ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या समस्या
आज दि. १ ऑक्टोबर – जेष्ठ नागरीक दिवस! संपूर्ण जगामध्ये हा दिवस समाजातील जेष्ठांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जातो. आपल्या भारत देशाची गणना सध्या तरुणांचा देश म्हणून करण्यात येते. जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारताचे सरासरी वय हे २५ ते ४५ म्हणजेच तरुण या सदरात मोडणारे आहे. पण त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त जेष्ठ नागरीक हे भारतातच आहेत असेही सांगण्यात येते. सरासरी ६० वर्षे वयावरील व्यक्तींना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जेष्ठ समजण्यात येते. या वयानंतरच्या आयुष्यात साधारणतः जीवनातील संघर्षाचा काळ संपलेला असतो. मुलामुलींचे शिक्षण, विवाह संपन्न होवून एखाददुसरं नातवंडही कुटुंबात आलेलं असतं. जवळपास सर्व विवंचना संपुष्टात आलेल्या असतात. आर्थिक विवंचना तर जवळपास संपलेल्याच असतात. शासकीय सेवेत असाल तर सेवानिवृत्त झालेले असता व सर्व आर्थिक येणी मिळालेली असतात. खाजगी व्यवसाय असेल तर मुले / मुली त्यामध्ये लक्ष घालत असल्यामुळे त्यातूनही थोडा निवांतपणा मिळालेला असतो. मुलेही हिरीरीने व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नरत असतात व आवश्यकतेनुसार आपले मार्गदर्शन मागत असतात. प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जावून काम करण्याची आवश्यकता उरलेली नसते.
“सांगेन युक्तीच्या गोष्टी चार” या अवस्थेमध्ये व्यवसायामधील जेष्ठांचा सहभाग असतो. असे जे सर्व जेष्ठ असतात त्यांचा समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असतो. तरुणांच्या व बालांच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी व सुखी जीवनासाठी जे पायाभूत काम केलेले असते ते अलौकिकच असते. त्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण तारुण्य खर्ची घातलेलं असतं. अर्थात हे खर्ची घालण्यामध्ये जेष्ठांचाही स्वार्थ असतोच. हे खर्ची घालणं हे जेष्ठांकडून सहजी झालेलं नसतं. त्या कष्टांमुळे त्यांनाही त्यांच्या तारुण्यामध्ये थोडाफार फायदा झालेला असतोच. चार सुखाचे क्षण या जेष्ठांच्या वाट्याला आलेले असतातच. पण चार सुखाच्या क्षणांपेक्षा १० कष्टाचे क्षण त्यांनी अनुभवलेले असतात. त्यामुळेच जेष्ठांना असं वाटत असतं की वयाच्या साठीनंतरचं आयुष्य मस्त आरामात व विनाकाम जावं. निवांतपणे जगावं. समवयस्कांच्या समवेत चार प्रेक्षणीय स्थळं पहावीत, सहचारिणीबरोबर निवांतपणे कोठेतरी फिरुन यावं, चार मित्रांसमवेत गप्पाटप्पा कराव्यात, वयपरत्वे होणारा शारिरी कमी होण्यासाठी बाग बगिचामध्ये सकाळ / सायंकाळ फिरायला जावं असं छान आयुष्य जगावं असं जवळपास सर्व जेष्ठ मंडळींना वाटत असतं. पण सध्याच्या शहरीकरणाच्या वाढत्या व्यापामध्ये जेष्ठांच्या समस्यांकडे ना शासन सहानुभुतीपूर्व नजरेनं पहातयं, ना समाज पहातोय. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील जेष्ठांच्या समस्या वाढतच आहेत. त्यांना सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी चांगली मैदानं उपलब्ध नाहीयेत. लातूरसारख्या अस्ताव्यस्त वाढलेल्या शहरांमध्ये जेष्ठांसाठी मैदानंच उपलब्ध नाहीयेत. शहरातील एकुलते एक क्रिडासंकुलातील वाढत्या इमारती जेष्ठांच्या बसण्याच्या व गप्पाष्टकांच्या जागा संपवण्यातच क्रिडासंकुलाच्या व्यवस्थापनाला मजा वाटते आहे. शहरातील बहुतांश गृहसंकुलातील / वसाहतीतील रिकाम्या जागा अतिक्रमणांमुळे संपल्यातच जमा आहेत. ज्या रिकाम्या अथवा अतिक्रमणापासून दूर आहेत त्यावर कचर्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. जेष्ठांचे आरोग्याचे प्रश्न या रिकाम्या जागांच्या अनुपलब्धतेमुळे वाढत आहेत हे सध्याच्या प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही याचे आश्चर्य वाटते. बहुतांश जेष्ठ मंडळी उच्च रक्तदाब व मधुमेह या दोन व्याधींनी सध्या त्रस्त असतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे या जेष्ठांच्या समस्या कोणी समजूनच घ्यायला तयार नाही.
