मुंबई ; दि.१ -जेष्ठ नागरिक संघ,आपापल्या सदस्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करीत असतात आणि ते आवश्यकही आहेच.पण
जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी आपल्या अनुभवाचा,ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी अशा ज्येष्ठ नागरिक संघात मार्गदर्शन व मदत केंद्रे सुरू करावीत,अशी अपेक्षा माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली.ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते.
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री भुजबळ यांनी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याच्या कामी या संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

या संघात काल, ३१ जुलै रोजी सर्वात मोठया कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी मंडळाने केले होते .या आनंद मेळाव्यास एकूण ३१० सभासद उपस्थित होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेवक श्री सोमनाथ वासकर उपस्थित होते.
त्यांनी ही यथोचित मार्गदर्शन करून सर्व जेष्ठाना छत्री वाटप केले. तसेच संघास आर्थिक सहकार्य करून जेष्ठाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमात वयाची ६० ते ८४ वर्षे पूर्ण झालेल्या ७४ सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे कार्यकारी अध्यक्ष
श्री विठ्ठल गव्हाणे यांनी केले.सचिव श्री राजाराम खैरणार, खजिनदार श्री विष्णुदास मुखेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.