामांची पालखी पंढरपूरास निघाली आणि आज आळंदीमधून ज्ञानोबा माऊलींची! आम्ही काही दिल्लीनिवासी पुण्यातील आमचे कुटुंबस्नेही श्री. आशीम पाटील आणि सौ.अवंतिका वहिनींच्या नियोजनातील वारीत गेली चार-पाच वर्षे सहभागी होत असतो.कोरोना काळातील दोन वर्षांचा गॅप पडल्याने यावेळेसचा सर्वांचाच उत्साह अगदी टिपेला पोहोचलेला असताना नुकताच आजारातून उठलेला ‘मी’ या वारीत सहभागी व्हायचे की नाही याबाबत द्विधा मनःस्थितीत होतो. घर-नातेवाईक-मित्रपरिवार अगदी प्रत्येकजण माझी आजारावेळेसची स्थिती आठवून मला रोखत होती.मात्र एकदा का यावर्षीचे नियोजन ‘पंढरीची वारी २०२२’ व्हाटस्अप ग्रुपवर दिसू लागले की आपोआपच माऊली दर्शनाची आणि विठुरायाच्या चरणांवर माथा ठेवण्याची ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती.त्यामुळे ठरल्याप्रमाणे काल पुणे गाठले आणि आज भल्या पहाटे आळंदी.

दोन वर्षांच्या नंतर भक्तांना माऊलींचे दर्शन घडत असल्याने इंद्रायणीच्या पाण्यापेक्षाही भक्तीचा महापूर आळंदीत लोटलेला पाहून वरुणराजही आनंदले.पावसाने ओढ दिलेली असतानाही माऊली मंदिराच्या महाद्वारासमोर येईपर्यंत त्याने खुशी-खुशीने आम्हाला स्नान घातले.यावर्षीच्या वारीत एकूण 22 जण 'वारकरी' आणि 8 जण वाहनचालक पण प्रत्यक्षात 'सेवेकरी' सहभागी झालेत.वारी चालण्याचा आनंद थोडा तरी घ्यावा या उद्देशाने आणखी 20-25 जण आळंदी-पुणे(भैरोबा ओढा) या आजच्या नियोजित पदयात्रेत सहभागी झालेत.
आता उद्या भैरोबा ओढा-फुरसुंगी- दिवेघाट-सासवड असा प्रवास आहे.आज पहाटे गर्दीमुळे गाडी दूर सोडून माऊली दर्शनास चालतच जावे लागले होते.त्यामुळे आजचा पल्ला जाता-येता तसा मला भारीच पडला परंतू सोबत्यांचा उत्साह,टाळ-मृदंगाची साथ,अभंगांचे सूर,नामस्मरणाचा प्रभाव आणि पंढरी गाठण्याची ओढ याने पावले पुढे पुढे पडतच गेली.मागील दोन वारीच्या नंतर पालखी मार्गात केलेल्या सुधारणा, स्वच्छता,स्वागत मंच,बाजारतील लगबग नजरेने टिपत कधी पुणे गाठले ते समजलेच नाही.
आम्ही करीत असलेली ही वारी हा खरा तर स्विकारलेला मध्यम मार्ग आहे.माऊलींची पालखी वाटेत विसावास्थळी थांबत थांबत मजल दरमजल करीत पंढरपूरास जाते व परतते.आम्ही पहिल्या दिवशी पुण्यापर्यंतचा पहिला व वाटेत दिवे घाट लागत असल्याने सासवड पर्यंतचा दुसरा दिवस केवळ दररोज २५ किमीच्या आत संपवतो.त्यापुढे मात्र सरावलेल्या पायांना गती देत रोजच्या ३०-३५ किमीचा पल्ला पार करून एकूण ८ दिवसात पंढरपूरात चंद्रभागा व नामदेव पायरी पर्यंत पोहोचणे व नववे दिवशी पहाटे पांडुरंग-रूक्मिणीचे दर्शन घेऊन परतीचे वाहन पकडणे असा प्रयत्न असतो.कधी-मधी ऊन-पाऊसमा-याने वेग मंदावला,कोणी सोबती आजारी पडला तर म्हणून एक दिवस अधिकचा राखीव ठेवला जातो.
वाटेत राहण्या-खाण्याची योजना काळजीपूर्वक केलेली असते.पायात उर्जा रहावी व डिहायड्रेशन होऊ नये यासाठी ओआरएस, लिंबुपाणी,ताक,पाणी घेऊन संजय डिकेच्या नेतृत्वाखालील गरूड आर्मी (वाहनचालक) जागोजागी सज्ज असते तर दुपारी व संध्याकाळी पायाच्या नसांना मोकळे करण्यासाठी बकेटात खडेमीठ घालून गरमपाणी मिळण्याची व्यवस्था केली जाते.वाटेत जवळपास सर्वत्रच चहा/नाश्ता/जेवणांसाठी आमचे यजमानत्व स्वतः होऊन स्विकारलेली ठरलेली घरे आम्ही पोहोचण्याची वाटच पाहत असतात.
वाटेत लागणा-या निरनिराळ्या मंदिरांसह जेजुरी दर्शन,फलटणचे राममंदिर, वेळापूरचे मंदिरांचे दर्शनही अतिरिक्त चालून घडतातच घडतात.शेवटच्या दिवशी वाखरी आले की मात्र विठ्ठल मंदिराच्या कळसाच्या दर्शनाची ओढ लागून राहते.वारी चालू शकल्या नाहीत तरी आम्हा सर्वांच्या रूक्मिणी अखेरच्या दिवशी वाखरी ते पंढरपूर वारी चालायला तर येतातच पण त्यांनाही खरी ओढ विठूराया-रूक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर समोरच्या मंडपात फुगडी घालून फेर धरण्याचीच असते.आम्ही सर्व वारकरी माऊली फुगडीचा फेर धरत जवळपास २५० किलोमीटर चालण्याने आलेला शीण क्षणात घालवतो आणि आपापल्या गावी प्रस्थान करतो.
भेटू आता थेट विठू माऊलीच्या दर्शनलाभाच्या वर्णनानिमित्ताने.


लेखन : गणेश रामदासी
माहिती संचालक