सध्याच्या तरुणाईच्या हे लक्षातच येत नाहीये की या जेष्ठांना फक्त चार विरंगुळ्याचे क्षण हवे आहेत आणि त्यासाठी हवी आहेत सहज पोहचता येण्यासारखी चांगली मैदानं अथवा विरंगुळा केंद्रं. पण सध्याचे भूखंडांची किंमत विचारात घेता जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणी करण्यापेक्षा त्याठिकाणी व्यापारी संकुलं उभारुन त्यातून महापालिका / नगरपालिका उत्पन्नाची साधनं निर्माण करताहेत. तेथे निवडून येणार्या नगरसेवकांमध्ये या रिकाम्या जागा कशा हडपता येतील याचीच स्पर्धा लागलेली असते. जेष्ठांच्या आरोग्याचे बाबतीत एक निष्कर्ष असाही आहे की जेष्ठांची सकाळ व सायंकाळ चांगल्या निरोगी वातावरणात व्यतित झाली तर त्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं रहातं व त्यांचं वयोमान सहज वाढतं. पण हे लक्षात कोण घेतो. ग्रामिण भागातील जेष्ठांच्या बाबतीत निरोगी वातावरणाचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. कारण तेथील शेतजमीन / मंदिरे हा प्रश्न सहज सोडवतात. पण शहरांचे बाबत मात्र तसे नाही. तेथे शेतजमीन नावाचा शब्दच नाही. मंदिरे तर कायम गजबजलेली असतात. तिथे शहरातील तरुण / गृहस्थच गर्दी करत असतात असा अनुभव आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ठिकठिकाणी जॉगिंग पार्क तयार केले आहेत. पण लातूरसारख्या शहरांमध्ये मात्र असे काही असते याची पालिका प्रशासनालाच माहिती नसते. त्यामुळे जेष्ठांची मोठी कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेष्ठांचे आरोग्याचे प्रश्न किती गंभीर आहेत हे गतवर्षीच्या महामारीचे वेळी प्रकर्षाने पुढे आले आहे. या महामारीमध्ये झालेल्या जेष्ठांच्या मृत्युचे प्रमाण ८० टक्क्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जेष्ठांच्या आरोग्यविषयक समस्यांकडेही जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामिण भागामध्ये सामान्य आरोग्यविषयक समस्यांचे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांमध्ये निराकरण झालेले नाही. शहरी भागामध्ये परिस्थिती थोडीशी बरी आहे. पण वैद्यकिय उपचारांचे शुल्क विचारात घेतले तर ते सामान्य जेष्ठांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे सगळीकडील जेष्ठ आरोग्यविषयक समस्यांचे बाबत अडचणीतच आहेत.
सध्याची परिस्थिती विचारात घेता शासकिय दृष्टीतून जेष्ठ नागरीक ही दुर्लक्षिलेलीच संकल्पना आहे. त्यांचे जगणे सुकर व्हावयाचे असेल तर जेष्ठांच्या समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. जेष्ठ नागरीक दिनाचे निमित्ताने शासनाकडून एवढीच अपेक्षा!.
लेखन : अभियंता. महेंद्र जोशी, लातूर.